शिवसेनेचा दसरा मेळावा २०१२, दिनांक होती २४ ऑक्टोबर मात्र त्या दिवशी शिवसैनिकांचा विठ्ठल त्याच्या पंढरीत म्हणजेच शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी उपस्थित नव्हता, तर त्या दिवशी पहिल्यांदाच बाळासाहेबांनी शिवसैनिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. पण हा आपल्या बाळासाहेबांनी आपल्याशी साधलेला शेवटचा संवाद ठरणार आहे, याची त्यादिवशी कोणालाच कल्पना नव्हती. पुढे दि. १७ नोव्हेंबर, २०१२ या दिवशी बाळासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला आणि ८६ वर्षाचे बाळासाहेब ठाकरे नामक वादळ कायमचं शांथावलं. यासगळ्यावर आज चर्चा करावीशी वाटते. कारण, महिन्याभरात घट बसणार आहेत, त्यामुळे यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे काय होणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. सध्या तरी उद्धव ठाकरेंच्या गटात फारस कोणी शिल्लक न राहिल्याने ठाकरेंच्या सेनेत नेहमीप्रमाणे उत्साह नाही. त्यात शिंदेंच्या उठवाने यावर्षी दसरा मेळाव्या निमित्त संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय.
गोष्ट शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याची -
दि. १९ जून, १९६६ या दिवशी श्रीफळ वाढवून शिवसेनेची रीतसर स्थापना झाली आणि महिन्याभरातच २० हजार शिवसैनिकांची नोंदणी झाली. त्यावेळी चाळीशीत असलेले बाळासाहेब हे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडतील याची जाणीव कदाचित कोणालाच नसावी. रविवार, दि. २३ ऑक्टोबर, १९६६ रोजी सायंकाळी ५;३० वा शिवाजीपार्क दादर येथे शिवसेनेचा पहिला मेळावा संपन्न झाला.
त्यावेळी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संगटना म्हणून प्रचलित असणारी शिवसेना ही अगदीच नवखी असल्याने पहिला दसरा मेळावा हा शिवाजीपार्कात न घेता एखाद्या हॉलमध्ये घ्यावा असं काही सहकाऱ्यांनी बाळासाहेबांना सुचवले. संघटना नवी असल्याने लोकांचा प्रतिसाद न मिळाल्यास आपली फजिती होईल, असा युक्तिवाददेखील करण्यात आला. पण, स्वतःवर आणि स्वतःच्या डरकाळीवर संपूर्ण विश्वास असलेल्या बाळासाहेबांनी हा प्रस्ताव धुडकावून दिला.
जे करायचं ते भव्य दिव्या आणि सर्वां देखत अशी भूमिका घेत बाळासाहेब मोठ्या आत्मविश्वासाने पहिला दसरा मेळावा हा शिवाजीपार्कात साजरा करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि गहजब घडला. बाळासाहेबांचे विचार मंथन ऐकण्यासाठी मराठी माणसाने तोबा गर्दी केली. शिवाजीपार्क तुडुंब भरले. बाळासाहेबांनी उपस्थित शिवसैनिकांना आपल्या क्रांतिकारी विचारांच सोनं वाटलं. पुढे बाळासाहेबांच्या या दसरा मेळाव्याकडे विरोधकदेखील आपले कान टवकारू लागले. शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याला चार लाखांची गर्दी होती असे सांगितले जाते.
आणि प्रबोधनकारांनी ठाकरेंचा बाळ महाराष्ट्राला केला अर्पण -
बहुजन चळवळीतून महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळालेलं रत्न म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. लोकमान्य टिळकांचे सुपुत्र श्रीधरराव टिळक किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार यांचे मित्रत्वाचे संबंध होते. त्यांच्या प्रमाणेच प्रबोधनकरांच्या विचारांना पुरोगामी अथवा पुढारलेल्या विचारांनी झालर होती. बऱ्याचदा हिंदुत्वावर टीका करताना काही मंडळी प्रबोधनकरांच्या विचारांची मोडतोड करून त्याचा खोटा प्रसार करतात.
पण शिवसेनेची स्थापना करताना खुद्द प्रबोधनकार बाळासाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते, ही गोष्ट ते दडवून ठेवतात. रामदास स्वामींवर अश्लिल भाषेत पुस्तकं लिहिणाऱ्या किंवा त्यांना शिव्यांची लाखेली वाहणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या नादी आज उद्धव ठाकरे लागलेत. पण दसऱ्या मेळाव्यात भाषणात त्याच रामदास स्वामींच्या श्लोकाचा दाखला देऊन प्रबोधनकार म्हंटले होते मारीता मारीता मारावे मरोनी अवघ्यासी मारावे, महाराष्ट्र हा काही लेच्या पेच्यांचा देश नाही.
या वाघाला कोणी डिवचले तर त्याचे काय होईल याचे इतिहासात दाखले आहेत. आजवर ठाकरे कुटुंबियांचा असलेला बाळ आज मी महाराष्ट्रातील मराठी माणसाला देऊन टाकला. आता त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे कार्य तुम्हाला पार पडायचे आहे.शिवसेना वाढवायची आहे असे म्हणून एखादी वीज कादाडावी तसे प्रबोधनकार कडाडले होते. आज मराठी माणूस जागा झाला आहे. यापुढे तो अन्याय सहन करणार नाही, अशी सिंह गर्जना स्वर्गीय बाळासाहेबांनी आपल्या पहिल्या दसरा मेळाव्यातून केली होती.
त्यावेळी मराठी माणूस जातीयवादी, विशिष्ट प्रांतवादी अथवा संकोचित मनोवृत्तीचे नसून आमच्या विचारात भारतीय विचार दडलाय आणि म्हणूनच मुंबई कॉस्मोपॉलीटीयन शहर होऊ शकले याचा दाखला स्वर्गीय बाळासाहेबांनी दिला होता. पाहिल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी अनेक गोष्टींचा खरपूस समाचार घेतला. समोर उपस्थित असलेला शिवसैनिकांचा जनसमुदाय देखील संपूर्ण शरीरातले प्राण कानात एकवटून त्यांचे विचार ऐकत होता. सभा संपताच बाळासाहेबांच्या विचाराने पेटून उठलेल्या मराठी तरुणांनी हातात दगड घेऊन ते भिरकवायला सुरुवात केली. एखादा पुतळा जागृत व्हावा तशी समस्त मराठी जनाची ही सभा ऐकल्यावर अवस्था झाली होती, असे या मेळाव्याचे वर्णन केले जाते.
उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांच्या राजकारणातली तफावत -
२००३ साली शिवसेनेच्या महाबळेश्वर अधिवेशनात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा कार्याध्यक्षपदासाठी प्रस्ताव ठेवला आणि बाळासाहेबांचा उत्तराधिकारी कोण हे जाहीर केले. पुढे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना झाली. परंतु आजही राज ठाकरे यांच्या एकंदरीत कारभाराकडे बारकाईने पाहिल्यास ते बाळासाहेबांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन राजकारण करतायत,असे जाणवते. मराठीचा मुद्दा असो वा हिंदुत्वाचा राज बाळासाहेबांचे राजकारण पुढे नेतायत, हे कोणीही सांगेल.
राज यांच्या नंतर उद्धव ठाकरे यांना आव्हान देईल असा एकही नेता शिवसेनेत राहिला नाही. त्यामुळे आपसूपच दसरा मेळावा आणि शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे आली. बाळासाहेबांनी आपल्या राजकारणाची मुहूर्तमेढ मराठी माणसाला केंद्रास्थानी ठेऊन केली. पुढे आघाड्या कारण हे राजकारणाची अपरिहार्यता असल्याने कॉंग्रेस, मुस्लीमलीग,प्रजासमाजवादी पक्ष अशा राजकीय दृष्ट्या विरोधी विचारधारांशी बाळासाहेबांनी युती-आघाडीचे राजकारण केले. परंतु ते करत असताना आपल्या राजकीय भूमिकांना ते चिकटून राहिले.
बाळासाहेबांच्या विचारात स्पष्टता होती. उद्धव ठाकरे या बाबतीत नेहमीच गोंधळलेले आहेत का असा प्रश्न पडतो. मागच्या मुंबईतील षणमुखानंद येथील दसरा मेळाव्यात राष्ट्रीय स्वयं सेवक संघ आणि शिवसेनेचे विचार एकाच फक्त मार्ग वेगळे असे बोलून नंतर उद्धव ठाकरेंनी संघावर टीका केली. या सगळ्याचा कळस म्हणजे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाला विरोध करणाऱ्या आणि कायम हिंदुत्वाविरोधी कारवाया करणाऱ्या संभाजी ब्रिगेडसोबत युती केली. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेचा प्राण असलेली हिंदूहितवादाच्या भूमिकेला फाटा देतायत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
येत्या दसरा मेळाव्याचे काय होणार -
सध्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे काय होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. शिंदे गटाकडून 'दसरा मेळावा' हायजॅक करण्याची तयारी, भाजपच्याही पडद्यामागून हालचाली,अशा मथळ्याच्या बातम्या झळकू लागल्यात. उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी दसऱ्या मेळाव्य बाबतीत संवाद साधला परंतु त्यासाठी ठाकरेंना अद्याप परवानगी मिळालेली नाही असा काही माध्यमांनी दावा केला आहे.
त्यामुळे शिंदे गटाला पुढे करून भाजप दसरा मेळाव्यात खोडा घालणार अशी काही माध्यमांनी हवा केली आहे. याबाबत आम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्याशी संवाद साधला असता, शिंदेगटाकडून दसरा मेळावा हायजॅक केला जाईल अशा बातम्या त्यांनी फेटाळून लावल्या. त्यानंतर वर्षानुवर्ष दसरा मेळाव्याच्या आयोजनात महत्वाची भूमिका पारपडणाऱ्या सदा सरवणकर यांच्या बरोबर आम्ही फोनद्वारे संपर्क साधला असता "त्यांचे जे काही सुरु आहे ते चालुद्या. आम्हाला उगीच त्यांच्या म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळावा डीस्टब करायचा नाही", अशी प्रतिक्रिया दिली.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसरा मेळावा हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. म्हणूनच सध्या तरी शिवाजीपार्क येथे उद्धव ठाकरे दसरा मेळावा साजरा करतील असे चित्र आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठवानंतर आणि संभाजी ब्रिगेडशी केलेल्या युतीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात शिवसैनिकांमध्ये उत्साह नक्कीच दिसत नाहीये.