‘लव्ह जिहाद’ : चर्चा, विवाद आणि सत्य

    27-Aug-2022   
Total Views |
 
lj
 
 
 
आ. नितेश राणे आणि आ. सुनील कांबळे यांनी श्रीरामपूर, अहमदनगर येथे एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराबाबत बोलताना ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमिष देऊन कुणाचे धर्मांतरण होत असेल, तर त्यावर कठोर कारवाईचे आश्वासन यावेळी बोलताना दिले. एवढेच नाही तर आ. नितेश राणे यांनी तर सभागृहाच्या पटलावर जिहाद्यांचे रेटकार्डच जाहीर केले. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’चे नेमके वास्तव काय, याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
 
भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी नुकतेच हिंदू समुदायातील विविध गटातील मुलींना मुस्लीम युवकांनी प्रेमाच्या जाळ्यात फसवत तिला मुस्लीम केले तर त्यांना किती रकमेची बक्षीसं दिली जातात, हे स्पष्ट केले. नितेश राणे यांनी यासंदर्भातील रेटकार्डच सभागृहात वाचून दाखविले. त्यानुसार शीख मुलीला फसवले, तर सात लाख, पंजाबी हिूंद मुलीला फसवले तर सहा लाख, गुजराती ब्राह्मण मुलीला सहा लाख, इतर ब्राह्मण मुलीला पाच लाख, क्षत्रिय मुलीला फसवले तर चार लाख अशी रक्कमच धर्मांधांनी निर्धारित केली आहे.
 
 
आ. नितेश राणे आणि आ. सुनील कांबळे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अशाच एका ‘लव्ह जिहाद’च्या घटनेबद्दल भूमिका मांडल्यानंतर महाराष्ट्रात याविषयी चर्चा सुरू झाल्या. पण, नेहमीप्रमाणे तथाकथित पुरोगाम्यांनी ‘लव्ह जिहाद’ला भ्रामक, निराधार म्हणून धुडकावून लावले. महाराष्ट्रात तर पुरोगामित्वाच्या नावावर हिंदू श्रद्धा आणि रितीरिवाजांना किती आणि कसे पाण्यात पाहायचे, हा तर एककलमी कार्यक्रम काही शेखचिल्ली लोक करत असतात. (शेखचिल्ली यासाठी की तो ज्या फांदीवर बसला होता, तीच फांदी तोडत होता) तर हे शेखचिल्ली लोकांना वाटते की, आपण मुस्लीम समाजाचा कैवार घेतला तर आपल्यावर कदाचित खूप मानवतावादी असल्याचा एक शिक्का लागेल. पण, या पुरोगामी शेखचिल्ली मंडळींनी मुस्लीम काय, कोणत्याही धर्माच्या, देशाच्या, घटनांचे न्यायिक समर्थन केले तर योग्य आहे. मात्र,हिंदू समाजाचे मनोबल ढासळेल किंवा हिंदूंची प्रतिमा मलिन होईल, यासाठी ते कशाचेही समर्थन करत असतील तर ते अयोग्यच!
 
 
या सगळ्या पार्श्वभूमीवर एका अत्यंत तथाकथित पुरोगामी निधर्मी आणि तितकेच ढोंगी मानवहक्कवादी कंपूशी झालेली चर्चा आठवते. महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रशासकीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’ आणि त्यासंदर्भात कठोर कारवाई होणार, असे ऐकल्यावर या कंपूतील सगळ्यांनाच भयंकर राग आला होता. त्यातली एक जण म्हणाली. ”मुलींना काय अक्कल नसते? संविधानाने तिला हक्क दिला आहे. ती तिच्या मर्जीप्रमाणे जगू शकते आणि तिला आवडणार्‍या कोणत्याही धर्मात ती जाऊ शकते. ‘नॉनसेन्स लव्ह जिहाद’! महिलांना मनूने हक्क नाकारला, त्याचे तू समर्थन करतेस का?” तिचे आणि एकंदर तिच्या वर्तुळातील लोकांचे मनू हे आवडते पात्र आणि त्यांचे नेहमीच म्हणणे असते की, ”काही लोक ‘गंगा-जमुनी तेहजीब’ उद्ध्वस्त व्हावी म्हणून मुद्दाम ‘लव्ह जिहाद’ वगैरे बोलत बसतात.
 
 
मुस्लीम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी हे सगळे केले जाते. देशात सेक्युलॅरिझम नष्ट करण्यासाठी हे लोक मुद्दाम असे करतात. ” तिला म्हणाले ”मुद्दा आंतरजातीय विवाहाचा नाही, मुद्दा आहे प्रेमामध्ये फसवणूक करण्याचा! े हिंदू मुलीने प्रेमसंबंध स्वीकारावेत म्हणून जन्माने आणि कट्टर संस्कृतीचा मुस्लीम असतानाही स्वतःला हिंदू म्हणून खोटे भासवणे हे गैरच!!” यावर तिचे म्हणणे होते “ ‘सो व्हॉट एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अ‍ॅण्ड वॉर.’ प्रेम मिळवण्यासाठी करावे लागते असे. तो मुलगा तिच्यासाठी हिंदू नाव लावतो तसे वागतो. तो तिच्यासाठी धर्मबिर्म काही मानत नाही. मात्र, तुमच्यासारखे लोक या असल्या सच्च्या आशिकला ‘जिहादी’ ठरवता.” तिला म्हणाले ”तो तिच्यासाठी हिंदू नाव लावतो,देवळात जातो. पूजा पण करतो. इथपर्यंत ठीक आहे. मात्र, खूप घटनांमध्ये असे घडले आहे की, अल्पवयीन मुलीला हिंदू भासवत प्रेमाच्या नावाने तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले जातात. त्याचे चित्रीकरण करत तिला वेशाव्यवसाय किंवा मादक पदार्थ विक्री करण्यासाठी मजबूर करण्यात येते. हे प्रेम असू शकते का? किंवा विवाहाआधीच त्या मुलीला गरोदर होण्यास भाग पाडले जाते. मग तिला सांगितले जाते की, आता तुला मुस्लीम मुलाशी विवाह करण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी तुला मुस्लीम व्हावेच लागेल. तिने मुस्लीम धर्म स्वीकारण्यास नकार दिला, तर तिच्यावरमानसिक, शारीरिक अत्याचार केला जातो. हे प्रेम आहे का? हे पुरोगामित्व आणि मानवाधिकाराच्या कोणत्या व्याख्येत बसते?” यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते.
 
 
 
2009 साली केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधात आवाज उठवला गेला होता. केरळच्या ख्रिश्चनांनी आणि अगदी चर्चसंस्थेनेही ‘लव्ह जिहाद’मुळे ख्रिश्चन कुटुंबांची वाताहत झाली असे म्हंटले होते. शार्प शुटर तारा शहादेव घटनेने देशात एकच खळबळ उडाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरची शुटर खेळाडू तारा शहदेव यांना विवाहानंतर कळले की, त्यांचा पती रणजित नाही, तर रकबुल आहे. त्याने स्वतःला हिंदू भासवत तारा यांच्याशी विवाह केला. नंतर तारायांच्यावर मुस्लीम होण्यासाठी दबाव आणला. त्यांच्यावर अत्याचार केले. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर एका घटनेमुळे ‘प्रेम की जिहाद?’ असा वाद सुरू आहे.
 
 
भारतीय हिंदू उद्योगपतीची मुलगी लंडनला शिकत असताना अचानकती बांगलादेशला निघून गेली. बांगलादेशच्या नॅशनलिस्ट पार्टीचा नेता शखावत बकुल हुसैनच्या मुलासेाबत नफिससोबत ती राहू लागली. तिच्या पित्याचे म्हणणे की, मुलीला परत भारतात पाठवण्यासाठी त्यांच्याकडून पैसे मागितले जात आहेत. तसेच, मुलीला झाकिर नाईक या दहशतवादी समर्थकाचे व्हिडिओ दाखवून मुस्लीम होण्यासाठी प्रवृत्त केले गेले. दुसरीकडे ग्रीस देशात 17 वर्षांच्या एका मुलीचा खून झाला आणि तिथल्या लोकांनी म्हंटले की, मुलगी ‘लव्ह जिहाद’चा बळी ठरली.
 
 
17 वर्षांची निकोटेल ही मुलगी 30 वर्षीय सानी या पाकिस्तानी व्यक्तीच्या प्रेमात पडली. तिच्या वडिलांना कळले तेव्हा त्यांनी तिला वयाचे अंतर, धर्म, देशामधील अंतर समजावले. मुलीने सानीशी संपर्कही तोडला. त्यानंतर तिची हत्या झाली. ग्रीसमध्ये या घटनेने वादळ उठले. ग्रीसवासीयांचे म्हणणे आहे की, या घटना दररोज घडतात. निर्वासित म्हणून आश्रयाला आलेल्या पाकिस्तानी, अफगाणी आणि तुर्कस्थानी पुरूषांपासून ग्रीसच्या मुलींना संरक्षण द्यायला हवे. कारण,बलात्कार, अपहरण, फसवणूक या सगळ्या गुन्ह्यांत या निर्वासित लोकांचा सहभाग जास्त आहे. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी ग्रीसचे लोक तुर्कस्तानच्या तुर्गल ओझेल या नेत्याचे म्हणणे सांगतात. तुर्गल म्हणाला होता, ”ग्रीसवर आक्रमण करण्यापेक्षा तिथे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या लोकांना निर्वासित बनवून पाठवा. काही वर्षांत ग्रीस आपल्या ताब्यात येईल.” ग्रीसच्या नागरिकांचे म्हणणे पाहिले की, वाटते हा खरेच ‘जिहाद’ आहे!
 
 
 
असो. हिंदू मुलींना फसवून, विवाह करून तिला धर्मांतरित करणे हे इस्लामविरोधात आहे, असे भारतातील ‘दारून उलेम’, ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’, ‘उलेमा-ए-हिंद’ वगैरे मुस्लीम धार्मिक संघटनांनी म्हंटले आहे. पण, या घटना काही थांबत नाहीत. या घटनांना अनेक कंगोरे आहेत. हिंदू मुलींशी विवाह करण्यामागे एका काफिराला हिंदू बनवणे हा इतकाच हेतू असतो का? तर नाही. काही लोकांशी बोलल्यानंतर कळले की, ”यामागे काही विकृत लोकांची मानसिकता असते की, आम्ही तुमच्यावर 800 वर्षे राज्य केले. तुमच्या लेकीसुना आमच्या हरममध्ये ठेवल्या. आताही चित्र बदललेले नाही.” तर काही लोकांचे म्हणणे की, मुस्लीम समाजजीवन वरवर का होईना पर्दानशीन आहे.
 
 
त्यामानाने हिंदू मुलींचे राहणीमान खुले असते. त्यामुळे मुस्लीम युवकांना या मुलींचे आकर्षण वाटते. दुसरीकडे बहुसंख्य हिंदू घरात आपला धर्म, संस्कृती याबद्दल मुलगा-मुलगी दोघांनाही काहीही संस्कार दिले जात नाहीत. त्यामुळे त्यांना स्वधर्माबद्दल, संस्कृतीबद्दल बरेचदा बिलकूल प्रेम नसते. ते आपसुकच अधर्मीपणाकडे वळतात. तर काही लोकांनी सांगितले की, नामवंत मुस्लीम अभिनेत्यांनी हिंदू अभिनेत्रींशी विवाह केला. त्यांचे विवाह कसे सेक्युलर भारतासाठी पूरक आहेत, सहिष्णू भारताचे उदाहरण आहेत,हे सांगताना काही लोक थकता थकत नाहीत.
 
 
 
त्यामुळे समाजात असे प्रकार वाढत आहेत.” अर्थात, हे म्हणणे काहीअंशी खरेच आहे. तरीही या विवाहांची भलावण करणाारे आणि त्यातून सेक्युलॅरिझमचे अमृत वाहते सांगणार्‍यांनी सांगितले नाही की, अभिनेता- अभिनेत्रींनी विवाह केला, पण त्यांच्या अपत्यांचा धर्म कोणता आहे? उदाहरण द्यायचे तर सैफ अली आणि अमृता यांच्या मुलांची नाव आहेत सारा आणि इब्राहिम, तर सैफअली आणि करीना यांच्या मुलांची नाव आहेत तैमुर आणि जहांगिर. नसरूद्दीन यांनी खूप निधर्मीपणा सांगत रत्ना पाठक यांच्यासोबत विवाह केला. पण, या दोघांच्या मुलांची नावे आहेत इमाद आणि विवान. इथे विवान म्हणजे हिंदू नाव वाटते. पण, विवान हे मुस्लीम नाव असून त्याचा अर्थ आहे ‘शुभ दिवस.’ तीच गोष्ट शहारूख, आमीर, इरफान,अरबाज, सोहेल वगैरे खानांची आहे. डझनभर मुस्लीम अभिनेत्यांनी हिंदू महिलांशी विवाह केला. निधर्मीपणाचा आव आणला. प्रत्यक्षात त्यांच्या पत्नी मुस्लीम धर्म स्वीकारताना दिसल्या नाहीत. पण त्यांची अपत्ये मात्र मुस्लीम म्हणूनच संस्कारीत झाली आणि जगत आहेत. या मुलांवर त्यांच्या आईच्या धर्माचे संस्कार का होत नाहीत? तर हा जो प्रश्न आहे तोही छुप्या ‘लव्ह जिहाद’संदर्भातलाच आहे.
 
 
 
असो. आताही मुद्दा हाच आहे की, परस्परसंमती आणि आवड यावर कुणीही कोणताही धर्म जगू शकतो. पण, बळजबरी आणि फसवणूक नको. सध्या देशात आणि परदेशातहीया विषयावर बरेच मंथन होत आहे. महाराष्ट्रात तर यावर विशेष मंथन व्हावेच. कारण, मागे पुण्यात एक हिंदू मुलगी आणि एक मुस्लीम व्यक्ती यांच्या विवाहास समर्थन देण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर उपस्थित राहिल्या. हा विवाह म्हणे ‘शिवविवाह’ आहे, असेसुद्धा घेाषित करण्यात आले. अर्थात, हा विवाह दोघांच्या संमतीने होता. तरीही या विवाहास ‘शिवविवाह’ संबोधणे आणि संविधानाला मध्ये आणत विवाह करणे, हे संशयास्पद होते. प्रत्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्षांनी समर्थन करणे, तर त्याहून संशयास्पद होते.
 
 
 सामाजिक क्षेत्रात काम करताना कितीतरी आई-वडिलांना भेटले, ज्यांच्या मुलींची अशाप्रकारे फसवूणक झाली आहे. कुटुंबांचे आणि त्या फसलेल्या मुलींचे दुःख शब्दातीत आहे. इथे हेसुद्धा नमूद करणे आवश्यक आहे की, अशीही कुटुंब भेटली ज्यांच्या मुलांना मुस्लीम मुलीशी प्रेम झाले आणि त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला. घरातल्या इतरांनीही तो स्वीकारावा, असा या मुलांचा प्रयत्न असतो. जावे त्यांच्या वंशा... या कुटुंबांना भेटून वाटते, आता महाराष्ट्रात सरकार बदलले आहे. लोकभावनेची आणि धर्मभावनेची जाण ठेवून काही तरी सकारात्मक घडेल. त्या अनुषंगाने ‘लव्ह जिहाद’ असो की ‘लॅण्ड जिहाद’ याबद्दल गांभीर्याने विचार होईल, अशी आशा करूया!
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.