सोनाली फोगट यांच्या मृत्युचा नवा खुलासा; आतापर्यंत चौघांना अटक!
26-Aug-2022
Total Views |
मुंबई: हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी नवीन खुलासे होत आहेत. सोनाली यांच्या निधनानंतर त्यांच्या भावाने सोनाली यांचा मृत्यू संशयास्पद असून यामागे मोठे कटकारस्थान असल्याचा दावा केला होता. तसेच, सोनाली यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यांच्या शरीरावर चार ते पाच जखमांचे घाव दिसून आले आहेत.
याबाबत सोनाली यांच्या भावाने म्हटले होते की, “पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांनी मिळून माझ्या बहिणीला जाळ्यात अडकवले. सुखविंदरने तीन वर्षांपूर्वी सोनालीच्या जेवणात अंमली पदार्थ मिसळून तिच्यावर बलात्कार करून तिचा व्हिडिओ बनवला होता.”
सुधीर आणि त्याचा मित्र सुखविंदर सातत्याने तिला ब्लॅकमेल करत होते. हे दोघे अधूनमधून सोनालीच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळत होते. त्यामुळे अनेकदा तिची प्रकृती बिघडली होती. शेवटी या दोघांनी मिळून कट रचत गोव्यात नेऊन तिची हत्या केली, असा आरोप सोनालीच्या भावाने केला आहे.
सोनाली फोगटचे सहकारी सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांना अंजुना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गोवा पोलिसांनी सोनालीला जबरदस्तीने ड्रग्ज देण्यात आल्याचा दावा केला आहे. हे औषध त्यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी दिले होते. या दोघांनी स्वतः गोवा पोलिसांकडे याची कबुली दिली आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे.
गोव्याचे डीजीपी जसपाल सिंह यांच्या म्हणण्यानुसार, सुधीर आणि सुखविंदर यांनी 22 ऑगस्टच्या रात्री सोनालीला जबरदस्तीने अंमली पदार्थ पाजल्याची कबुली दिली आहे. त्यांना द्रवात मिसळून रसायने देण्यात आली. ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे सोनालीची तब्येत बिघडल्यावर दोघेही तिला वॉशरूममध्ये घेऊन गेले. दोघेही सोनालीसोबत दोन तास वॉशरूममध्ये असल्याची माहिती मिळते आहे.
तपासासाठी विशेष पथक
दरम्यान, हिसारमध्ये उपस्थित असलेला सोनालीचा मेहुणा अमन पुनिया यांनी सांगितले की, "२६ ऑगस्ट रोजी, सकाळी त्यांना गोव्याच्या डीएसपीचा फोन आला होता. डीएसपींनी त्यांना सांगितले की, या प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. सोनाली फोगट हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक हरियाणामध्ये येणार आहे."