सुधा यांच्या निवडीचा अन्वयार्थ

    25-Aug-2022   
Total Views |

modi
 
 
नुकतेच भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाचे नव्याने गठन करण्यात आले असून त्यात सुधा यादव या एकमेव महिला आहेत. यापूर्वी सुषमा स्वराज भाजपच्या संसदीय मंडळात होत्या. सुधा यांचे नाव देशपातळीवर इतके परिचित नसतानाही त्यांची निवड का, हाही एक चर्चेचा विषय ठरला आहे. त्यानिमित्ताने सुधा यादव यांचा इतिहास आणि त्यांच्याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे. सध्या त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांनी 1987 मध्ये रूडकी ‘आयआयटी’तून पदवी प्राप्त केली. 1999 मध्ये राजकारणात प्रवेश केला. परंतु, त्यानंतर भारत-पाकिस्तान कारगिल युद्धानंतर लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या होत्या.
 
 
याचदरम्यान, सुधा यांचे पती सुखबीर सिंह यादव हे कारगिल युद्धात लढताना हुतात्मा झाले. त्यावेळी ते ‘बीएसएफ’मध्ये ‘डेप्युटी कमांडंट’ पदावर कार्यरत होते. दरम्यान, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हरियाणा भाजपचे प्रभारी होते. हरियाणात भाजप अशा तगड्या उमेदवारांच्या शोधात होती, जे काँग्रेसला पराभूत करू शकतील. त्यावेळी मोदींनी हरियाणाच्या महेंद्रगढ लोकसभा मतदारसंघातून सुधा यांचे नाव सुचवले. पण, त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यांना निवडणूक लढवण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी भाजपने मोदींवर सोपवली.
 
 
स्वत: सुधा यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, जेव्हा त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला, तेव्हा मोदींनी फोनवर चर्चा केली होती. तेव्हा मोदींनी सांगितले की, “जितकी तुमच्या कुटुंबाची गरज आहे तितकीच या देशालाही तुमची गरज आहे.” मोदींच्या बोलण्याने मनोबल वाढले आणि निवडणूक लढवण्यास होकार दिला. निवडणुकीच्या वेळी मोदींनी त्यांना त्यांच्या आईने दिलेले 11 रुपये दिले आणि निवडणूक लढवण्यास सांगितले. 1999 साली महेंद्रगढ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे राव इंद्रजित सिंह यांचा त्यांनी एक लाखांहून अधिक मतांनी पराभव करत विजय मिळवला.
 
 
त्यानंतर मात्र 2004 आणि 2009 साली त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पुढे त्यांनी पक्षाचे काम चालू ठेवले. 2015 साली त्यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. बिहारमध्ये तेजस्वी आणि उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या विरोधात भाजपला मजबूत करण्यासाठी त्यांची निवड महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यामुळे मोदी यांच्या टीममध्ये ही निवड नक्कीच विचारपूर्वक केली गेली आहे, हे नक्की.
 
 
मिटकरी आधी गावाचे तर व्हा!
 
 
विधानभवनाच्या पायर्‍यांवर धक्काबुक्कीच्या प्रकारानंतर अमोल मिटकरी पुन्हा एकदा चर्चेत आले. मुळात मिटकरी तावातावाने धावून गेल्यानंतर परिस्थिती चिघळली. त्यानंतरही त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर टीकास्त्र सोडले. परंतु, या धक्क्यातून सावरत असतानाच त्यांना रात्री उशिरा आणखी एक धक्का बसला. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील कुटासा गावात त्यांना जबर राजकीय हादरा बसला. गावातील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत मिटकरींच्या ‘ग्रामस्वराज पॅनल’चा सर्व 13 जागांवर दारूण पराभव झाला. प्रदेश युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोके आणि भाजप नेते विजयसिंह सोळंके यांच्या नेतृत्वाखालील ’कास्तकार पॅनल’ने सर्व 13 जागांवर विजय मिळवला.
 
  
मिटकरींचा गावात झालेला हा काही पहिला पराभव नाही. दोन वर्षांपूर्वी आमदार झाल्यानंतर मिटकरी यांच्या नेतृत्वात गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढविली गेली. त्यात त्यांना यश मिळाले खरे, परंतु, नंतर मात्र त्यांना गावातच पराभवाचे धक्के सहन करावे लागले. जानेवारी 2022 मध्ये झालेल्या कुटासा जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत मिटकरींच्या उमेदवाराचा बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’च्या उमेदवार स्फुर्ती गावंडे यांनी दणदणीत पराभव केला. ही निवडणूक त्यावेळी राज्यभर गाजली. त्यानंतर आता पुन्हा मिटकरींना गावातील सोसायटी निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
 
 
 माध्यमे असोत किंवा जिथे माईक दिसेल तिथे मिटकरी तावातावाने बोलायला सुरुवात करतात. त्यातही शरद पवारांचा हात डोक्यावर असल्याने मागच्या दाराने आमदारकी गळ्यात पडली, अन्यथा खोटा इतिहास लोकांच्या गळी उतरवत अजूनही हजारोंचे मानधन घेत फिरावे लागले असते. याआधी गोपीचंद पडळकर यांनी मिटकरींचा माध्यमांवर जाहीर पर्दाफाश केला होता. त्यानंतर त्यांच्या विचारवंत असण्यावरही शंका उपस्थित केल्या गेल्या. कुठलेही ठोस काम नसताना शरद पवारांनी आमदारकी का दिली हेदेखील आता हळूहळू स्पष्ट होत चालले आहे. कारण, मिटकरी आमदार झाल्यापासून सतत वादग्रस्त वक्तव्य करत आले आहे. ज्या गोष्टी बोलायला पवारांची अडचण होते, त्या मांडण्यासाठी मिटकरींना आमदार तर केलं नाही, असाही प्रश्न उभा राहतो. कारण, गावात पराजित होणार्‍या मागच्या दारातून झालेल्या आमदाराने उगाच मोठेपणाच्या गप्पा मारलेल्या बर्‍या नाही. मिटकरी आधी गावाचे व्हा, मग बाकीचं बोला!
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.