अरे हट, त्याने नाही, मीच धक्काबुक्की केली, आम्ही भीत नाही!
भरत गोगावलेंचा थेट इशारा
24-Aug-2022
Total Views |
मुंबई : अरे हट त्याने नाही मीच धक्काबुक्की केली असे म्हणत शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी महाविकास आघाडीला थेट इशारा दिला. ते फक्त ९९-१०६ आहेत आम्ही १६५ आहोत जर असा सामना जुंपला तर काय परिस्थिती येईल अशा शब्दांत भरत गोगावलेंनी सूचक इशारा दिला आहे. ते जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा आम्ही कधीच त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही, मग आज आम्ही त्यांना उत्तर द्यायला आलो तर मग कशी काय त्यांना मिरची झोंबली? असा सवालही गोगवलेंनी केला. 'जो येईल अंगावर त्यांना घेऊ शिंगावर' असा थेट इशाराच दिला.
आम्ही कोणीच कुठलेच पैसे घेतलेले नाहीत, त्यांचा पन्नास खोक्यांचा आरोप सरळसरळ खोटा आहे, ते जनतेची दिशाभूल करत आहेत, असेही गोगावले म्हणाले. आम्ही त्यांचे सर्वच घोटाळे बाहेर काढले, अनिल देशमुखांचे सचिन वाझे प्रकरण, नवाब मालिकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली त्यामुळेच त्यांनी अशाप्रक्रारे बदनामी करायला सुरुवात केली आहे असा आरोप त्यांनी केला. आम्ही अडीच वर्षे त्यांच्याबरोबर काम करायला होतो, भ्रष्टाचार करायला नाही, आम्ही घरी बसून नाही तर जनतेत जाऊन काम केले म्हणून आज इथे उभे आहोत अशा शब्दांत गोगावलेंनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला.
आमच्यावर चालून येण्याची त्यांची हिंमत नाही, ते आमच्यावर चाल करून आले तेव्हा त्यांना आम्ही दणकाच दिला, अशा शब्दांत गोगवलेंनी आपल्या कृतीचे समर्थन केले. हा झालेला प्रकार तर फक्त एक ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है असे म्हणत हा संघर्ष असाच तीव्र होत जाणार असेच यातून सूचित केले.