मुंबई : बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. नेहमी विविध भूमिका घेऊन तो आपल्या प्रेक्षकांसमोर येत असतो. नुकताच त्याचा नवा चित्रपट 'हड्डी'ची घोषणा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली आहे. याबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकीचा फर्स्ट लुक देखील रिव्हील केला आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीचा धम्माकेदार लुक बघून नेटकरी थक्क झाले आहेत. 'हड्डी' या आगामी चित्रपटात नवाज एका तृतीयपंथाच्या लुक मध्ये दिसणार आहे. मोशन पोस्टरमध्ये हा नवाजुद्दीन सिद्दीकी आहे, हे ओळखणे जवळपास अशक्य आहे. नेमकी नवाजुद्दीनची व्यक्तिरेखा काय आहे हे स्पष्ट झाले नसले तरी, त्याच्या या लुकची भरपूर चर्चा सुरु आहे. नवाज जुन्या आणि गंज लागलेल्या खुर्चीत पूर्ण मेकअप करून ऐटीत बसला आहे, परंतु त्याचे हात मात्र रक्ताने माखले आहेत, फक्त हातच नाही तर त्याच्याजवळ असलेले धारदार शस्त्र देखील रक्ताने माखले आहे.
'हड्डी'चे मोशन पोस्टर झी स्टुडिओच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले आहे. अक्षत अजय शर्मा याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना अधिक जाणून घ्यायचे आहे. निर्मात्यांनी पोस्टर प्रदर्शित करताना सांगितले आहे की, या चित्रपटाचे शूटिंग आधीच सुरू झाले आहे आणि तो २०२३ मध्ये प्रदर्शित होईल.
चित्रपटाच्या पोस्टरला प्रेक्षकांचा प्रतिसाद जोरदार आहे. परंतु, त्याचवेळी एक मजेदार गोष्ट घडली आहे. अनेक प्रेक्षकांना नवाजुद्दीन सिद्दीकी मेकअपमध्ये अर्चना पुरण सिंह सारखी दिसली आहे. लोकांनी कमेंट करून म्हटले आहे की, नवाजुद्दीन सिद्दीकी पहिल्या नजरेत अर्चना पुरण सिंह सारखा दिसत होता. परंतु, नवाजचा हा लुक नक्कीच उत्सुकता वाढविणारा आहे, असेही नेटकरी म्हणत आहेत.