केजरीवाल यांच्याकडून प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र घेतल्यास तुरुंगवास निश्चित

    23-Aug-2022
Total Views |
Gaurav Bhatia
 
 
 
नवी दिल्ली : “आम आदमी पक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री अरविंद केजरीवालयांचा भ्रष्टाचारास पाठिंबा आहे. विशेष म्हणजे, अरविंद केजरीवाल यांच्याकडून कोणी प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र घेतल्यास, त्याचा तुरुंगवास हा निश्चित असतो,” असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत लगावला.
 
दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची ’सीबीआय’ चौकशी सुरू असून लवकरच ’ईडी’ चौकशीदेखील सुरू होणार आहे. त्याविषयी आप आणि भाजप परस्परांवर टीका करत आहेत. सिसोदिया यांच्यावरील कारवाई आकसापोटी असल्याचा आरोप आपतर्फे करण्यात येत आहे. त्यास भाजपकडून गौरव भाटिया यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “स्वतः अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया यांना प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र दिले आहे. मात्र, आजकाल ज्याला केजरीवाल प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देतात, तो नक्कीच तुरुंगात जातो. त्यामुळे सध्या झुकणार नसल्याचे उद्दामपणे सांगणारे केजरीवाल आणि सिसोदिया यांना लवकरच कायद्यापुढे झुकावे लागेल,” असाही टोला त्यांनी लगावला.
 
अरविंद केजरीवाल यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे आव्हान भाटिया यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, “केजरीवाल हे सराईत भ्रष्टाचारी असून ते भ्रष्टाचाराचे विक्रम सर करत आहेत. जनतेच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देणे केजरीवाल आणि आम आदमी पक्षास शक्य झालेले नाही. त्यामुळे भाजप जनतेच्या या लढ्यात जनतेसोबत असून केजरीवाल यांचा बुरखा फाडणार आहे,” असे भाटिया यांनी यावेळी सांगितले.