‘टाटा मोटर्स-कलासागर’ एक सुवर्ण महोत्सवी कलापरंपरा

    23-Aug-2022
Total Views |

dy
 
 
‘कलासागर’
ही ‘टाटा मोटर्स’ यांची साहित्यिक संस्था असून तिने आपली 50 वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. कामगारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्थापन केलेल्या ‘कलासागर’चा आढावा घेणारा हा लेख...
 
 
साहित्य संगीत कलाविहीनः।
साक्षात् पशुः पुच्छविषाणहीनः॥
 
 
असे एक संस्कृत सुभाषित आहे, ज्याचा अर्थ होतो की, कलेवाचून मनुष्य म्हणजे शेपूट व शिंगे नसलेला पशू होय आणि हे खरेच आहे. माणूस आपल्या आवडत्या गोष्टी किंवा छंद, कला यांसाठी दिवसभरातील काही क्षण जरी व्यतित करू शकला, तरी त्याचे मन आणि शरीर उरलेल्या वेळात दुप्पट वेगाने काम करू शकते. आपले छंद जोपासताना एक आत्मिक समाधान मिळते. आजच्या स्पर्धेच्या युगात सतत नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद हे आत्मिक समाधानच देते. आपल्या कंपनीतील कामगारांना हाच विसावा, आत्मिक समाधान मिळावे, याच उद्देशातून ‘टाटा मोटर्स’मध्ये ‘कलासागर’ची निर्मिती करण्यात आली.
 
 
1966 पासून कंपनीतील वेगवेगळ्या प्रभागांच्यावतीने ‘औद्योगिक ललित कला मंडळा’च्या, ‘कामगार कल्याण केंद्रा’च्या नाट्य-एकांकिका स्पर्धेत भाग घेतला जात होता. ’सदू आणि दादू’, ’ब्रह्मांडाची पोकळी’, ’मद्राशीने केला मराठी भ्रतार’ यासारख्या एकांकिकांनी भरघोस यश मिळवले. त्यामुळे ‘टाटा मोटर्स’ व्यवस्थापनाचे या नाटकवेड्यांकडे आपोआप लक्ष गेले.
पिंपरी-चिंचवड ‘टाटा मोटर्स’चे शिल्पकार सुमंत मुळगावकर यांची प्रेरणा सोबत होतीच! त्यातून वेगवेगळ्या प्रभागातील या कलाकारांना एकाच छत्राखाली आणून त्यांच्या कलागुणांना वाव दिला जावा, हा विचार पुढे आला.
 
 
स्वतःचीच संस्था असेल तर काम करण्यासाठी उत्साह, आनंद वाटेल, जबाबदारी वाटेल म्हणून प्रत्येक सभासदाने दोन रुपये वर्गणी काढून त्यातून आपले उपक्रम चालवावेत, असे ठरले. यातूनच दि. 20 ऑगस्ट 1972 रोजी ‘टाटा मोटर्स’ ( टेल्को ) ‘कलासागर’ ही संस्था जन्मास आली. प्रा. अरविंद मंगरूळकर यांच्या हस्ते पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात उद्घाटन झाले. त्यानंतर ‘कलासागर’ने कधीच मागे वळून पाहिले नाही. सर्व महाराष्ट्रभरात संस्थेच्या कलाकार, लेखक, कवी आणि नृत्यकार, चित्रकारांनी आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. मग ती चित्रकला असो नाट्य, संगीत अथवा साहित्य, कलासागरच्या पठ्ठ्यांची मुशाफिरी सर्वत्र असल्याचे दिसते.
 
 

dy 
 
 
 
‘टाटा मोटर्स कलासागर’ या संस्थेने गेल्या 50 वर्षांत कंपनीतील सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणण्याचे तसेच त्यांच्यातील सृजनशीलता जोपासत त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे मोठे काम केले आहे, ‘टाटा मोटर्स’ पाण्याचा पुनर्वापर करून निसर्ग जोपासना करत आहे. ‘टाटा समूह’ ‘टाटा’ कर्मचार्‍यांपुरता मर्यादित नाही, त्यांचे काम हे नेहमी देशहिताचेच असते. ‘टाटा मोटर्स’ने लोकांची मने जोपासत देशही जोपासला, असे मत मराठी अभिनेता सुमित राघवन यांनी व्यक्त केले. ही मागच्या वर्षीच घडलेली गोष्ट आहे. ‘कलासागर’चे कौतुक करताना ते म्हणाले की, “ ‘कलासागर’मुळे कंपनीतील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणून त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला आहे.
 
 
इतकी वर्षे टिकून चिकाटीने राहणे व सुवर्ण महोत्सव साजरा करणे, हे या प्रवासातील सहभागी लोकांचे समर्पण, वचनबद्धता व सर्जनशीलता यामुळे शक्य झाले आहे. आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, तर कलासागर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. 50 वर्षांपूर्वी ‘कलासागर’ची स्थापना ‘टाटा मोटर्स’च्या कामगारांसाठी झाली होती. 50 वर्षांमध्ये दोन ते तीन पिढ्या होतात. ‘कलासागर’ ही संस्था त्यांच्याबरोबर जोडली गेली आहे. ही संस्था ‘टाटा’ संस्कृतीशी जोडली गेली आहे. ती नुसतीच जुडली नाही, तर ती स्वत:ही वाढत आहे व ‘टाटा’ कंपनीची वाढ करत आहे. ‘कलासागर’च्या यशामध्ये कंपनीचे व्यवस्थापन व ‘टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन’चा फार मोठा वाटा आहे.
 
 
कामगार म्हणाले की, यंत्रांची धडधड, गिरणीचे भोंगे अथवा शिफ्ट संपल्याचे ‘अलार्म’ आपल्याला आठवतात. पण ‘कलासागर’ ही अशी संस्था आहे, जिच्या सोबत ‘टाटा’ हे नाव ‘स्टिल’प्रमाणे भक्कम उभे आहे. तशी ही संस्था स्वायत्त आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. तिचे व्यवस्थापनदेखील संस्थेच्या सभासद, कलाकार यांच्यामार्फत पाहिले जाते. त्यांना व्यवस्थापनाचे भक्कम पाठबळ मिळाले आहे.
 
 
कारखान्यातील कामगार हा ’यंत्र’ नसल्याने तो शरीर आणि मनाने सुद्रुढ असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याला सुसंस्कृत व आदर्श नागरिक म्हणून घडवणेही गरजेचे आहे. या सामाजिक दायित्वाची जाण ठेवत ‘टाटा मोटर्स’ व्यवस्थापनाने ’कलासागर’ला वेळोवेळी मदत आणि प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे कंपनीतील प्रत्येक कामगाराला त्याचे कलागुण जोपासण्यास वाव मिळावा व त्याच्यावरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने ‘कलासागर’चे काम सुरू आहे. ‘कलासागर’च्या व्यासपीठामुळे अनेक कामगारांमधील कलाकार जन्माला आले. त्यांची कला बहरण्याची संधी त्यांना मिळाली. इतकेच नाही, तर कामगार कुटुंबीयांच्या कलागुणांना संधी देण्यात ‘कलासागर’ तत्पर आहे.
 
 
 
dy
 
 
 
यातून अनेक कलाकार, चित्रकार, खेळाडू, लेखक घडले आहेत, घडत आहेत. ‘कलासागर’च्या या कृतीमुळे श्रमविश्वात एक नवा प्रवाह निर्माण झाला आहे. इतरही औद्योगिक संस्थांना आपल्या कामगारांसाठी काही करण्याची प्रेरणा मिळाली आहे. एवढेच नाही, तर असे अनेक कलाकार आहेत, जे मूळचे बाहेरचे कलाकार असूनही कलाप्रेमामुळे वर्षानुवर्षे ‘कलासागर’ची साथ निभावत आहेत. यामुळे कलासागरचे कार्यक्षेत्र कंपनी बाहेरही विस्तारले गेले आहे.
 
 
’टाटा मोटर्स’प्रमाणे ’कलासागर’चा व्यापदेखील मोठा आहे. आज गेली 50 वर्षे संस्था कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी काम करते आहे. कला, क्रीडा,साहित्य अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामगारांना संधी कशी मिळेल, यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. कामगारांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, उपक्रम, कार्यशाळा संस्थेच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात. सर्व कागार कलाकारांना एकत्र आणणे, त्यांना सुविधा व संधी उपलब्ध करून देणे यासाठी एका कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. अध्यक्ष, सरसचिव, एक-एक उपसचिव, इतर काही प्रतिनिधी असे सर्व मिळून संस्थेचे कामकाज पाहतात. आज ‘कलासागर’ची सभासद संख्या पाच हजारांहून अधिक आहे.
 
 
कलाकार व सभासद आपल्याला सुचलेल्या नवनवीन कल्पना कार्यकारी मंडळासमोर मांडतात. त्यावर विचार, विनिमय होऊन त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवल्या जातात. मग ते माध्यम कोणतेही असो, ‘कलासागर’चा दिवाळी अंक, जो स्वतःमध्येच एक सप्तरंगी सोहळा आहे, तो असो की संगीत ऑर्केस्ट्रा, कलाप्रदर्शन अथवा नाटक, एकांकिका! प्रत्येक नव्या कल्पनेचे इथे स्वागत होते. अर्थात, ‘कलासागर’चे हे यश एका क्षणाचे किंवा एका दिवसाचे नाही, तर तब्बल 50 वर्षांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा आहे.
 
 
सुरुवातीच्या खडतर काळानंतर हळूहळू ‘कलासागर’च्या दर्जेदार उपक्रमांना रसिकांची दाद मिळत गेली आणि प्रत्येक कार्यक्रम यशस्वी ठरत गेला. आता तर अशी परिस्थिती आहे की, कार्यक्रमाची घोषणा होताचक्षणी तिकिटांसाठी रसिकांची विचारणा सुरू होते. हे सर्व यश सातत्य आणि परिश्रम यांना आहे. ‘कलासागर’ने विविध क्षेत्रांत असे यश मिळवले आहे. संस्थेला अनेक पारितोषके, पुरस्कार मिळाले आहेत. पण ‘कलासागर’च्या कलाकारांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. आपल्याला मिळालेल्या पुरस्कार किंवा पारितोषकांपेक्षाही कलेतून मिळणारा आनंद मोठा असतो, हे प्रत्येक सभासद कलाकार जाणतो. म्हणून हे कलाकार आपल्याला मिळालेल्या यशाचा लाभ, (आपली कलेशी असलेली बांधिलकी लक्षात घेऊन ) इतरांनाही मिळवून देतात, हे कलासागरचे मोठे यश आहे.
 
 
सर्व सभासद कलासागला आपले कुटुंब मानतात. नाट्यशिबिरे, कार्यशाळा,कवीसंमेलने, अंताक्षरी स्पर्धा, कलावर्ग, निबंध स्पर्धा अशा अनेक माध्यमांतून कलासागरच्या कलाकारांनी आपल्या कलेचा उपयोग समाजातील इतर घटकांसाठी केला आहे. त्यांनी पारितोषकापेक्षा मोठं मानलं ते संस्थेला, कलेला! आणि म्हणूनच आज 50 वर्षांचा यशस्वी टप्पा संस्था पार करू शकली आहे. कर्मचारीच नव्हे, तर त्यांचे कुटुंबीयदेखील मोठ्या प्रमाणात ‘कलासागर’च्या उपक्रमात सहभागी होतात.
 
 
समाजातील अनेक मान्यवरांनी ‘कलासागर’ला नावाजले आहे. पु.ल. देशपांडे ते कवी वैभव जोशी आणि गीतकार जगदीश खेबुडकर, अरुण दाते, प्रशांत दामलेंपासून सुबोध भावे, अजय-अतुल गोगावले, डॉ. श्रीराम लागू, आनंद इंगळे अशा अनेक मान्यवरांनी ‘कलासागर’चे कौतुक केले आहे. तसेच संस्थेच्या विविध कार्यक्रमांचे अतिथीपद भूषवले आहे. या सर्वांचे मार्गदर्शन संस्थेच्या कलाकार, लेखक,कवी यांना वेळोवेळी मिळत राहिले आहे. त्यातून अनेक उभारत्या कलाकारांना, लेखक, कवींना प्रोत्साहन मिळाले आहे. यातील अनेक जणांबरोबर कायमचे ऋणानुबंध जुळले.
 
 
‘कलासागर’चे सर्व प्रकाशन सोहळे आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. आज कलासागर दिवाळी अंकाचा जो दर्जा टिकून आहे, यात व्यवस्थापन, कवी आणि लेखकांचा मोठा सहभाग आहे. यामध्ये कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांनाही सामील केले जाते. गेल्या काही वर्षांत हिंदी आणि इंंग्रजी भाषांनासुद्धा अंकात सामील करून घेतले जात आहे.
 
 
या प्रवासात कित्येक हजार लेखक सहभागी झाले. आमचे अनिल जोशी यांचे स्वप्न होते की, ’ न लिहिणार्‍या प्रत्येक हाताला लिहिते करायचे...’ ‘कलासागर’ने हे स्वप्न नक्कीच पूर्ण केले आहे. अनेकांनी स्वतःची पुस्तके प्रकाशित केली आहेत. अनिल आठल्ये, अनिल जोशी, शशिकांत ढाळे, हेमंत नाडगौडा, हरी नरके, जयप्रकाश झेंडे, विजय बेडेकर, चंद्रमोहन कुलकर्णी, सुधीर हसमनिस आत्ताच्या काळातले, प्रदीप वाघ, राजेश हजारे, शांताराम वाघ, सीमा गांधी, मानसी चिटणीस, पूजा सामंत, सविता इंगळे, मौली बिसेन, जयश्री श्रीखंडे, ऋचा मोहबे, सुनील अधाते, भरत बारी, शीतल माने, अशा अनेक जणांचे संग्रह वा पुस्तके प्रकशित झाली आहेत, त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
 
 
‘कलासागर’च्या साहित्य शाखेने अनेक कार्यक्रम राबवले. तयात एक पानी कथा, गझल, कविता, काही, कथा वाचन, सादरीकरण, विषयांवर आधारित लेखन यांचाही समावेश आहे. त्याचा फायदा सामान्य लेखकांना झाला, ज्यांना मोठे लेख अथवा कथा लिहिता येत नव्हते, ते लिहू लागले आहेत. यातही लिहिणार्‍या 60 टक्के लेखिका आहेत, हे विशेष नमूद करावे लागेल.
 
 
गेल्या दोन वर्षांत ‘कोविड’च्या साथीतदेखील ‘कलासागर’ने माघार घेतली नाही. अनेक ऑनलाईन कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून आपल्या कार्यात सातत्य राखले आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील अनेक कलाविषयक संस्था बंद पडल्या किंवा काळाच्या पडद्याआड गेल्या. या काळातही ‘कलासागर’ ठामपणे उभी राहिली व स्वतः खंबीरपणे उभी राहिली. यात व्यवस्थापन,सभासद यांसोबतच ‘टाटा’ संस्कृतीचा ही मोठा वाटा आहे. मला खात्री आहे की, ‘कलासागर’ अशीच यशस्वी ’शंभरी’ गाठेल आणि आपल्या कलाकारांना उन्मेषाचे पंख देत राहील.
 
 
 
-  मानसी चिटणीस