शालेय जीवनात आपल्याला शिकवले जाते की, गोष्टी एकतर बरोबर आहेत किंवा चुकीच्या आहेत. याचा अर्थ ती एक परिपूर्ण गोष्ट आहे. तरीही वास्तविक जीवनात काहीच परिपूर्ण नसतं. परिपूर्णता ही एक मानवी संकल्पना आहे आणि ज्या विचारांनी ती निर्माण केली आहे, त्याशिवाय तिला कोणताही वास्तविक आधार नाही.
बरेच लोक ‘उत्कृष्टता’ आणि ‘परिपूर्णता’ यात गल्लत करतात. जेव्हा आपण उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याकडे एखाद्या गोष्टीबद्दलचा दर्जा उच्च असतो. सर्वसामान्यपणे उच्च मानके गाठायचा प्रयत्न करण्यात काहीही चुकीचे नाहीच. तसे पाहिले तर ही एक चांगली सवय असू शकते. कारण, जेव्हा केव्हा एखादी गोष्ट दर्जात्मक दृष्टीने चांगली करण्याचा आपण प्रयत्न करू लागतो, तेव्हा आपल्यात चांगल्या सुधारणा घडावयास लागतात, आपण समस्या सोडवण्याच्या दिशेने आणि दर्जेदार काम करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित होऊ लागतो.
पण, एखादी गोष्ट परिपूर्ण करावयाची किंवा त्यात ‘परफेक्शनिझम’ आणण्याबाबत आपण विचार करतो, तेव्हा ती गोष्ट जवळजवळ अशक्यतेच्या पातळीवर पोहोचते. तो एक प्रकारे अशक्य असा उच्च दर्जा आहे, ज्यामध्ये चुकांसाठी माफी नाही आणि अपूर्णतेसाठी वाव नाही. परिपूर्णतेमध्ये कुठल्याही दोषाशिवाय निर्दोषतेची अवस्था सूचित केलेली असते. तुम्ही परिपूर्ण असता तेव्हा ती एक अशी स्थिती असते, जिथे तुमची कृती किंवा कार्यप्रदर्शन जी उत्कृष्टतेची पातळी गाठते, ती ओलांडली जाऊ शकते, ते दुसर्यासाठी पुरेसे नसते. जसजसे आपण आपल्या कृतीचा वा क्षमतेचा दर्जा वाढवतो आणि चांगल्या गोष्टी करायला लागतो, तेव्हा आपण या गोष्टीचा प्रारंभ करताना किती अपुरे होतो, याची जाणीव आपल्याला होत असली, तरी आपण जसजसा आपला दर्जा वाढवत जातो, तेव्हा आपण किती महान आहोत, असेही आपल्याला वाटत राहते.
बरेच लोक चुका करतात, त्या केवळ व्यवसायात किंवा प्रशिक्षणातच करतात, असे नाही. सर्वसाधारणपणे आपल्या नित्याच्या जीवनातही करतात आणि यातील सर्वात महत्त्वाची जी चूक असते, ती म्हणजे परिपूर्णता मिळवण्याची चूक. यात नक्की समस्या काय आहे. जगात कुणीही परिपूर्ण नसतो. परिपूर्णतेचे ध्येय बाळगूनच माणसे आपली ध्येये इतकी अवास्तव आणि असंभव ठेवतात की, ती गाठणे अशक्यप्राय गोष्ट होऊन बसते. यामुळे तुम्हाला कधीच समाधान किंवा तृप्ती मिळत नाही.
त्याऐवजी उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करा. उत्कृष्टता म्हणजे विशेषता असणे, सक्षमतेचा विकास करणे, वेगळेपणा प्राप्त करणे, एखादी खासियत असणे. अर्थात, मनात असा प्रश्न येऊ शकतो की, मग ते परिपूर्णतेपेक्षा वेगळे कसे? येथेच खरी गोम आहे. परिपूर्णता आणि उत्कृष्टता यातील फरक हा आहे की, उत्कृष्टतेच्या संकल्पनेतून तुम्ही आपले अपयश आणि आपल्या चुका स्वीकारता आणि त्यातून तुम्ही शिकता, स्वतःला सुधारता. परिपूर्णतेच्या हव्यासाने तुम्ही आपला कमकुवतपणा किंवा अपयश मान्य करत नाही. तुम्हाला सगळे काही सर्ववेळी परिपूर्णच हवे असते.
परिपूर्णतेची किंवा ‘परफेक्शनिस्ट्स’ची उच्च मानके आहेत. ती साध्य करण्यासाठी तितक्याच प्रमाणात एक ताण येऊ शकतो. परिपूर्णतेचा पाठलाग करताना ते कधी साध्य होऊ शकत नाही. कारण, त्यात आकाशाची मर्यादा आलेली असते. अशा गोष्टीचा पाठलाग करताना थांबण्याचा लगाम नसतो. अशक्यप्राय गोष्टीचा व्यर्थ पाठलाग करता करता त्याचा आरोग्यावर, नातेसंबंधावर आणि आत्ममूल्यावर नकारात्मक परिणाम होतो. हे निराशाजनक असते. नैतिक खच्चीकरण करणारे असते. कारण, तुम्ही असंभव, अशक्यप्राय, उच्च मानकांची पूर्तता करू शकत नाही. म्हणून काय होते की, आपण कितीही साध्य केले, तरीही आपल्याला सतत अपयशी झाल्यासारखे वाटत राहते. आपण स्वत:शी अतृप्त राहतो. दुसर्यांनाही प्रसन्नता देऊ शकत नाही. त्यामुळे वाद होत राहतात आणि नातेसंबंध बिघडतात आणि मनोधैर्यही खचत जाते.
शालेय जीवनात आपल्याला शिकवले जाते की, गोष्टी एकतर बरोबर आहेत किंवा चुकीच्या आहेत. याचा अर्थ ती एक परिपूर्ण गोष्ट आहे. तरीही वास्तविक जीवनात काहीच परिपूर्ण नसतं. परिपूर्णता ही एक मानवी संकल्पना आहे आणि ज्या विचारांनी ती निर्माण केली आहे, त्याशिवाय तिला कोणताही वास्तविक आधार नाही.
व्हिन्स्टन चर्चिल यांनी एक सुंदर उद्बोधन केले आहे की, परिपूर्णता हा प्रगतीचा शत्रू आहे. परिपूर्णतावादी लोक आपल्या चुकांकडे आपल्या अक्षमतेचा किंवा अपूर्ण असण्याचा पुरावा म्हणून पाहतात. ते स्वत:कडून सर्वंकष जाणून घेण्याची सर्वापेक्षा जास्त कामगिरी करण्याची निंदेच्या वर राहण्याची आणि कोणालाही निराश न करण्याची अपेक्षा ठेवतात. हे केवळ अवास्तवच नाही, तर जीवनभर खांद्यावर वाहून नेण्यासाठी पराकोटीचे ओझे आहे.
- डॉ. शुभांगी पारकर