मुली वयात येताना मासिक धर्म सुरू होतो. या दिवसांमध्ये शारीरिक बदल होत असतो व अशा दिवसांमध्ये दिनचर्या थोडी बदलणे महत्त्वाचे असते. मासिक स्राव योनीभागातून होत असल्यामुळे या अवयवाची व परिसराची निगा व स्वच्छता राखणे, (हायजिन मेंटेन करणे) खूप महत्त्वाचे असते. आज त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
मासिक स्राव हा प्रत्येक स्त्रीला या कालावधीत नियमित कालमर्यादेने होणे प्राकृतिक आहे. म्हणूनच या चक्राला ‘टाईम ड्युरेशन’ असे म्हणतात. दर 25 ते 35 दिवसांनी तीन ते सहा दिवस मासिक स्राव होणे, हे स्वाभाविक आहे. प्रत्येक स्त्रीसाठी हे चक्र थोडं-थोडं भिन्न असते. म्हणजे दोन मासिक स्रावांच्या मधील कालावधी, दर मासिक चक्रामध्ये होणार्या रक्तास्रावाचे प्रमाण व प्रकार तसेच, किती दिवस रक्तस्राव होतो, हे व्यक्तिसापेक्ष भिन्न भिन्न असते. अविवाहित अवस्थेतील मासिक धर्माची स्थिती विवाहानंतर बरेचदा बदलते, तसेच गर्भिणी अवस्थेमध्ये रजोदर्शन होत नाही. काही कालावधीसाठी हे बंद होते. प्रसूतीनंतर स्तनपान सुरू असल्यास सहा-आठ महिन्यांचे किंवा आधी रज:प्रवृत्ती पुन्हा सुरू होते. बरेचदा ‘पॅटर्न’ बदलतो आणि ‘मेनोपॉझ’ म्हणजे रजोनिवृत्तीपूर्वीदेखील हा ‘पॅटर्न’ बदलतो. काही वेळेस दोन चक्रांमधील कालावधी वाढतो, तर काही वेळेस वारंवार रज:प्रवृत्ती होते.
अन्य वेळेस रज:स्राव अधिक दिवस सुरू राहतो आणि काही जणींमध्ये रज:स्राव खूप कमी प्रमाणात होऊ लागतो. ‘मेनोपॉझ’ येण्यापूर्वी साधारण दोन-चार वर्षे वरील प्रमाणे मासिक स्रावाच्या प्रक्रियेमध्ये बदल घडतो, याचबरोबर अन्य शारीरिक, भावनिक व मानसिक कुरबुरीसुद्धा असू शकतात. या तीन टप्प्यांमध्ये जे बदल होतात, हे स्वाभाविक आहेत, नैसर्गिक आहेत. यात बरेचदा काही दीर्घकालीन औषधोपचारांची गरज भासत नाही, पण याव्यतिरिक्त या नैसर्गिक मासिकचक्राला जर काही बाधा आली, आणली गेली, तर मात्र औषधोपचार अवश्य लागतात. उदा. मासिक पाळी येऊ नये, पुढे जावी म्हणून घेतल्या गेलेल्या ‘ओसीपी/हार्मोनल पील्स’ सणासुदीच्या वेळेस, घरात लग्नकार्य असतेवेळी किंवा काही धार्मिक समारंभ असताना, बाहेर भटकंतीला जाताना किंवा अन्य कारणांमुळे ही औषधे घेऊन मासिकस्रावाचे नियमित चक्र बदलण्याचा प्रयास केला जातो. लवकर येण्यासाठी, पुढे ढकलण्यासाठी असे जर वारंवार केले, तर याचा अनिष्ट परिणाम होतो.
‘पीसीओडी’सारख्या त्रासामुळे ही मासिक रज:प्रवृत्तीचे चक्र बिघडते. बरेचदा ‘पीसीओडी’ होण्याचे कारण आपल्या बदललेल्या जीवनशैलीतच दडलेले असते. व्यायामाचा अभाव, अति प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे अत्याधिक सेवन, रात्री जागरण, सकाळी उशिरा उठणे, अतिमानसिक ताण, चिंता इ.कारणांनी ‘पीसीओडी’च्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. हे टाळणे शक्य आहे. वरील नमूद दोन्ही कारणे ही व्यक्तीच्या स्वत:च्या स्वत:च्या चुकीमुळे उत्पन्न झालेली आहेत.
नैसर्गिक मासिक स्रावाच्या वेळेस अत्याधिक शारीरिक-मानसिक कष्ट व ताण टाळावेत, शरीराला संपूर्ण विश्रांतीची जरी गरज नसली, तरी अतिरेकी कष्ट नक्की टाळावेत, योनीभाग व गुह्यांगाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हल्ली रज:स्राव एकत्रित ‘कलेक्ट’ करण्यासाठी विविध साधने बाजारात उपलब्ध आहेत. ‘पॅड्स’, ‘टॅम्पॉन्स’, ‘कप्स’, ‘डिस्क’ इ. आपण याबद्दल थोडे जाणून घेऊया.
‘सॅनिटरी पॅड’ वगळता अन्य तिन्ही साधने ही शरीराच्या आत ठेवून रज:स्राव त्यात गोळा केला जातो. अंत:साधने योनी भागात ठेवली जातात, तर ‘कप’, ‘डिस्क’ हे गर्भाशय ग्रीवेशी ठेवले जाते. एवढ्या अंतर्गत भागात जेव्हा ही साधने ठेवली जातात, वापरली जातात, तेव्हा सावधानतेने त्याचा वापर होणे अत्यावश्यक आहे. कुमारीअवस्थेत असताना सहसा ‘टॅम्पॉन्स’, ‘कप्स’ आणि ‘डिस्क’चा वापर टाळावा. कारण, योनीच्या मुखाशी एक पातळ आच्छादन असते. त्याला इजा होण्याची, फाटण्याची शक्यता वाढते.
ही साधने वापरताना शारीरिक स्वच्छता, तसेच त्या साधनांची स्वच्छता अत्यंत गरजेची आहे. ही साधने इतरांबरोबर ‘शेअर’ कधीच करु नये. दिवसातून किमान तीन-चार वेळा तरी ही साधने बदलावी. काही वेळेस नीट वापरता येत नसल्यामुळे रज:स्राव बाहेर येतो किंवा आतील नाजूक अवयवांना त्रास होतो, इजा होते. काही वेळेस या वापरलेेल्या साधनांनी अॅलर्जीदेखील निर्माण होऊ शकते. योनीमुखाचा घेर व या साधनांचा घेर जर कमी-जास्त असला, तर स्राव बाहेर पडणे किंवा दुखणे, अवस्थता हे स्वाभाविक आहे.
कुठलेही साधन/वस्तू योनीभागात अधिक काळ ठेवून देऊ नये. जेणेकरून तो मार्ग बंद केला जाईल, अडविला जाईल. असे केल्याने शरीरातील जीवाणू शरीराबाहेर जाऊ शकत नाही आणि या जीवाणू संपर्काने ‘इन्फेक्शन’ होण्याची शक्यता खूप वाढते. ‘बॅक्टेरियल इन्फेक्शन’ योनीभागात झाल्यास ढजदखउ डकजउघ डधछऊठजचए (ढडड) होण्याचे प्रमाणे वाढते. या साधनांमुळे अचानक ‘टीएसएस’ होऊ शकतो. जर गुदागांची निगा व स्वच्छता राखली गेली नाही, तर यामध्ये अचानक ताप येतो (थंडी वाजून ताप येऊ शकतो) रक्तदाब (बीपी) कमी होते व चक्कर येऊ लागते. योनीभागी पूरळ उठतात (क्वचितप्रसंगी सर्वांगावरही पूरळ येते ) विशेषत: ‘डीस्क’ आणि ‘कप्स’ वापरणार्यांमध्ये ‘टीएसएस’ होण्याची दाट शक्यता असते.
‘टॅम्पॉन्स’मुळे योनीभागात सोलपटल्यासारखे होऊ शकते. ‘टॅम्पॉन्स’मध्ये रज:स्राव शोषल्यामुळे त्याचा घेर वाढतो व काढताना त्रास, वेदना, अस्वस्थता जाणवते. यामुळे काही वेळेस पोटात मुरडा, कंबरदुखी इ. चे प्रमाण व तीव्रता वाढते. ‘टॅम्पॉन्स’मुळेदेखील जीवाणू संसर्ग होण्याची शक्यता वाढते. स्त्रीशरीरात, योनीमार्गातच मूत्रमार्ग असतो. ज्यातून मूत्रप्रवृत्ती होते. योनीभागाच्या अस्वच्छतेमुळे वारंवार स्त्रियांमध्ये ‘युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन’ होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळते. शारीरिक स्वच्छता व त्याचबरोबर स्वत:ची वस्त्रे (विशेषत: अंत:वस्त्रे) इतरांशी ‘शेअर’ न करणे, न धुता, ओली अंत:वस्त्रे किंवा एकच अंत:वस्त्र खूप काळ दिवस वापरणे इ. ही कारणे बरेच आढळतात. या सगळ्या बाबींचा नक्की विचार करावा.
मासिक स्रावाच्या वेळेस ’पॅड्स’ वापरणे, सगळ्यात सुटसुटीत सोपे व ’हायजीनिक’ असते. ते विशिष्ट कालावधीनंतर बदलावे. हल्ली ‘नायलॉन’, ‘सिंथेटिक’ मटेरियल वापरून, कृत्रिम सुगंध वापरुन ’पॅड्स’ बाजारात उपलब्ध आहेत. पण, योनी भाग हा अत्यंत संवेदनशील भाग आहे, हे लक्षात ठेवावे. जेवढे कृत्रिम मटेरियल सुगंध/अन्य घटकांचा योनीभागाशी संपर्क येईल. तेवढी त्याची ‘रिस्क’ निर्माण होण्याची शक्यता वाढते, ‘सेन्सिटिव्ह’ असल्यास लगेच पूरळ येते. अशा वेळेस ‘कॉटन’/’ब्रिथेबल मटेरियल्स’चे सूती ‘पॅड’ वापरणे उपयोगी ठरते. या पद्धतीने योनीभागाची स्वच्छता व सूती ’पॅड’ वापरल्यास ‘टीएसएस’ व अन्य संसर्गाचे प्रमाण आटोक्यात ठेवणे शक्य आहे.
- वैद्य कीर्ती देव