आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी!

    22-Aug-2022   
Total Views |

mns
 
 
वैद्यकीय क्षेत्रातले उच्चशिक्षण घेऊन, त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या मूळ गावासाठी, समाजासाठी करणारे अहमदनगरचे डॉ. किरण पारधी. त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा...
 
 
गावामध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झालेले कुणी नसते, असे नाही. पण, बहुतेकवेळा काहीजण डॉक्टरी शिक्षण झाले की, गावातून काढता पाय घेतात. त्यांच्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग गावाला होत नाही की, गावातल्या त्यांच्या समाजाला गोतावळ्याला होत नाही. या सगळ्या गोष्टी डॉ. किरण पारधी यांनी अनुभवल्या. आपली माती, आपला देश यावरची त्यांची प्रखऱ निष्ठा. ती निष्ठाच त्यांना वैद्यकीय शिक्षणातले उच्चशिक्षण घेऊनही पुन्हा त्यांच्या मुळ गावाकडे, घेऊन आली. डॉ. किरण यांचे डॉ. पारधी हॉस्पिटल. दुर्गम भागातील वंचित समाजातील तरुणांनी उच्चशिक्षित व्हावे, प्रगतीच्या वाटा त्यांच्यासाठीही खुल्या व्हाव्यात यासाठी निरंतर प्रयत्न करणारे डॉ. किरण पारधी. त्यांचे शिक्षण ‘एमबीबीएस’, ‘एमएस’(ओबिजीवाय) ‘फेलो इन गायनॅक’, ‘इन्डोस्कोपी’(आयसीओजी), ‘एफओजीएसआय’, ‘अ‍ॅडव्हान्स इनफ र्टीलिटी ट्रेनिंग’, ‘एफओजीएसआय.’
 
 
डॉ. किरण यांचे मत आहे की, कुपोषणाच्या समस्येचे निराकरण करायचे असेल, तर त्यासाठी बालकाच्या जन्माआधीपासून मातेची काळजी घ्यायला हवी. गरोदर मातेला योग्य आहार प्राप्त झाला, तरच तिच्यापोटी जन्मणाारे बाळ निरोगी जन्माला येते. त्यासाठी वनवासी क्षेत्रातील नव्हे, तर सर्वत्रच माताभगिनींमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. ती जागृती डॉ. किरण करतात. त्यांच्या रुग्णालयात गरजू-गरीब रुग्णांवर नाममात्र शुल्क किंवा अगदी विनामूल्यही उपचार केले जातात. कारण, रुग्णांवर उपचार होणे महत्त्वाचे, असे डॉ. किरण यांचे मत. अहमदनगर परिसरात वनवासी कल्याण आश्रमाची वसतिगृह आहेत. या वसतिगृहातील मुलांची आरोग्य तपासणी त्यांच्यासाठी जागृती शिबिराचे आयोजन करण्यामध्येही डॉ. किरण यांचा पुढाकार असतो. गावासाठी गोरगरीब, भोळ्या जनतेसाठी आपल्या आरोग्य ज्ञानाचा उपयोग करणारे डॉ. किरण पारधी. त्यांनी ठरवले असते, तर मुंबई-पुण्यात ते सुपर हॉस्पिटल सुरू करू शकत होते, नव्हे त्यांना तशी संधीही प्राप्त होती.
 
 
मात्र, त्या सर्व संधींना नकार देत ते ग्रामीण भागात आरोग्य सेवा आणि समाजसेवा का करत आहेत? त्यांची प्रेरणा काय? तर त्यांची प्रेरणा आहे वनवासी कल्याण आश्रमाच्या वसतिगृहातून मिळालेले संस्कार. आपल्या माणसांचे मंगल व्हावे याचे दायित्व आपल्याकडेच आहे, असे सांगणारे वनवासी कल्याण आश्रमाच्या वसतिगृहातील गुरूजन अण्णा टेके, शशिकांत रसाळ, नाशिकचे बाळासाहेब दीक्षित. रा.स्व.संघाच्या विचारांनी आयुष्य व्यतित करणारे हे गुरूजन. वसतिगृहातील मुलांना शिस्त लागावी, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून हे सारे जण अक्षरशः रक्ताचे पाणी करत असत. या सगळ्यांचा प्रभाव डॉ. किरण यांच्यावर पडला. इथेच किरण यांनी ठरवले की, आपणही उच्चशिक्षण घेऊन समाजासाठी असेच काहीतरी करायचे. असो.
 
 
डॉ. किरण यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ढगेवाडी. महादेव कोळी समाजाचे महादू पारधी आणि जानकाबाई पारधी यांचे सुपुत्र किरण. महादू यांची थोडीशी शेती होती. उत्पन्न पोटापुरतेच. माळकरी असलेले पारधी कुटुंब संस्काराने श्रीमंत. महादू आणि जानकाबाई किरण यांना सांगत नम्र राहायचे, समाजाशी मिळून मिसळून राहायचे. कधीही कसला गर्व, उतमाज करायचा नाही. सत्य-न्यायाने वागायचे. गावात त्यावेळी शिक्षणाची संधी नव्हती म्हणून महादू यांनी शिक्षणासाठी वयाच्या आठव्या वर्षांपासूनच किरण यांना मुंबईला आत्याकडे पाठवले. पहिली ते दहावी ते आत्याकडे शिकले. आत्याची परिस्थितीही सुधारणच. त्यामुळे पुढे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईला घेणे परवडण्यासारखे नव्हते. हा विचार करून किरण पुन्हा गावी आले.
 
 
गावात महाविद्यालय घरापासून 20 किलोमीटर दूर होते. किरण सकाळी 6 वाजता घरातून निघत एक घाट चढत आणि उतरत. तिथून एसटी पकडत मग महाविद्यालयात जात. विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यामुळे ‘प्रॅक्टिकल’ असे. उशीर झाला तर गावाकडे जाणार्‍या एक-दोन एसटीही मिळत नसत. त्यामुळे किरण यांनी तिथून जवळ असलेल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या वसतिगृहात प्रवेश घेतला. तिथे दररोज संघाची शाखा लागे. बौद्धिक होई. या सगळ्यांमुळे किरण यांच्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल झाला. पुढे त्यांनी ‘एमबीबीएस’साठी प्रवेश घेतला. नातेवाईकांकडून, पतसंस्थेतून कर्ज घेऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केले. या सगळ्या काळात वनवासी कल्याण आश्रमाची, संघ स्वयंसेवकांची साथ होतीच. ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेताना किरण यांना वाटत असे की, मला प्रेरणा मिळाली म्हणून मी शिकलो. पण, असंख्य बांधव आहेत की त्यांना वाटतच नाही की, आयुष्यात काही तरी करावे.
 
 
त्यांच्यामध्ये जागृती आणायला हवी. ‘एमबीबीएस’ नंतर त्यांनी अर्धवेळ नोकरी, अर्धवेळ शिक्षण करत वैद्यकीय क्षेत्रातील अनेक शैक्षणिक पात्रता मिळवल्या. थोडे आर्थिक स्थैर्य आल्यानंतर ते पुन्हा अकोलेला आले. त्यानंतर काही काळातच कोरोनाने जगाला घेरले होते. त्यावेळी डॉ. किरण यांनी आरोग्यसेवेचे व्रत सोडले नाही. या काळात त्यांनाही कोरोना झाला. त्यांची सहकारी आणि पत्नी डॉ. आकांक्षा यांना दोन वेळा कोरोना झाला. पण, बरे झाल्यावर दोघेही पुन्हा आरोग्य सेवेत रूजू झाले. डॉ. किरण म्हणतात, “समाज खूप चांगला आहे. समाजाला मूळ प्रवाहात यायचे आहे. मात्र, त्यामध्ये खूप अडथळे आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी मी काम करीत आहे आणि करत राहणार. वनवासी भागातील उच्चशिक्षणाचा टक्का वाढावा, समाजाला स्वावलंबी आणि सक्षम बनवावे यासाठी डॉ. किरण यापुढेही सेवाकार्य, जागृती करणार आहेत.
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.