जालना : श्री समर्थ रामदास स्वामी यांचे मूळ जन्मगाव असलेल्या 'जांब समर्थ' इथल्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला जाण्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. सुमारे साडे चारशे वर्षे जून्या असलेल्या प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या आहेत. अज्ञात चोरट्यांकडून मंदिरातील ऐतिहासिक आणि दुर्मिळ अशा पंचधातूंच्या मुर्त्या चोरी केल्या आहेत.
समर्थ रामदासांनी स्थापित केलेल्या राम लक्ष्मण सीतेची मूर्त्याही चोरीला गेल्याची माहिती आहे. तसेच ऐतिहासिक पंचायतन (राम लक्ष्मण सीता, भरत, शत्रूघ्न) देखील चोरीला गेले आहे. समर्थ झोळीत ठेवत असलेली तसेच दंडात बांधत असलेल्या मारोतीच्या मुर्त्याही चोरीला गेल्या. या प्रकरणाचे गांभीर्य कळताच स्थानिक पोलीसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
पोलिसांनी रात्री तीन वाजताच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चोरांनी पाळत ठेवून मूर्त्या चोरी केल्याची प्रार्थमिक माहिती आहे. या प्रकरणाचे पडसात विधानसभेत उमटल्याने आता पोलीसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. राज्याचे माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे विधानसभेत त्यांच्या मतदारसंघातील मूर्तिचोरीची घटना मांडली.
जालन्यातील समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जाम समर्थ गावातील मंदिरांमधील सातशे वर्षांपूर्वीच्या राम, लक्ष्मण, हनुमानाच्या मूर्ती काही अज्ञात चोरट्यांनी चोरल्या आहेत. या घटनेमुळे जनमानसाच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यभरातून लोक याठिकाणी दर्शनाला येतात. त्यामुळे याप्रकरणाची गृह विभागाने गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली.
याबद्दल उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला याबाबत सकाळीच माहिती मिळाली. मी या संदर्भात डीजींशी तात्काळ बोललो आहे. संपूर्ण ताकत लावून या प्रकरणाची चौकशी करावी आणि आरोपींना पकडून मुर्त्या परत आणाव्यात, असे आदेश दिले आहेत."
जांब समर्थ हे समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव
जांब समर्थ हे समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव आहे. हे ठिकाण जालना जिल्हयातील घनसावंगी तालुक्यामध्ये आहे. हे राम मंदिर रामदास स्वामी यांच्या घरामध्ये स्थित आहे. समर्थ मंदिर हे संत रामदास स्वामी यांच्या आठवणीमध्ये बनविण्यात आले आहे. एका संस्थेमार्फत या मंदिराचे व्यवस्थापन पाहिले जाते.