सेवाकार्य वाढविण्यासाठी झटणारे गिरीश

    21-Aug-2022   
Total Views |
girish
 
 
संघमय वातावरणात राहिलेल्या आणि पुढे नोकरी करताना व नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर जनकल्याण समितीच्या माध्यमातून सेवाकार्य करणार्‍या गिरीश दीक्षित यांच्याविषयी आज जाणून घेऊया...
 
 
बालपणापासूनच संघ संस्कारात वाढलेले गिरीश रामचंद्र दीक्षित हे रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या शिक्षण, आरोग्य, संस्कार, कृषी, स्वावलंबन, आपत्ती विमोचन व पूर्वांचल या सात आयामाच्या माध्यमातून सेवाकार्य वाढविण्यासाठी काम करीत आहेत. त्यांच्या जीवनप्रवासावर टाकलेला हा प्रकाश...गिरीश यांचा जन्म मुंबईतील विलेपार्ले येथे ३१ जानेवारी, १९५७ रोजी झाला. त्यांचे मूळगाव कोकणात गुहागर येथे आहे. पण गेली ४२ वर्षे ते डोंबिवलीत वास्तव्यास आहे. त्यांचे शालेय शिक्षण चिपळूण येथील ‘युनायटेड इंग्लिश स्कूल’ येथे झाले. शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला यामध्ये त्यांना विशेष रूची होती. त्यात त्यांनी अनेक पारितोषिकेदेखील मिळविली आहेत. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांची पावले मुंबईकडे वळली. मुंबई या मायानगरीत आल्यानंतर ’व्ही. पी. एम. कॉलेज’ येथून ‘मेकॅनिकिल इंजिनिअरिंग’मध्ये गिरीश दीक्षित यांनी डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. गिरीश यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. पण त्यांना अभ्यासात चांगली गती होती.
 
गिरीश यांचे वडील हे चिपळूण येथील रा. स्व. संघाच्या प्रभात शाखेचे सरकार्यवाह होते. संघाच्या प्रचारकांचे नेहमीच गिरीश यांच्या घरी येणे-जाणे होते. त्यामुळे त्यांची आई नलिनी या प्रत्यक्ष संघाच्या कामात सहभागी नसल्या, तरी त्यांचा सर्वांशी परिचय होता. पण त्या कधी प्रत्यक्षरीत्या संघाच्या कामात सहभागी होत नव्हत्या. मुकुंदराव पणशीकर, वसंतराव केळकर असे कोकणातील प्रचारक गिरीश दीक्षित यांच्या घरी ये-जा करीत असत. घरात संपूर्ण वातावरण रा. स्व. संघमय असले, तरी संघात गिरीश आणि त्यांचे वडील हे दोघेच जात होते. गिरीश यांना दोन बहिणी आहेत. त्यांची एक बहीण सध्या कोल्हापूर, तर दुसरी बहिण चिपळूण येथे वास्तव्यास आहे. गिरीश हे इंजिनिअरिंगसाठी मुंबईला आले असताना जोगेश्वरीला मामाकडे राहत होते. त्यावेळी त्यांनी संघाचे जोगेश्वरी नगरकार्यवाह म्हणून काम केले. हे काम त्यांनी तीन वर्षे केले. 1980ला ते डोंबिवलीत आले. सध्या ते डोंबिवलीतील आयरेगावात राहत आहेत.
 
१९७९ मध्ये ते ‘दि धरमसी मोरारजी केमिकल्स कंपनी लिमिटेड’मध्ये नोकरी करू लागले. नरिमन पॉईंटला ते प्रोजेक्ट विभागात कार्यरत होते. नोकरीत स्थिरावल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली होती. नोकरी मिळाल्याने आर्थिक स्थैर्य मिळाल्यानंतर ते १९८३ला प्रतिभा यांच्यासोबत विवाहबद्ध झाले. गिरीश हे नोकरीला लागल्यानंतर त्यांची परिस्थिती बदलली. १९७९ ते १९९६पर्यंत त्यांनी या कंपनीत नोकरी केली. १९९६ ते २००६ पर्यंत एका कंपनीत व त्यानंतर पुन्हा २००६ ते २०१५ पर्यंत एका इंजिनिअरिंग कंपनीत त्यांनी काम केल्यावर ते सेवानिवृत्त झाले. १९८० ला गिरीश दीक्षित डोंबिवलीत आल्यानंतर त्यांनी संघाचे काम करायला सुरुवात केली. ठाणे जिल्हा घोषप्रमुख म्हणून त्यांनी दहा वर्ष काम पाहिले. १९९८ पासून रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीत कल्याण जिल्हा सहकार्यवाहक म्हणून काम पाहू लागले. कल्याण जिल्हा कार्यवाहक हे पददेखील त्यांनी भूषविले. रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कोकण संभाग निधी प्रमुख म्हणून त्यांनी दहा ते बारा वर्ष काम पाहिले. सध्या रा. स्व. संघ जनकल्याण समिती कल्याण जिल्हा अध्यक्ष म्हणून ते कार्यभार पाहत आहेत.रा. स्व. संघ जनकल्याण समिती कल्याण जिल्ह्यामध्ये काम करीत असताना अनेक नवीन उपक्रम त्यांनी सुरू केले. जलसंधारणाच्या माध्यमातून शहापूर आष्टी येथे चेक डॅमची व्यवस्था केली. कार्डियाक रुग्णवाहिका एक मॉडेल म्हणून त्यांनी डोंबिवलीत सुरू केली.
 
गिरीश यांची दोन्ही मुले निलेश आणि गौरव यांनी त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत इंजिनिअरिंग केले. सध्या त्यांची डोंबिवलीत स्वत:ची इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी आहे. त्यांचे डोंबिवलीमध्ये कार्यालय असून या ‘एन. जी. इंजिनिअर्स’ या कंपनीचे सर्व कामकाज गिरीश आणि त्यांची दोन्ही मुले पाहतात.गिरीश यांनी कल्याण जिल्ह्यात एका वर्षात १०० सेवाकार्य सुरू केली व त्याबद्दल गिरीश यांना २००४ साली ‘जनकल्याण समिती’चा ‘अप्पासाहेब सोहनी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. कोरोना काळात ‘जनकल्याण समिती’ आणि कडोंमपाच्या माध्यमातून ३० हजार नागरिकांचे ‘स्क्रीनिंग’ केले आहे. कोरोना काळात कुणी घराबाहेर पडत नव्हते. त्यावेळी महापालिकेने जनकल्याण समितीला आवाहन केले होते की, एक टीम तयार करून घरोघरी जाऊन तपासणी केली. महापालिकेने या कार्यासाठी जनकल्याण समितीच्या टीमचा सत्कार केला होता. अशा सेवाकार्यासाठी झटणार्‍या व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.