आणखी किती नीतीभ्रष्ट होणार?

    21-Aug-2022   
Total Views |

yogita
 
 
 
की जम्मू-काश्मीरमधील येत्या निवडणुकीमध्ये तिथे तैनात असलेल्या निमलष्करी बल आणि निवासी सैनिकांना मतदान करण्याचा अधिकार देऊ नये, अशी भूमिका नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे फारूख अब्दुल्ला, पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फरन्सचेअध्यक्ष सज्जाद गनी लोन यांनी घेतली आहे. या सगळ्यांच्या समर्थनार्थ कोण उभे राहिले, तर काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्ष सैनिकांच्या मतदानाच्या हक्काविरोधात जनहित याचिका दाखल करणार आहे. थोडक्यात, काँग्रेस पक्ष प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातील अधिकाराला आव्हान देणार आहे. तसेही बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसला ‘जळके घर’ म्हणाले होते आणि काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईत निवडणूक हरावेत म्हणून यशस्वी प्रयत्न केला होता. हे सगळे विसरून कसे चालेल? खरेतर ‘३७०’ कलम हटवले, तेव्हाच जम्मू-काश्मीरमध्ये राहणार्‍या प्रत्येकाला भारतीयत्वाचे सगळे अधिकार आणि हक्क प्राप्त झाले. यापूर्वी तिथे वाल्मिकी समाज, डोग्रा समाज यांना हक्क-अधिकार नव्हते. आता येणार्‍या निवडणुकीमध्ये हे सगळे मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
 
  
 
दुसरे असे की, काश्मीरमध्ये तैनात सैनिक आणि निमलष्करी बल तसेच व्यावसायिक, नोकरदार काश्मीर आणि देशहिताला अनुकूल असेच मतदान करणार, असे असताना काँग्रेस विरोध का करत आहे? काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपीए, पीपल्स कॉन्फरन्स हे पक्ष फुटिरतावाद्यांना, दहशतवाद्यांना विरोध करताना कधीही दिसले नाहीत. यांच्या सत्ताकाळातच काश्मीरमध्ये दहशतवाद आणि हिंसाचार बोकाळला. या लोकांनी निवासी सैनिकांना आणि निमलष्करी बलांना काश्मिरमध्ये मतदानाचा हक्कदेऊ नये, असे म्हणणे समजू शकतो. मात्र, यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षही उतरला? आणि या विरोधाला समर्थन करण्यासाठी ते आणखीन सहयोगींना बोलवत आहेत. ते कोण आहेत, तर जेकेपीसीसी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रमन भल्ला, भाकप(मार्क्सवादी)चे नेते मोहम्मद युसूफ तारिगामी आणि आम आदमी पक्षालाही निमंत्रण धाडले आहे. भारतीय राज्यातील इतर नागरिकांवर आणि सैनिकांवर अविश्वास दाखवणार्‍या काँग्रेस पक्षाचे भारतीयत्व आणि देशाबद्दलची निष्ठा किती तकलादू आहे, हे यानिमित्ताने समजले. काँग्रेस पक्ष सत्तेसाठी आणि भाजपविरोधासाठी आणखीन किती नीतीभ्रष्ट होणार?
 
 
 
कोणाला सांभाळायचं?
 
 
मी प्रेम, आपुलकी, विश्वास, साथ या अशा गोष्टी आहेत की, त्या एका स्तरावरच्या नसतात. दोघांकडूनही या सगळ्यांची पूर्तता झाली, तरच नातेसंंबंध टिकतात आणि वृद्धिंगत होतात. नाहीतर काय होते? हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या बहुसंख्य आमदारांनी दाखवून दिले आहे. एकाने कायम प्रेम-आदर द्यायचा आणि दुसर्‍यांनी कायम आदेश आणि मालकीहक्कदाखवायचा, हे नात्यात किंवा कोणत्याही प्रकारच्या स्नेहप्रेमात कधीही, कायमस्वरूपी चालत नाही. अर्थात, याची ग्वाही उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंसोबत येणार्‍या सगळ्याच आमदारांनी दिली आहे. कुणी सांगितले की, कर्करोगाने पीडित असतानाही कुणीही आमची विचारपूस केली नाही. कुणी सांगितले की, राजकीय दु:स्वास किंवा इतर संकट आले असता आमच्या दैवत नेत्याने आम्हाला धीर दिला नाही. आपुलकीचा एक शब्द उच्चारला नाही. आपल्या नेत्याने आपल्या सुख-दु:खात आपल्याला साथ दिली नाही, या शल्याने व्यथित होऊन कित्येक जण एकनाथ शिंदेंच्या छावणीत रूजू झाले.
 
 
 
आता या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनीं महाराष्ट्रातील जनतेला आवाहनकेले की, “आम्हाला सांभाळून घ्या. एकटे पडू देऊ नका.” आदित्य ठाकरेंच्या या आवाहनाबद्दल सामान्य मराठी माणसाचे मत काय असेल? तर मराठी माणूस मनात म्हणाला असेल की, “मोठे साहेब म्हणजे आमचे दैवत म्हणाले होते की, ‘साहेबांना सांभाळा.’ त्यांचा आदेश मानून आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सांभाळले. आता त्यांचे नातू आदित्य ठाकरे म्हणतात की, आम्हाला सांभाळा. आम्हाला एकटे पडू देऊ नका. आता काय सांगावं? साहेब, आम्ही कोरोना काळात एकटे पडलो होतो. तेव्हा तुम्ही कुठे होतात? ‘लॉकडाऊन’ने आमचं कंबरडं मोडलं होतं. खाण्याची मारामार होती. चालताबोलता माणूस पटकन मरत होता. रुग्णवाहिका तर मिळत नव्हतीच, पण मेल्यावर आमच्या लोकांचे हाल कमी झाले नाहीत. तेव्हा आम्हाला कोणी सांभाळायला नव्हतं. तेव्हा आमचे त्यावेळचे सीएम साहेब ‘फेसबुक लाईव्ह’ यायचे. विनोद करायचे. पण त्यांचा विनोद ऐकायला आणि सल्ले ऐकायला मन कुठे ताळ्यावर होतं? आदित्य साहेब तुम्ही मंत्री होतात, पण त्याकाळात तुम्हीसुद्धा कुठे दिसला नाहीत. त्यावेळी आम्हाला कोणी सांभाळले नाही. नरेंद्र मोदींनी रेशन दिले, कोरोनाची लस दिली आणि आम्ही जगलो. आता आदित्य साहेब सांगा, आम्ही महाराष्ट्रीय जनतेने कुणाला सांभाळायचं आणि का सांभाळायचं?”
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.