मुंबई (प्रतिनिधी, गायत्री श्रीगोंदेकर) : राज्यातील फडणवीस-शिंदे सरकारने गोविंदा पथकांबाबत घेतलेल्या आर्थिक मदत, तसेच पुढील वर्षापासून विमा संरक्षण आदी निर्णयाला काही राजकीय पक्षांकडून विरोध करण्यात येत आहे. मात्र, या निर्णयाबाबत दोन वर्षांपूर्वी जखमी झाल्याने उपचारांवर लाखोंचा खर्च झालेल्या आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक ओढाताणीचा सामना करणार्या गोविंदाच्या भावना नेमक्या काय? राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय तरुण गोविंदांसाठी कसा फायदेशीर आहे, यासंदर्भातील प्रतिक्रिया ‘मातोश्री’ या गोविंदा पथकातील सागर उतेकर याच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधत जाणून घेतली.
राज्य सरकारचा निर्णय काय?
कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने होणारा दहीहंडी उत्सवाचा समावेश साहसी खेळांमध्ये करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. सरकारतर्फे ‘प्रो-गोविंदा स्पर्धा’ भरवण्याचा निर्णय घेतला असून या स्पर्धेत बक्षिसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येणार असल्याचेही एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. गोविंदांना शासनसेवेत पाच टक्के आरक्षण देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जखमी गोविंदांच्या उपचाराचा खर्चही आता राज्य सरकार करणार आहे. या निर्णयाचे गोविंदा पथकांकडून स्वागत करण्यात आले आहे.
या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देण्यापूर्वी सागर उतेकर याने आपल्या अपघाताविषयी माहिती देताना सांगितले, “२०१८ साली आम्ही दरवर्षीप्रमाणे मुंबई आणि उपनगरातही दहीहंडी उत्सवासाठी आलो होतो. ठाण्यातील आ. प्रताप सरनाईक यांच्या मानाच्या दहीहंडीत सलामी देण्यासाठी आमचे पथक दाखल झाले. आम्ही नऊ थर लावले होते. मी यामध्ये पायथ्याशी होतो. दहीहंडीच्या उत्सवात मी लहानपणापासून सहभागी व्हायचो. मात्र, आमचा थोडासा अंदाज चुकला. थर जागेवरून हलला आणि मी खाली पडलो. सर्वच थर खाली कोसळल्याने माझ्या पायाचे आतल्या बाजूने दोन-तीन तुकडे झाले. पडल्यानंतर मला काय झाले ते कळलेच नाही. पायात काहीच संवेदना नाही तसाच मी बेशुद्ध झालो. ताबडतोब आयोजक आणि पथकातील मित्रांनी मला त्याच अवस्थेत कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल केले. गंभीर जखमी असल्याने मला घाटकोपरमधील हिंदूसभा रुग्णालयात आणण्यात आले. तिथेही बेड उपलब्ध होत नव्हता. मात्र, तत्कालीन स्थानिक लोकप्रतिनिधी संजय भालेराव यांना सांगून बेड उपलब्ध झाला.
संपूर्ण उपचारासाठी १ लाख ६० हजार खर्च आला
पुढे सागर उतेकरने सांगितले की, माझ्या पायावरील संपूर्ण उपचारासाठी १ लाख ६० हजार इतका खर्च आला. ‘मातोश्री’ गोविंदा पथक, हिंदूसभा रुग्णालयातील ट्रस्ट आणि माझ्या कुटुंबाने मिळून उपचाराचा सर्व खर्च केला. दरवर्षी साधारण ७० ते ७८ गोविंदांचे असे अपघात एकट्या मुंबईत होत असतील. त्यातील ३० ते ४० गोविंदा गंभीर जखमी होतात. या गोविंदांचा उपचाराचा खर्च पथक किंवा कुटुंबीय आजपर्यंत करत होते. मात्र, आता राज्य सरकारने उपचार खर्चाचा भार घेतल्याने गोविंदांना अधिक चांगले उपचार मिळू शकतील,” असा विश्वास उतेकरने व्यक्त केला.
१५० तरुणांपैकी १५ तरुणांना जरी नोकरी मिळाली, तरी सन्मानजनक बाब
“अपघातानंतर अनेक गोविंदांना कुटुंबीय पथकात आणि दहीहंडीत सहभागी होण्यासाठी पाठवत नाहीत, असे दिसून येत. पथकात असणार्या सर्वच गोविंदांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. अनेकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते. उत्सवात सहभागी होण्याच्या उत्सुकतेमुळे ते पथकात सहभागी होतात. अनेक जण काम सांभाळून इथे सरावाला हजर होतात. काही जण विविध खेळात निपुण असतात, विविध कौशल्ये या गोविंदांमध्ये आहेत. काही सुशिक्षित आणि छोटी-मोठी नोकरी सांभाळूनही पथकामध्ये तीन ते चार महिने मन लावून सराव करत असतात. त्यामुळे पथकातील १५० तरुणांपैकी १५ कौशल्यपूर्ण तरुणांना जर सरकार नोकरी देत असेल, त्यांच्या कौशल्याला दाद देत असेल तर नक्कीच सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो,” असेही या गोविंदाने सांगितले.