नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘जल जीवन मिशन’अंतर्गत ‘हर घर जल’ उत्सवाला ध्वनिचित्रफीत संदेशाद्वारे संबोधित केले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यावेळी उपस्थित होते. भारताने अमृतकाळामध्ये ज्या मोठ्या उद्देशांवर काम सुरू केले, त्यासंबंधित तीन महत्त्वाचे टप्पे आज पूर्ण झाले. त्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
पंतप्रधान म्हणाले की, “सर्वप्रथम, आज देशातील दहा कोटी ग्रामीण कुटुंबे जलवाहिनीद्वारे शुद्ध पाण्याच्या सुविधेशी जोडली गेली आहेत. प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याच्या सरकारच्या मोहिमेचे हे मोठे यश आहे. हे ‘सबका प्रयास’चे उत्तम उदाहरण आहे. त्याचप्रमाणे मोहिमेचे १०० टक्के लक्ष्य गोव्याने पूर्ण केल्याविषयी त्यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच देशातील विविध राज्यांमधील एक लाख गावे ‘ओडीएफ प्लस’अर्थात हागणदारमुक्त झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जगासमोर असलेले जलसुरक्षेचे आव्हान अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, “विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यात पाणीटंचाई हा मोठा अडथळा ठरू शकतो. केंद्र सरकार गेल्या आठ वर्षांपासून जलसुरक्षेच्या प्रकल्पांसाठी अथक प्रयत्न करत आहे,” असे ते म्हणाले. जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने बहुआयामी दृष्टिकोन ठेवला आहे, याविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, “पावसाचा थेंबन्थेंब साठवण्यात यावा, ‘अटल भूजल योजना’ , प्रत्येक जिल्ह्यामध्ये ७५ अमृत सरोवरे’ तयार करणे, नदीजोड प्रकल्प आणि ‘जल जीवन मिशन’ यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत,” असेही नमूद केले.