मुंबई : दिग्दर्शक, लेखन, अभिनेता प्रवीण तरडे मराठी चित्रपट सृष्टीतील महत्त्वाचे नाव आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी तुडुंब प्रतिसाद दिला आहे. त्यांनी लिहिलेले, दिग्दर्शित केलेले 'मुळशी पॅटर्न', 'धर्मवीर', 'हंबीरराव', 'देऊळबंद' हे या चित्रपटांनी तर बॉक्सऑफिसवर कमालीची कमाई केली होती. आपल्या कृषीप्रधान संस्कृतीवर, परंपरेवर त्यांचे विशेष प्रेम आहे. आणि ते त्यांच्या अभिनयात, लेखनातही दिसून येते. एवढेच नाही तर प्रवीण तरडे वेळात वेळ काढून आपल्या गावी जाऊन स्वतः हातात नांगर घेऊन शेती करतात. तरडे यांनी आज या बद्दल एक व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना छान संदेशही दिला आहे. .
प्रवीण तरडे अनेकदा शेती करत असतानाचे व्हिडिओज शेअर करत असतात. कधी भातशेती करताना, कधी पावसामध्ये शेतात फिरताना; आता शेतीच्या कामाला वेग आला असताना तरडे चक्क स्वतः नांगर घेऊन शेती करत आहेत. प्रवीण तरडे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये बैलजोडी घेऊन ते स्वतः शेती करत आहेत, व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला 'काळ्या मातीत मातीत तिफन चालते' हे गाणं ऐकू येत आहे.
प्रवीण तरडे यांनी या व्हिडिओ छान कॅप्शन देत म्हटले आहे, 'हा चिखल पायालाच काय तर अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला जात नाही कारण, आपल्या कैक पिढ्यांनी हा चिखल दागिन्यासारखा मिरवला आहे, आपणही मिरवू या..' असा संदेश त्यांनी या व्हिडिओमधून दिला आहे. त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्स करत आपल्याही गावाकडच्या आठवणी त्यांच्याशी शेअर केल्या आहेत.