भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण सर्वांनीच मोठ्या उत्साहात आणि उत्सवपूर्ण वातावरणात साजरे केले. दि. 15 ऑगस्ट, 1947... पारतंत्र्याच्या श्रृंखलेत जखडलेल्या आपल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळाले तो दिवस... इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतमाता मुक्त झाली तो दिवस... सुमारे दीडशे वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. खरे तर 1757 साली झालेल्या प्लासीच्या लढाईत विजय मिळविल्यापासूनच इंग्रजांनी हिंदुस्थानात पाय रोवायला सुरुवात केली होती. ‘दे दि हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल’ असे पोकळ वक्तव्य करणार्यांनी म्हणूनच इतिहासाची सोनेरी पाने चाळून पाहायला हवी.
क्रांतिकवी गोविंदांनी मातृभूच्या स्वातंत्र्यासाठी रचलेले ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ हे गीत वाचले की, लक्षात येतं, कोणत्याही देशाला स्वातंत्र्य हे बिनाखड्ग, बिनाढाल मिळत नाहीच! त्यासाठी रक्ताचे अर्घ्य अर्पण करावेच लागते. 1909 साली जेव्हा हे गीत क्रांतीवीर बाबाराव सावरकरांनी प्रकाशित केलं तेव्हा त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरण्यात आला आणि त्यांना जन्मठेपही भोगावी लागली होती.
या कवितेच्या पहिल्या आठ चरणात कवीने, भारताप्रमाणेच पारतंत्र्य भोगलेल्या इतर सहा देशांचे वर्णन केले आहे. आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी तेथील लोकांनी केलेल्या स्वातंत्र्यलढ्याचे वर्णन करताना शाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर म्हणतात,
‘घनश्याम श्रीराम कां मूढ होता?
कराया स्वमाता मही दास्य मुक्ता।
वृथा कां तयाने तदा युद्ध केलें?
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?
भगवान श्रीरामाने रावणाच्या तावडीतून आपला देश वाचविण्यासाठी रावणाशी युद्ध करून त्याचा संहार केला. रणाविण स्वातंत्र्य मिळणार नाही, हे प्रभू श्रीरामांनाही ठाऊक होते.
किती धाडिले अर्ज त्या नेदरांनी।
बहु प्रार्थिले शत्रू भिक्षेश्वरांनी।
तधीं काय तद्राज्य झोळीत आलें।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?
दुसर्या कडव्यात ते म्हणतात, हॉलंडमधील नेदरलँड्सच्या लोकांनी, डचांनी आपल्या देशाच्या मुक्ततेसाठी किती आर्जवे केली? आधी स्पेन व नंतर फ्रान्सचे वर्चस्व यापासूनसुटण्यासाठी त्यांनी ‘भिक्षेश्वर’ गुप्त संस्था स्थापून क्रांतीलढा दिला होता. भीक्षेमुळे त्यांना राज्य मिळाले नाही. पुढे ते ग्रीकांना तुम्ही तुमच्या शत्रूंना, तुर्कांना कसे पिटाळले ते विचारा, असे सांगतात-
तुम्ही मेळविला कसा राष्ट्र-मोक्ष।
विचारा असे ग्रीक लोकां समक्ष।
न युद्धाविना मार्ग मोक्षा निराळे।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?
पुढे ते स्विस लोकांना त्यांनी बलवान फ्रान्सपासून कसे स्वातंत्र्य मिळविलेत? हे विचारा म्हणतात,
खलांच्या बलांच्या धरुनी भयाला।
प्रतिकार मेंगा स्विसांनी न केला।
झणी ते सुसंग्राम यज्ञा निघाले।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?
दुष्ट फ्रेंच राजवटीच्या बलाने भयभीत होऊन स्विस लोकांनी मेंगळट भूमिका घेतली नाही. ते निर्भयपणे लढले, हे सांगताना पुढे ते नेपोलियनच्या पश्चात टायरोलने बलाढ्य ऑस्ट्रियापुढे न झुकता खड्गाच्या जोरावर रणांगणातून स्वातंत्र्य कसे खेचून आणले हे विचारा, असे कवी सांगतात.
नमीना रिपुंना अहो! टायरोल। वरीना भिकेला अहो! टायरोल। स्वखड्गास त्याने परी प्रार्थियेले।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?
करावा परांचा वृथा प्राण नाश।
अशी होति कां? हौस त्या श्री शिवास।
किती बंधुंचे रक्तबिंदू गळाले।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?
कवी म्हणतात, त्या छत्रपती शिवरायास विचाराविनाकारण रक्तपात करायची हौस होती का? स्वबांधवाचे रक्त त्याने उगाच गाळले का? नाही! रणावीण स्वातंत्र्य मिळतच नसते, हे त्यांनाही ठाऊक होते. इटली, अमेरिका अशा अनेक देशांनी दास्याच्या बेड्या तोडण्यासाठी शस्त्र हाती घेतलेच होते. रणावीण स्वातंत्र्य मिळतच नाही, हा भूतकाळातील इतिहासाचा सिद्धांत आहे आणि स्वराज्य ज्यांना हवे आहे, त्यांनी युद्ध केले पाहिजे, असे विषद करताना कवी म्हणतात-
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना।
असा भूतकालीन सिद्धांत जाणा।
स्वराज्येच्छुनें पाहिजे युद्ध केलें।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?
खरे तर भारताचा स्वातंत्र्य संग्राम हा 1857च्या आधीच सुरू झाला होता. 1857च्या उठावापूर्वीच भवानी पाठक आणि शेख मजनू या संन्यासी-फकीरांनी इंग्रजांनी राज्यविस्तार करीत असताना केलेल्या अन्याय-अत्याचाराविरोधात लढा सुरू केला होता. प्लासीच्या लढाईनंतर धूर्त राजकारणी इंग्रजांनी संताळ पहाडिया या वनवासी जमातीत भांडणे लावून आपले पाय पसरण्याचा प्रयत्न करीत असताना बाबा तिलका मांझी यांनी आवाज उठवला होता, तर त्रावणकोरचा दिवाण वेल्लू थापी यांनीही मातृभूमीच्या स्वातंत्र्याची शपथ घेत इंग्रजांच्या अत्याचाराविरोधात बंड केला होता.
आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले, ते अनेकांनी अनेक दशके ब्रिटिश सत्तेशी केलेल्या संघर्षामुळेच! या भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी याच देशातील चार पिढ्यांनी परकीय सत्तेशी झुंज दिली. 1857च्यास्वातंत्र्य समरापूर्वी ही अनेक क्रांतिकारक लढले आणि त्यानंतरही सेनापती तात्या टोपे, झाशी राणी लक्ष्मीबाई, चेन्नामा, बेगम हसरत महाल, बहादुरशहा जफर, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, विनायक सावरकर, अनंत कान्हेरे, रासबिहारी बोस, भगतसिंह, राजगुरू, चंद्रशेखर आझाद अशा अनेक क्रांतीसेनानींच्या नेतृत्वात सहस्त्रावधी क्रांतिकारक लढले. कित्येकांनी आपले प्राण या स्वातंत्र्य वेदीवर अर्पण केले, कित्येकांनी आपल्या रक्ताचे अर्घ्य या भारतमातेच्या चरणी अर्पण केले.
कित्येकांनी तुरुंगवास भोगत अंदमानसारख्या भागात अनेक वर्षे नरक यातना भोगल्या. कितीतरी जीव चंदना सारखे झिजले. ‘जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले,’ असे कवी विनायक कुलकर्णी यांनी लिहिलेय ते उगीच नाही. सशस्त्र क्रांती युद्धात उतरलेले अनेक होते तसेच निशस्त्र राहून क्रांतिकारकांना माझी माय भूमी स्वतंत्र झाली पाहिजे, यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या क्रांती वेदीवर उतरलेलेही अनेक क्रांतिकारक या स्वातंत्र्य वेदीवर आपली महत्त्वाची भूमिका बजावून गेले. मग क्रांतिकार्यासाठी पैसा पुरवणे असो, शस्त्रांची ने-आण करणे असो किंवा संदेशवहन असो, अशा अनेक छोट्या-मोठ्या कार्यात सहकार्य करणारे अनेक क्रांतिदूत होऊन गेले आणि यात नागाराणी गायडीनिलु, सुनीती चौधरी, शांती घोष, सरोजिनी नायडू, प्रीतीलता, दुर्गाभाभी अशा कितीतरी महिलांचा सहभागही खूप मोलाचा होता.
क्रांतिकारकांनी ज्या स्वातंत्र्याचा ध्यास घेत, अनेक हालअपेष्टा, यातना सोसत प्रसंगी प्राणाची आहुती या स्वातंत्र्ययुद्धात समर्पित केली, त्या स्वातंत्र्याचा त्यांचा हेतू खरंच पूर्ण झाला का? स्वराज्याचे सुराज्य झाले का? सन्मानाने जगता यावे, अशी परिस्थिती निर्माण झाली का? लोकशाहीचा योग्य अवलंब झाला का? संस्कारांनी माणूस घडावा, मनामनात देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा रुजावी या क्रांतिकारकांच्या अपेक्षांची पूर्ती झाली का? स्वातंत्र्य वेदीवर रक्त सांडलेल्या महिलावर्गाला योग्य सन्मान मिळतो का? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत.
आज भारत महासत्ता होणार, असे चित्र समोर असताना, आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आदर्श आपण विसरणार असू, मानवता धर्माला तिलांजली देत दीन हीन सेवा विसरत महिलांवर अन्याय-अत्याचार असेच सुरू ठेवणार असू, आत्मकेंद्रित जीवन जगत, स्वार्थी, भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब करणार असू तर भारत महासत्ता होऊनही काय उपयोग? केवळ भौतिक प्रगतीत सुख मानत इतिहासाचा विसर पडणे, हे भविष्यासाठी अतिशय घातक आहे. ज्यावेळी वर्तमानात आदर्श दिसत नाही, त्यावेळी त्या देशाच्या जडणघडणीत पारतंत्र्याच्या शृंखलेत जखडलेल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी, जाती, पाती, धर्म, भेद, विसरून मनीमानसी मायभूमीच्या मुक्ततेचा ध्यास घेत, ज्यांनी अनंत यातना सोसत, प्रसंगी प्राणार्पण देत या मायभूमीला मुक्त केले, त्या वीरांची तेजस्वी जीवने इतिहासाची सोनेरी पाने चाळून समोर ठेवली, तर क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाचे फलित भारत सर्वार्धाने महासत्ता होत जगासमोर आदर्श प्रस्थापित करेल यात शंका नाही.
देशासाठी लढले कण कण तेच
खरोखर विजयी जीवन....
- अपर्णा पाटील-महाशब्दे