डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ते जगदीप धनखड : भारतीय उपराष्ट्रपतीपदाची परंपरा

    20-Aug-2022
Total Views |


wer 
 
 
 
सर्वसामान्य भारतीय माणसाला राज्यसभा,विधान परिषद, उपराष्ट्रपती या निवडणुकांविषयी फारशी माहिती नसते. वृत्तपत्रात बातम्या येतात तेव्हा भारतीय मतदारराजाला या भारतीय राज्यघटनेतील व भारतीय राज्यव्यवस्थेतील कळीच्या घटकांविषयी माहिती होते. काही वेळेला या निवडणुका बिनविरोध होतात. त्यामुळे त्या फार चर्चेतही येत नाहीत.अर्थात, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींमुळे आपण राजकीय घडामोडींबाबत इतके बहुश्रुत झालो आहोत. पण, त्यात माध्यमनिर्मित रंजकतेचा भाग अधिक आहे. ‘आयपीएल’ आणि चित्रपटाबाबत आपण जितके जागरूक असतो, तितकेच आपण राजकीय बाबतीत जागरूक असणे आवश्यक आहे ; अन्यथा उपराष्ट्रपतीपदी जगदीप धनखड यांची निवड ही आपल्यासाठी केवळ निव्वळ बातमी ठरेल. तशी ती नाही यासाठीच हा लेखनप्रपंच!
 
मुळात उपराष्ट्रपतीपद कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जातो आणि उपराष्ट्रपती पदी विराजमान व्यक्ती नेमके करतात काय? हा दुसरा प्रश्न. या प्रश्नांची उत्तरे भारतीय संविधान देते. संविधानाच्या पाचव्या भागात पहिले प्रकरण भारताच्या कार्यकारी यंत्रणेविषयी आहे. त्यातील ‘कलम 63’ ते ‘71’ ही कलमे उपराष्ट्रपतीपदासंदर्भातील आहेत.
 
  
राज्यपालपदाची पृष्ठभूमी
 
भारताचे माजी उपराष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांनी बिहारचे राज्यपालपद भूषविले होते.वराह गिरी व्यंकट गिरी हे तिसरे उपराष्ट्रपती 1957 ते 1967 अशी दहा वर्षे उत्तर प्रदेश,केरळ व तत्कालीन म्हैसूर या राज्यांचे राज्यपाल होते. बी. डी. जत्ती हे पाँडिचेरीचे उपराज्यपाल व ओडिशाचे राज्यपाल होते.डॉ. शंकरदयाळ शर्मा हे आंध्र प्रदेश, पंजाब व महाराष्ट्राचे राज्यपाल होते. श्री कृष्ण कांत हे आंध्र प्रदेश व तामिळनाडूचे राज्यपाल होते.
 
 
माजी मुख्यमंत्री असलेले उपराष्ट्रपती
 
बी. डी. जत्ती हे माजी उपराष्ट्रपती हे जमखंडी या संस्थानचे व तत्कालीन म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री होते. शंकरदयाळ शर्मा हे तत्कालीन भोपाळ राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले होते. श्री भैरोसिंह शेखावत हे राजस्थानचे तीन वेळेला मुख्यमंत्री होते.
 
 
‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित उपराष्ट्रपती
 
भारताच्या उपराष्ट्रपती पदावर काम केलेल्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. झाकीर हुसेन, व्ही. व्ही. गिरी यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
 
लेखक उपराष्ट्रपती
 
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे जागतिक कीर्तीचे तत्वज्ञ होते. ते उपराष्ट्रपती झाले तेव्हा राजकीय तत्वज्ञानाचे जनक प्लेटो यांच्या स्वप्नातील तत्वज्ञ राजा ही संकल्पना साकारल्याचे मानले गेले. डॉ. झाकीर हुसेन हे नामवंत शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी प्लेटोच्या ‘गणराज्य’ या ग्रंथाचे उर्दू भाषांतर केले होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे ही नियमितपणे स्तंभलेखन करत असत.
 
 
उपराष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी आणि काँग्रेस पक्षातील फूट
  
व्ही. व्ही. गिरी हे राज्यपाल होण्यापूर्वी केंद्रीय कामगार मंत्री होते. त्यापूर्वी ते भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त होते. 1967 साली ते उपराष्ट्रपती झाले. 1969 साली तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचे निधन झाले, तेव्हा काँग्रेस पक्षातील एका गटाने नीलम संजीव रेड्डी यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली.पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मात्र काँग्रेसच्या रेड्डी यांना पाठिंबा नव्हता. त्यांनी काँग्रेस पक्ष सदस्यांना स्वविवेकाने मत देण्याचे आवाहन केले होते. तत्कालीन उपराष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी हे राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नव्हते. मात्र, ते राष्ट्रपतीपदी निवडून आले. या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षात फूट पडली. ‘इंदिरा काँग्रेस’ पक्षाची स्थापना झाली. काळाच्या ओघात ‘इंदिरा काँग्रेस’ हाच मूळ व खरा काँग्रेस पक्ष ठरला.
 
 
उपराष्ट्रपती जगदीप धनखड
 
नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे बंगालचे राज्यपाल होते. जनता दलाचे खासदार होते. तसेच पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे मुळचे राजस्थानचे आहेत.पूर्व उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत हेही राजस्थानचे होते. सध्याचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हेही राजस्थानचे आहेत.
 
 
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील विरोधी उमेदवार
 
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभ्या राहिलेल्या, मात्र निवडून न आलेल्या व्यक्तीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. आत्ताच्या निवडणुकीतील संपुआच्या उमेदवार मार्गारेट अल्वा या केंद्रात मंत्री होत्या. विशेष म्हणजे त्यांच्या सासूबाई व्हायोलेट अल्वा याही राज्यसभेच्या उपसभापती होत्या. याहून विशेष म्हणजे, मार्गारेट अल्वा यांचे सासरेही त्याच काळात राज्यसभेचे सदस्य होते. यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही 2002 साली काँग्रेसने उपराष्ट्रपती निवडणुकीत उमेदवारी दिली होती. शिंदे पुढे केंद्रीय गृहमंत्री झाले. माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील या 1986 ते 1988 या काळात राज्यसभेच्या उपसभापती होत्या.
 
 
उपराष्ट्रपतींची घटनात्मक भूमिका
 
भारतीय राज्यघटनेतील ‘कलम 63’ ते ‘कलम 71’ मध्ये उपराष्ट्रपतीपदासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. ‘कलम 64’ नुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. इथे लक्षात घेतले पाहिजे की, राज्यसभा हे राज्यांचे सभागृह असते. राज्यसभा हे अमेरिकेतील सिनेटप्रमाणे राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे.अमेरिकेतही उपराष्ट्रपती सिनेटचे पदसिद्ध सभापती असतात.
 
 
अमेरिकेत काही कारणाने राष्ट्रपती पद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती उर्वरित पूर्ण काळासाठी राष्ट्रपती होतात. भारतात अशा परिस्थितीत तात्पुरत्या स्वरुपात उपराष्ट्रपती यांच्याकडे कार्यभार येतो. मात्र, हा कायमस्वरूपी पदभार नसतो. उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून काम पाहतात, तेव्हा त्यांना राष्ट्रपतींचे सर्व अधिकार असतात. ही तात्पुरती व्यवस्था असते. त्यानंतर राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होते.
 
 
 

75 
 
 
 
राज्यांच्या हितरक्षणात उपराष्ट्रपतींची अप्रत्यक्ष भूमिका
 
इंग्लड हे एकात्म स्वरूपाचे राज्य आहे. ‘एकात्म राज्य’ याचा अर्थ इंग्लंड भौगोलिकदृष्ट्या लहान देश असल्यामुळे तेथे भारताप्रमाणे घटकराज्य सरकार नसते.इंग्लंडमध्ये शहरपातळीवर नगरपालिका व त्यानंतर थेट केंद्र सरकार आहे. त्यामुळे तिथे घटकराज्यांचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभा किंवा सिनेट असे सभागृह अस्तित्वात नाही.याउलट अमेरिका, कॅनडा ही संघराज्य आहेत.कारण, अमेरिका, कॅनडा हे भौगोलिकदृष्ट्या खूप मोठे देश आहेत. त्यामुळे तेथे घटकराज्य सरकार आहेत. घटकराज्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी तेथे संघराज्यव्यवस्था स्वीकारली आहे.
 
 
भारत इंग्लंडप्रमाणे एकात्म राज्य नाही.पण, अमेरिका, कॅनडाप्रमाणे पूर्णपणे संघराज्य नाही. राज्यशास्त्राचे अभ्यासक भारताला ‘अर्धसंघराज्य’ असे म्हणतात.भारतात राज्यसभा हे राज्यांचे सभागृह आहे. या राज्यसभेचे पदसिद्ध सभापतीपद उपराष्ट्रपतींकडे असते. एकप्रकारे राज्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यात उपराष्ट्रपती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
 
 
स्वतंत्र व निष्पक्ष उपराष्ट्रपतीपदाची भारताची परंपरा
 
भारताचे प्रथम उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती होण्यापूर्वी भारताचे रशियातील राजदूत होते.स्टालिन हा साम्यवादी रशियाचा हुकूमशहा होता. साम्यवादी व्यवस्थेत स्वतंत्र विचारांना थारा नसतो. मात्र, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भयमुक्त तत्वज्ञ होते. त्यांनी प्रसंगी स्टालिनलाही आपले म्हणणे सुनवायला कमी केले नाही.
 
 
कृष्णकांत हे भारताचे माजी उपराष्ट्रपती होते. त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या मागे कोणतीही संपत्ती नव्हती. कृष्णकांत यांनी आयुष्यभर चरख्यावर सुत कातले. त्या सुतापासून बनविलेले दोन सदरे, पायजमे त्यांनी आयुष्यभर वापरले. कृष्णकांत हे राज्यसभेचे सभापती होते तेव्हा त्यांनी समाजातील वंचित वर्गासाठी आपले अधिकार वापरले. ते सभापती असताना ज्येष्ठ समाजसेवक, चित्रकुटग्राम विकास प्रकल्पाचे निर्माते ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित नानाजी देशमुख हे राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त सदस्य होते. कृष्णकांत व नानाजी देशमुख यांच्यातील राज्यसभेतील संवाद स्मरणीय स्वरूपाचा आहे.
  
 
 -श्रीनिवास भोंग