समाजाच्या मांगल्यासाठी...

    02-Aug-2022   
Total Views |

mansa
 
 
 
मुंबईमध्ये प्रशासकीय सेवेत उच्चपदावर विराजमान असताना देश आणि समाजाच्या मांगल्याचा वसा घेणार्‍या शोभा शेलार. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला हा मागोवा...
 
 
रस्त्यावर भीक मागणार्‍या बालकांना पूर्वी बालसुधारगृहात नेले जायचे. या पद्धतीव्यतिरिक्त या बालकांचा विकास कसा करता येईल, याचा अभ्यास शोभा शेलार यांनी केला. या सगळ्या पद्धतीवर चिंतनशील अभ्यास करत, त्यांनी समन्वयातून ‘बालसुरक्षा’ ही संकल्पना मांडली. या संकल्पनेनुसार बालकांना आई आणि वडिलांइतका विश्वास आणि प्रेम कोणतीही संस्था देऊ शकत नाही. या मुलांना बालसुधारगृहात नेण्यापेक्षा ती जिथे आहेत, तिथेच या बालकांचा विकास करायचा.
बालविकासासाठी कार्यरत असणार्‍या प्रशासकीय संस्थांना एकत्रित करून त्याद्वारे या बालकांचा विकास करायचा.
 
 
ही योजना सध्या काही दिवसांतच ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ या मुंबईतील प्रभागांत सुरू होणार आहे. ही योजना या दोन प्रभागांत उपयुक्त ठरली तर ही योजना महाराष्ट्रभर राबवली जाणार आहे. बालकांसाठी आत्मीयतेने आणि अत्यंत वास्तववादी योजनांची संकल्पना मांडणार्‍या शोभा शेलार कोण आहेत? त्या मुंबई जिल्हा महिला बालविकास अधिकारी आहेत. मुंबईतील सर्वच महिला आधारगृह, बालकाश्रम आणि तत्सम संस्था या त्यांच्या अखत्यारित येतात. तसेच केंद्र आणि राज्य सरकारचे महिला आणि बालकांसाठीचे ज्या काही कल्याणकारी योजना आहेत, त्या कार्यान्वित करण्याचे काम महिला बालविकास अधिकारी म्हणून शोभा शेलार करतात. शोभा म्हणतात, “समन्वयातून बालसंरक्षण ही योजना कार्यान्वित करणे हे एक ‘टीम वर्क’ आहे. माझ्या सोबतच्या सगळ्या सहकार्‍यांच्या तळमळीतून आणि कष्टातून ही योजना साकार होत आहे.”
 
 
समाजासाठी अहोरात्र कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे शोभा. इतक्या मोठ्या अधिकार क्षेत्रामध्ये असतानासुद्धा शोभा मानवी मूल्यांच्या आधारावर सामाजिक चिंतन आणि कार्य करतात. त्यामुळेच काल-परवाच एक सहा महिन्यांची मुलगी एका ठिकाणी विकायला आणली गेली, त्यावेळी पोलीस आणि प्रशासनासोबत शोभा स्वत: त्या बालिकेची सुटका करायला गेल्या होत्या. ही काही पहिली घटना नाही. मानवी तस्करी त्यातही बालिकांची तस्करी याविरोधात शोभा यांनी नेहमीच कारवाई केली आहे. त्यांच्यासाठी हा कार्यप्रवास काही सोपा नव्हता.
 
 
असो, मच्छींद्र शेलार हे मूळ आलेगाव (बु), माढा सोलापूरचे. कामानिमित्त ते पुण्याला स्थायिक झाले. ते वाहनचालकाचे काम करायचे. त्यांच्या पत्नी जनाबाई या गृहिणी. मातंग समाजाचे हे अत्यंत पापभिरू आणि संस्कारी दाम्पत्य. त्यांना सहा मुलं. त्यापैकी एक शोभा. शोभा या लहानपणापासूनअतिशय चिंतनशील. गावातले अनेकजण कामानिमित्त मुंबईला यायचे, तेव्हा शेलारकुटुंबीयांच्या घरी थांबायचे. शोभा यांना जाणवायचे की, आपण आणि आपलेनातेवाईक एकाच जातीचे. आपल्या नातेवाईकांना गावात तितका मान नाही. मात्र, आपल्याला गावी चांगली वागवणूक. का? तर आर्थिक परिस्थिती चांगली आहे म्हणून. शिकतोय म्हणून. मुंबईत गावकरी आल्यावर त्यांना आपली मदत होते म्हणून? याचाच अर्थ समाजाच्या अत्यंत वाईट प्रथेला, जातीयवादाला समाप्त करायचे असेल, तर दोन पद्धतीने करता येईल. एकतर विरोध करून. नाहीतर स्वत:ची गुणवत्ता आणि क्षमता सिद्ध करून.
 
 
आपले अस्तित्व इतके मोठे करायचे की, कुणीही आपल्याला नाकारू शकणार नाही. शोभा यांनी दुसरा मार्ग स्वीकारला. खूप शिकायचे ठरवले. शोभा यांच्या पालकांनी मुलगा-मुलगी कधीच भेद न करता मुलांना शिकवले. पुढे समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेताना शोभा यांचा विवाह मराठा समाजातील विकास कदम यांच्याशी झाला. आंतरजातीय विवाह होता. मात्र, दोन्ही कुटुंबीयांनी अत्यंत सामंजस्याने हे प्रकरण हाताळले. विवाह झाल्यानंतरही शोभा यांनी शिक्षण सुरू ठेवले. पुढे त्यांना बाळाची चाहूल लागली. त्याच दरम्यान त्या मुंबईतल्या एका खासगी स्वयंसेवी संस्थेत काम करत होत्या आणि त्याचदरम्यान त्या ‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी करत होत्या. अशावेळी इतरांना वाटायचे की, कसे होणार हिचे? पण, शोभा यांना आपले ध्येय साध्य होणार, हे माहिती होते.
 
 
त्या विचार करायच्या की, ”ज्यावेळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यावेळी आद्यक्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवेंची नात मुक्ता साळवे ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शाळेतली पहिली विद्यार्थिनी होती. तिच्या संघर्षाचा आणि आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्तादांच्या आशीवार्दाची साथ आपल्याला आहे.” शेवटी घर, नोकरी आणि परीक्षा या सगळ्यांची तारेवरची कसरत सांभाळत त्या ‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण झाल्या. इतकेच नव्हे, तर त्यावेळी सरकारी तीन खात्यांमध्ये भरती सुरू होती. या तिन्ही खात्यांतील नोकरीच्या परीक्षा त्यांनी दिल्या. एकाचवेळी या तिन्ही परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या.
 
 
मात्र, महिला आणि बालकांसाठीच्या कल्याणाची आंतरिक तळमळ होती. त्यातूनच त्यांनी बालगृह अधीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली. आज त्या महिला बाल विकास अधिकारी आहेत. प्रशासनातील विविध जबाबदार्‍या स्वीकारताना शोभा यांनी शोषित वंचित आणि न्यायापासून दूर असणार्‍यांना सवलती, हक्क आणि न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतात. शोभा म्हणतात, ”माझ्या ‘डीएनए’मध्ये साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे विचार आहेत. साहित्यरत्न अण्णा भाऊंना देशाच्या मांगल्याची स्वप्ने पडत. त्यांच्या त्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी मला खारीचा का होईना वाटा उचलायचा आहे.” साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंच्या स्वप्नातील देशाच्या मांगल्याचा ध्यास असणार्‍या शोभा या समाजाचा आदर्श आहेत, हे नक्की...!
 
 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.