व्हावे ‘स्मार्ट’ सकलजन!

    02-Aug-2022
Total Views | 101

smart

 
 
‘स्मार्ट’ लोकांचे आपल्या अस्तित्वाकडे व ते सुरक्षित ठेवण्याकडे व्यवस्थित लक्ष असते. राजकारणात आपण अनेक न पटणार्‍या वा न उलगडणार्‍या पक्षीय युती-आघाडी पाहत असतो. त्यात कित्येक वेळा स्वार्थ दडलेला असतोच. शेवटी तो अस्तित्वाचे संरक्षण करण्याचा भाग असतो.
 
 
चलाख असणे किंवा ‘स्मार्ट’ असणे, ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. पण, ती तितकी अवघड गोष्टही नाही. उच्च प्रतीचा बुद्ध्यांक असलेले अनेक लोक आयुष्य मजेत जगतात. त्यांचे आयुष्य सोपे असते. नातेसंबंध सुखदायी असतात. व्यवसाय, नोकरी वा ‘करिअर’ हवेच्या झोक्यासारखे आल्हाददायक असते. आपण ज्या अस्तित्वाच्या प्रश्नांसाठी शेवटपर्यंत झगडत असतो, त्यांना त्यांनी खूप आधीच तितक्या सहजतेने हाताळलेले असते. पण, सर्वसामान्य जनांना ते सहज जमत नाही.
 
  
आपण माणसाला मिळणार्‍या यशाकडे पाहतो, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात यायला वेळ लागत नाही, ती ही की, प्रत्येक यश हे कृतीवर अवलंबून असते. पण, प्रत्येक कृती शेवटी माणसाच्या विचारानेच होते. जेव्हा जेव्हा आयुष्यात नवप्रेरणा मिळते, नवा उद्देश सापडतो, नवीन द़ृष्टी लाभते, तेव्हा सार्थ सिद्धीची सुरुवात होते. आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहे, काय गरजेचे आहे, याची जाणीव या माणसांना होते तेव्हा यशाची पावले त्याच्याकडे वळतात.
 
 
बर्‍याच वेळी आपण विचारात पडतो की, एखादी व्यक्ती इतकी ‘स्मार्ट’ वाटते, पण त्यांना इतर लोकांसारखे ‘करिअर’ वा व्यवसाय कसा जमला नाही? आपले पूर्ण आयुष्य आपण शाळेत वा व्यवसायात चुका करण्यात घालवले, असे एखाद्याला वाटते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, त्या व्यक्तीने यशासाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्नच केलेला नसावा. काही युवा तरुणांनी किंवा प्रौढांनीसुद्धा शाळा-महाविद्यालयाच्या वा व्यवसायाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर नूतन कौशल्य वापरलेच नाही.
 
 
अविकसित कसब त्यांनी मग तो पेशा असेल, सामाजिक नातेसंबंध असतील, यात वापरले आणि गरजेप्रमाणे वा अवतीभोवती असलेल्या परिस्थितीनुसार बदल केलेला नाही, तर प्रगती किंवा विकास कसा होईल? ‘स्मार्ट’ लोकांना ‘संधिसाधू’ असेही म्हणता येईल. कारण, ते समोर असलेल्या संधीचा अचूक फायदा उचलतात. आपण त्यांना स्वार्थी म्हणून संबोधतो. पण, त्यांना एखाद्या परिस्थितीत आपण कसे काय स्वत:साठी मिळवायचे, हे व्यवस्थित समजले. यात खरेतर प्रयत्न करत राहणे, अतिशय आवश्यक आहे. यामध्ये अगदी छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करता आली पाहिजे.
 
 
अगदी नव्या राज्यात जाऊन, त्यांची भाषा शिकणे, तांत्रिक बाबी शिकणे या गोष्टी साध्या सरळ असतात. आपल्या जीवनावर मोठा प्रभाव न पडता वा ढवळाढवळ न करता या गोष्टी साध्य करणे सोपे असते. याला प्रयत्न करण्याचे कौशल्य म्हणता येईल. इतर कौशल्याप्रमाणे ते विकसित करायला वेळ लागतो, पण, शेवटी प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना! पण, एखादी योग्य गोष्ट स्वत:च्या विकासासाठी वा अस्तित्वासाठी करायची म्हटलं, तर त्यासाठी ध्येयासक्तीची गरज आहे, वेळ देण्याचीही गरज आहे.
 
 
आपण नक्की किती संवेदनशील आहोत, हे दुसरे कोणी आपल्याला सांगू शकत नाही. हा अनुभव तसा एकाकीपणाचा आणि वेदनादायी असू शकतो. प्रत्येक प्रतिभावान व्यक्तीला हे समजणे आवश्यक आहे की, लोक मुद्दाम वाईट वागतील असे नाही किंवा मुद्दाम तुम्हाला नामोहरम करण्यात त्यांना खूप आनंद वाटत असेल, असेही नाही. कारण, हे सर्वसामान्य आहे, ‘स्मार्ट’ लोक या संवेदनशीलतेचे बळी होत नसतात. ते या सगळ्या नकारात्मक प्रतिक्रियांचे सकारात्मक विश्लेषण करतात व आपली पावले प्रगतिपथावर घेऊन जातात. ‘स्मार्ट’ लोक त्या अर्थाने हवेची दिशाच बदलतात ते ‘गेमचेंजर’ असतात. लोकांच्या टीकाटीप्पणीला गतिशीलपणे सामोरे जाणारी माणसे आपली भावनिक सुबत्ता किती प्रभावी आहे, हे दर्शवून दिसतात.
 
 
प्रत्येकाच्या जीवनात अस्तित्वाशी येणारी संकटे खूप आधीपासून येत असतात, ती मोठी असतात आणि अनेकदा येतात. पण, अनेक चलाख व्यक्तींच्या बाबतीत या संकटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. ते एखादी गोष्ट वरकरणी न पाहता त्या गोष्टीची जडणघडण कशी झाली असावी, याचा खोलवर विचार करतात. त्या जडणघडणीचा आपण कसा भाग बनू शकतो वा त्या व्यवस्थेत आपण कसे बसू शकतो, याचा सखोल अंदाज ही मंडळी घेतात.
 
 
शेवटी या ’स्मार्ट’ लोकांचे आपल्या अस्तित्वाकडे व ते सुरक्षित ठेवण्याकडे व्यवस्थित लक्ष असते. राजकारणात आपण अनेक न पटणार्‍या वा न उलगडणार्‍या पक्षीय युती-आघाडी पाहत असतो. त्यात कित्येक वेळा स्वार्थ दडलेला असतोच. शेवटी तो अस्तित्वाचे संरक्षण करण्याचा भाग असतो. त्यावेळी त्यात तत्त्वप्रणाली, उदात्तपणा वा त्याग या गोष्टींना फारसा थारा नसतो. हे सगळे मानवी परिघातच आहे. त्यामुळे सामान्य जनांनी याचा फार त्रास करून घेत, स्वत:ला छळू नये. व्यक्तीने आपण कसे जगाच्या वास्तविकतेत स्वत:ला बसवतो, हे महत्त्वाचे आहे शेवटी!
 
 
 
 -डॉ. शुभांगी पारकर
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121