रांगोळीत रममाण रोहित...

    19-Aug-2022
Total Views |

mansa
 
ग्रामीण भागात पुरुषाने रांगोळी काढण्याकडे वेगळ्याच दृष्टीने बघितले जाते. परंतु, तरीही त्याने धडपड करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. जाणून घेऊया रोहित भोईर याच्याविषयी
 
 
 
रोहित दत्तात्रेय भोईर याचा जन्म पनवेल तालुक्यातील पडघा गावचा. वडील ‘एमआयडीसी’त नोकरीला तर आई गृहिणी. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रोहितचे प्राथमिक शिक्षण गावातीलच रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. रोहित अभ्यासात अतिशय हुशार. त्यानंतर कोळवाडी गावातील संजय गांधी शाळेत त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. दहावीनंतर पनवेल येथील विखे महाविद्यालयात त्याने विज्ञान शाखेला प्रवेश घेतला.
 
 
 
अकरावीला महाविद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात अनेक मुलींनी सहभाग घेतला खरा पण एकही मुलगा त्या स्पर्धेत सहभाग घ्यायला धजावत नव्हता. मात्र, शाळेतील शिक्षिका रचना जोशी यांना स्पर्धेत किमान एका मुलाने तरी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे वाटत होते. रोहित वर्गात पुढच्याच बाकावर बसत असल्याने आणि तो हुशार असल्याने जोशी यांनी रोहितला सहभाग घेण्यास सांगितले. त्यावर रोहितने होकार दिला. याआधी रोहितने दिवाळीमध्ये घरच्या घरी रांगोळी काढली होती. परंतु, कधी स्पर्धेसाठीरांगोळी काढली नव्हती. धाडसाने हो तर म्हटले गेले, पण रांगोळीचा ‘र’ देखील माहिती नव्हता. त्यामुळे त्याने युट्यूब, इंटरनेटवर रांगोळीविषयी सर्च करून माहिती घेतली. त्यानंतर घरी सरावही केला.
 
 
 
या स्पर्धेतत्याने मोराची रांगोळी काढली आणि विशेष म्हणजे, त्याला या स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पहिल्याच प्रयत्नात पारितोषिक मिळवल्यानंतर त्याचा आत्मविश्वास दुणावला होता. यानंतर त्याला खर्‍या अर्थाने रांगोळीविषयीची आवड निर्माण झाली. पुढे त्याने ‘शांतीनिकेतन पॉलिटेक्निक’ला ‘मेकॅनिकल डिप्लोमा’साठी प्रवेश घेतला. डिप्लोमा करत असताना त्याची शुभम कुमरे याच्याशी ओळख झाली.
 
 
 
शुभमने काढलेल्या एका रांगोळीचा व्हिडिओ टिकटॉकला ‘व्हायरल’ झाला होता. त्यावेळी रोहितने त्याला मेसेज करून रांगोळी कुठे शिकला, याविषयी विचारपूस केली. त्यावेळी त्याने रोशन पाटील या कलाकाराकडून रांगोळी शिकल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने महाडला रांगोळी काढण्यासाठी येण्याविषयी विचारले. रोहितनेही लगेच होकार दिला. अखेर शुभम कुमरेमुळे रोहितची रोशन पाटील याच्याशी ओळख झाली. महाडला शिवजयंतीनिमित्त रांगोळी काढताना रोहितने त्याला काही येत नसल्यानेमध्ये लुडबुड केली नाही. मात्र, दुसर्‍या दिवशी रोशनने रोहितला रांगोळी काढण्यासाठी मदत करण्यास सांगितले.
 
 
 
तसेच, ‘चुकलास तर मी सावरून घेईन,’ असा विश्वासही दिला. त्यामुळे रोहितने रांगोळी काढण्यास मदत केली. यावेळी रोशनने रांगोळीविषयी सर्व माहिती त्याला सांगितली. यानंतर जेव्हा जेव्हा रोशनला रांगोळी काढण्याचे काम मिळेल, तेव्हा रोहितही त्याच्यासोबत जायचा. पाहता पाहता रोहितचा रांगोळी काढण्यात चांगलचा जम बसला. पुढे रांगोळीनंतर रोहितने चित्र रेखाटण्यासाठी प्रयत्न सुरू केला. रोशनच्या मार्गदर्शनाखाली रोहित चित्रेही उत्तमरित्या रेखाटू लागला.
 
 
 
‘लॉकडाऊन’मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत रोहितने सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामध्ये घरून रांगोळीचा फोटो आणि व्हिडिओ पाठवणे आवश्यक आहे. रांगोळीच विषय अन्न हा होता. यात रोहितने तंदुरी चिकनची सुंदर रांगोळी काढत तिसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. शिक्षण घेत असातनाही त्याने आपल्या छंदासाठी वेळ दिला. तसेच, आपल्या अभ्यासावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. महाविद्यालयामधून पहिला आल्यानंतर त्याला नोकरीही लागली.
 
 
 
 
कोणतेही शिक्षण किंवा कोर्स न करता रोहित रांगोळी आणि चित्रे काढण्यात तरबेज झाला. एकदा त्याने गावात विठ्ठलाची रांगोळी काढली. तेव्हा त्याचे मोठे कौतुक झाले. रांगोळीसाठी खर्चही मोठा लागतो. रोहितला त्याच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांचा संपूर्ण पाठिंबा आहे, त्याला कधीही घरातून विरोधाचा सामना करावा लागला नाही.
 
 
 
ग्रामीण भागात पुरुषाने रांगोळी काढण्याकडे अजूनही वेगळ्याच दृष्टीने पाहिले जाते. परंतु, तरीही त्याने धडपड करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्याने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला घेत बक्षिसे मिळवली आहेत. रांगोळी आणि चित्रे काढण्यासोबतच मूर्त्यांना रंगकाम करण्याची त्याची भविष्यात इच्छा आहे.
 
 
 
“रांगोळी काढण्यासाठी सर्वप्रथम इच्छा आणि आवड हवी. त्यानंतर चित्र काढता यायला हवी व त्याजोडीला सराव आवश्यक आहे. रांगोळी काढल्यानंतरचा आनंद अवर्णनीय असतो. तो शब्दांत सांगता येत नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निश्चित हवे व प्रयत्न हवेत. कुठलीही गोष्ट मन लावून केली, तर त्यात यश मिळते. अनेकजण फुकटात रांगोळी आणि चित्र काढून देण्यास सांगतात, ते अतिशय चुकीचे आहे,” असे रोहित सांगतो.
 
 
इतक्या कमी वयातही आपल्या जिद्दीच्या जोरावर आपली ओळख निर्माण करणार्‍या रोहित भोईर याला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा....
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.