राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांच्या पुराव्याच्या फाईल तयार; रणजितसिंह निंबाळकर
19-Aug-2022
Total Views |
पंढरपूर : भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष सर्वात भ्रष्ट असल्याची टोलेबाजी केली आहे. दहा बड्या भ्रष्ट नेत्यांची प्रकारणे केंद्रीय तपास यंत्रणांना देणार असून यातील पाच जणांची कागदपत्रे तयार झाल्याचा गौप्यस्फोट रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे. किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यानंतर आता रणजितसिंह देखील मैदानात उतरले आहेत.
निंबाळकर हे टेंभूर्णी येथे मतदारसंघात बोलत होते. दहा पैकी पाच राष्ट्रवादी बड्या नेत्यांच्या पुराव्याच्या फाईल तयार झाल्याने त्या ईडी आणि सीबीआयडीकडे देणार असल्याचे निंबाळकर यांनी या वेळी सांगितले. यामुळे पुन्हा एकदा राज्यात ईडीची वक्रदृष्टी राष्ट्रवादीकडे वळणार याचे संकेत मिळू लागले आहेत. सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार याना क्लिन चिट दिल्याचा आभास निर्माण केला जात असला तरी जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
पवार यांच्या लवासा प्रकरणावर देखील सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारल्याचे सांगताना या जमिनी देताना जलसंपदा मंत्री कोण होता? जमिनी कशा दिल्या असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. जलसंपदा मंत्रालयात अनेक प्रकरणात घोटाळे झाले असल्याचे आरोप असल्याने चौकशी तर होणारच असा इशाराही त्यांनी दिला.