भांडाभांडी आणि मांडामांडी : संघर्ष आणि रचना

    19-Aug-2022
Total Views |
train
 
 
 
 
आपले राजकीय नेते पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देत होते नि आपल्या भारतीय सैन्याचे इंग्रज सरसेनानी अर्धी शस्त्रसामग्री पाकिस्तानला पाठवण्याबद्दल आग्रही होते. अशा स्थितीत देशभक्त (म्हणजे खरेखुरे राष्ट्रीय दृष्टी असणारे) राजकीय नेते आणि खंबीर सेनापती यांनी कसा मार्ग काढला? नवस्वतंत्र भारताची पुनर्बांधणी, उभारणी, पुनर्रचना कशी केली? याबद्दल खरं म्हणजे भरपूर साहित्य, अभ्यास, अध्ययन संशोधन व्हायला हवं होतं.
 
 
 
दि. १७ ऑगस्ट, १६६६ या दिवशी शिवाजी महाराज आग्य्राहून निसटले आणि दि. १२ सप्टेंबर, १६६६ या दिवशी राजगडावर पोहोचले. ही बातमी संपूर्ण देशभर पसरली. मुंबईच्या चोंबड्या इंग्रजांना चौल-रेवदंड्याच्या पोर्तुगीजांना, विजापूरकर आदिलशहा, गोवळकोंडेकर, कुतुबशहा आणि खुद्द औरंगजेब यांनाही ती अर्थातच कळली. आश्चर्य, विस्मय, दुःख, चडफडाट अशा भावनांबरोबरच आणखी एक भावना सगळ्यांच्याच मनात उद्भवली. औरंगजेबाच्या दगाबाजीमुळे संतापलेला शिवाजी आता त्वेषाने मुघल रियासतीवर तुटून पडणार आणि त्यामुळे दख्खन भागात पुन्हा लढायांचा कल्लोळ उसळणार.
 
 
 
पण, शिवरायांनी सगळ्यांनाच चकवलं. त्यांनी औरंगजेबाला कळवलं की, मिर्झाराजा जयसिंहाबरोबर झालेला पुरंदरचा तह कायम आहे. या तहानुसार आपण मुघलांचे मनसबदार असून, मुघलांना दिलेले २३ किल्ले आणि आपल्याकडे म्हणजे स्वराज्यात असलेले १२ किल्ले कायम राहावेत. मात्र, मुघली मुलुख सेाडून अन्यत्र मुलुखगिरी करण्याची आपल्याला मुभा असावी. स्वतःच्या नशिबावर खूश होऊन औरंगजेबाने शिवरायांच्या या अर्जाला ताबडतोब मान्यता देऊन टाकली.
 
 
 
तह केव्हा करायचे आणि केव्हा मोडायचे हे शिवराय, पेशवा बाजीराव आणि पेशवा माधवराव यांना जेवढं कळलं, तेवढं कुणालाच कळलं नाही. शिवरायांनी पुरंदराचा तह आणखी चार वर्ष म्हणजे १६७० पर्यंत पाळला. या चार वर्षांच्या काळात त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या सैनिकी आणि नागरी कारभाराची संपूर्ण पुनर्रचना, पुनर्संघटना, पुनर्बांधणी केली. १६४६ साली तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याच्या उद्योगाला प्रारंभ केल्यापासून १६६५च्या पुरंदरच्या वेढ्यापर्यंत सतत १९-२० वर्षे महाराज आणि त्यांचे सोबती -सहकारी अखंड लढायांमध्ये गुंतलेले होते.
 
 
 
१६६६ची आग्रा भेट म्हणजे तर जीवावरचाच प्रसंग होता. सगळ्यांनाच किंचित विश्रांती, किंचित उसंत हवी होती. नुसत्या सैनिकी क्षेत्रालाच नव्हे, नागरी क्षेत्रालाही राज्याचं मुख्य उत्पन्न म्हणजे शेती. सततच्या स्वार्या आणि मोहिमांमुळेे शेती पार उद्ध्वस्त झाली होती. १६६६ ते १६७० या चार वर्षांत शिवरायांनी राज्याच्या म्हणजे जनतेच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राकडे लक्ष पुरवलं. आपण जितके रणधुरंधर सेनापती आहोत, तितकेच प्रजेचं पालन करणारे उत्तम प्रशासकही आहोत, हे त्यांनी सिद्ध केलं.
 
 
 
दुर्दैवाने शिवरायांच्या जीवनातला या चार वर्षांकडे फारसं कुणाचं लक्षात नाही. कारण त्यात ‘अॅक्शन’, ‘थ्रिल’ नाही. युद्ध लढाई, संघर्ष, भांडाभांडी ही रोमांचक थरारक असतात. पण, प्रशासन, उत्तम कारभार, मांडामांडी यात वर्णन करून सांगण्यासारखं रोचक, रोमांचक काहीच नसतं.
 
 
 
विनोदाच्या विविध प्रकारांबद्दल लिहिताना आचार्य असे म्हणतात, “एखादा मनुष्य रस्त्यातून चालताना घसरून पडला, तर एखादं लहान मुल त्याची ती स्थिती पाहून खदाखदा हसत सुटेल. पण, एखादा प्रौढ, परिपक्व माणूस पहिल्यांदा हसू आलं तरी ते थांबवून पुढे सरसावेल. त्या पडलेल्या माणसाला हात देईल, चौकशी करेल. कारण, त्याची विनोदबुद्धी त्या लहान मुलापेक्षा परिणत झालेली असते. असा परिणत माणूस राम गणेश गडकरी किंवा बर्नार्ड शॉ यांच्या विनोदावर खळखळून हसेल.”
 
 
  
अगदी अशाच चालीवर युद्धाच्या रम्य कथा जगातल्या सर्वचं लोकांना आवडतात. कारण त्यात ‘अॅक्शन’ असते. त्या आवडायलाही हव्यात. कारण, शूरवीरांच्या पराक्रमांच्या, दिग्विजयांच्या कथा ऐकूनच नव्या पिढीचं मन तयार होत असतं. पण, समाजातल्या परिणत बुद्धीच्या लोकांचं हे ही काम आहे की, लोकांना शूरवीरांच्या युद्धकथांसोबतच त्यांच्या प्रजाहितदक्षतेच्या कथाही सांगितल्या पाहिजेत. छत्रपती शिवराय आणि महाराणा प्रताप हे रणकुशल सेनानी तर होतेच, पण ते तितकेच कुशल ‘अॅडमिनिस्ट्रेटर’सुद्धा होते. याबद्दलची जाणीव आणि रूची लोकांंमध्ये निर्माण झाली पाहिजे.
 
 
 
पाश्चिमात्य देशांमध्ये अशा जाणिवेतूनही लेखन केलं जात. पश्चिमी देशांच्या नजीकच्या इतिहासात दुसरं महायुद्ध ही एक अमिट ठसा उमटवलेली घटना आहे. १९३९ ते १९४५ अशी सहा वर्षं चाललेल्या या महायुद्धात संपूर्ण जगच होरपळूून निघालं. पण, युरोपीय देशांचं नुकसान कल्पनातीत होतं. मुख्य खलनायक जर्मनी, इटली आणि मग दोस्त राष्ट्रांपैकी फ्रान्स, पोलंड, बेल्जियम, हॉलंड, रशिया, ब्रिटन यांची अनेक शहर-गाव उद्ध्वस्त झाली होती. फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि पोलंड तर बेचिराखच झाले होते.
 
 
 
या राखेतून या देशांना पुन्हा उभं राहायचं होतं. सेनापतींना आपल्या शिल्लक राहिलेल्या सेना, विमानं, आरमारं यांची पुनर्रचना करायची होती. राजकारणी नेत्यांना आपल्या देशाचं अर्थकारण रूळावर आणण्यासाठी शेती, कारखानदारी, व्यापार या सगळ्यांचीच पुनर्बांधणी करायला हवी होती आणि हे करताना अन्यधान्य, कपडालत्ता, घरं आणि वाहनं या सगळ्यांचाच प्रचंड तुटवडा होता. सर्व युरोपीय समाजांमध्ये ठळकपणे दिसून येणारी गोष्ट म्हणजे, साधारण वय वर्षं १८ ते ४५ या वयोगटातले पुरुषच कुठे दिसत नव्हते. ते सगळे रणांगणावर ठार झाले होते. त्यामुळे सर्वच एकप्रकारे ‘महिला राज’ होतं.
 
 
 
या परिस्थितीतून सावरायला रशियाला स्टॅलिन मिळाला, फ्रान्सला चार्ल्स डि गॉल मिळाला, ब्रिटनला क्लेमंट अॅटली नि अॅँथनी ईडन मिळाले, तर जर्मनीला कॉनराड अॅडनॉर मिळाला. हे नेते खंबीर होतेच. पण, अमेरिकेचा अर्थमंत्री जॉर्ज मार्शल याने एक खास योजना आखून या सर्व देशांना, विशेषतः जर्मनी आणि फ्रान्सला भरपूर आर्थिक मदत दिली.
 
 
 
ही ‘मार्शल योजना’ नसती, तर युरोपला पुन्हा उभं राहाणं कठीण पडलं असतं. युरोपीय ललित लेखक या कालखंडाचं वर्णन करताना म्हणतात, “१९४५ ते १९५५ या दशकात सर्वसामान्य युरोपीय माणूस पायी चालायचा किंवा सायकल चालवायचा. १९५५ ते १९६५ या काळात त्याने स्कूटर घेतली. १९६५ ते १९७५ या काळात त्याने चारचाकी घेतली.”
 
 
 
युद्धोत्तर काळातल्या युरोपच्या या पुनरूज्जीवनावर तिथले लेखक अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहितात. अशी पुस्तकं सतत येतच असतात. अलीकडे म्हणजे २००५ साली टोनी ज्युड या लेखकांच ‘पोस्टवॉर’ नावाचं तब्बल साडेआठशे पानांचं अशाच विषयावरचं पुस्तक खूप गाजलं. त्यातलं त्याचं एक मार्मिक वाक्य सगळ्याच वाचकांना फार भिडलं. ज्युड म्हणतो, “दुसरं महायुद्ध ही एक अशी आपत्ती होती की, जिच्यामुळे प्रत्येक माणसाने काहीतरी गमावलं आणि ... आणि अनेकांनी सगळंच गमावलं.”
 
 
 
अगदी ताजं म्हणजे जानेवारी २०२२ मध्ये आलेलं ‘आफ्टरमथ’ हे पुस्तक अशाच विषयावर आहे. हेरॉल्ड जॅन्नर या लेखकाने त्यात पराभूत जर्मन समाजाची भयंकर वेदना मांडलेली आहे. युद्धोत्तर जर्मन समाजात सर्वत्र महिलांचच राज्य होतं. पूर्वेकडूनजर्मनीवर आक्रमण करण्यार्या सोव्हिएत सैनिकांनी सूडाने पेटून जर्मन महिलांवर इतके अनन्वित अत्याचार केले होते की, संपूर्ण महिला वर्ग कमालीचा भयभीत होता. पुरुष फारसे शिल्लकच नव्हते.
 
 
 
जे जर्मन सैनिक युद्धांमधून जीव वाचवून परतले होते ते पराभूत आणि निराश होते. मोठ्या आणि मध्यम शहरांमध्ये सर्वत्र उद्ध्वस्त इमारती, खराब रस्ते, अपुरा अन्नपुरवठा, अव्यवस्थित पाणीपुरवठाआणि मोडकी सांडपाणी निचरा व्यवस्था यामुळे अराजक माजलं होतं. त्यातच १९४८ साली सोव्हिएत रशियाने जर्मनीची फाळणी करून पूर्व जर्मनी हा वेगळा देश बनवला.
 
 
 
या सगळ्या नरकतुल्य अवस्थेतून उर्वरित पश्चिम जर्मनी हा देश कसा बाहेर पडला, याची कहाणी हेरॉल्ड जॅन्नरने मांडली आहे.
हे सगळं समजून घेत असताना डोळ्यांसमोर त्याच कालखंडातली आपल्या देशाची स्थिती उभी राहाते. आपला देश युद्धांमुळे उद्ध्वस्त झाला नव्हता. पण, स्वातंत्र्याबरोबरच आलेल्या फाळणीमुळे युद्धमान स्थितीच निर्माण झाली होती.
 
 
 
पंजाब आणि बंगाल या दोन्ही प्रांतामध्ये प्रचंड दंगली उसळल्या होत्या. लाहोरहून अमृतसरला येणारी प्रत्येक रेल्वे गाडी फक्त प्रेतांंनी भरून येत होती. फाळणीत अधिकृतपणे मिळालेल्या भूभागावर मुसलमान संतुष्ट नव्हते. त्यांना अमृतसर ते दिल्ली एवढा भूभाग दंगली करून हिसकावून घ्यायचा होता. शिवाय त्यांना संपूर्ण काश्मीर हवा होता. त्यासाठी त्यांनी ऑक्टोबर १९४७ मध्ये सरळ आक्रमणच केले.
 
 
 
आणि तरीही आपले राजकीय नेते पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देत होते नि आपल्या भारतीय सैन्याचे इंग्रज सरसेनानी अर्धी शस्त्रसामग्री पाकिस्तानला पाठवण्याबद्दल आग्रही होते.अशा स्थितीत देशभक्त (म्हणजे खरेखुरे राष्ट्रीय दृष्टी असणारे) राजकीय नेते आणि खंबीर सेनापती यांनी कसा मार्ग काढला? नवस्वतंत्र भारताची पुनर्बांधणी, उभारणी, पुनर्रचना कशी केली?
याबद्दल खरं म्हणजे भरपूर साहित्य, अभ्यास, अध्ययन संशोधन व्हायला हवं होतं. प्रत्यक्ष युद्धाइतक्याच या युद्धमान स्थितीतून मार्ग काढणार्या नेत्यांनी, सेनापतींच्या नि प्रशासकांच्या कहाण्या आणि लेखकांनी समाजाला सांगायला हव्या होत्या.
 
 
 
पण... पण दृष्य नेमकं उलट आहे. या पुनर्रचनेच्या कालखंडाबद्दल कमीत कमी साहित्य उपलब्ध आहे. आपल्या मराठी साहित्याबद्दल बोलायचं, तर १९४२ पासून नवसाहित्याचा काळ सुरू झाला. असं मानलं जातं मग हे नवकवी, नवकथाकार, नवकादंबरीकार कशावर लिहिते झाले तर प्रेम. प्रिती म्हणजेच स्त्री-पुरूष संबंध याच एकमात्र विषयावर चुकून कळतेच ते राजकीय-सामाजिक विषयांकडे तर ‘दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल’ असं पूर्ण काल्पनिक वर्णनच ते करणार.
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत तरी आमचे लेखक-साहित्यिक-कवी-पत्रकार परिणत बुद्धीचे होणार की बालबुद्धीचेच राहाणार?
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.