शरीरावरील 'बारनॅकल्स'वरून ओळखता येणार कासवाचा भ्रमणमार्ग

मढ किनारी सापडलेल्या दुर्मिळ "लॉगरहेड" समुद्री कासवावर उपचार सुरू

    18-Aug-2022   
Total Views |
kasav1


मुंबई(उमंग काळे):
मुंबईतील मालाडच्या मढ (सिल्वर बीच) किनाऱ्यावर वाहून आलेल्या दुर्मिळ 'लॉगरहेड' कासवावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या दुर्मिळ मादी कासवाला ऐरोलीच्या 'किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रा'त आणण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. बुधवार दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी मढ किनाऱ्यावर स्थानिक मच्छीमारांना हे दुर्मिळ कासव आढळून आले. अत्यंत दुर्मिळ असल्यामुळे स्थानिक पोलिसांना कळवून नंतर हे कासव कांदळवन कक्षाच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. या वरील 'बारनॅकल्स'च्या प्रजातींची ओळख पटवून या कासवाचा भ्रमणमार्ग ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
 
सध्या, या कासवावर उपचार सुरू आहेत. या वर्षी नोंद झालेल्या लॉगरहेड कास्वांपैकी हे कासव आकाराने मोठे आहे. या कासवाने बरेच दिवस काही खाल्ले नसल्याचे समोर आले आहे. बुधवारी दि. १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी या कासवाला प्रार्थमिक तपसणीसाठी डॉ. रीना देव यांच्या उपचार केंद्रात नेण्यात आले. 'एक्स-रे' चाचणीनंतर या कासवाला निमोनिया झाला असल्याचे समोर आले आहे. तसेच बोटीच्या पंख्याची धडक त्याच्या पाठीवर जखम झाली आहे. पुढील उपचारासाठी या कासवाला ऐरोलीच्या किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रात नेण्यात आले असून, या कासवावर उपचार सुरू आहेत. या मादी लॉगरहेड कासवावर योग्य उपचार करून ते नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
 
या कासवावर संपूर्ण उपचार ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे यांच्या निगराणीत करण्यात येतील. हे कासव मढ किनाऱ्यावरील स्थानिक प्रमोद धाडगे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित मानद वन्यजीव रक्षक आनंद मोहिते यांना कळवून, स्थानिक पोलीस प्रशासनाला कळवले. वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदळवन कक्षाच्या वाहनातून पुढील उपचारासाठी ऐरोलीच्या किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रात नेण्यात आले. याप्रसंगी प्रमोद धाडगे, रवी, रमेश, जितू, वनपाल अंधेरी महादेव शिंगाडे, वैशाली गवळी, अधिकारी अजित परब आणि राकेश घवली उपस्थित होते. उपचार सुरू करण्यात आले आहेत.
 
“कांदळवन कक्षाच्या सागरी प्राणी रेस्क्यू आणि रिलीज समितीने दिलेल्या सूचनांनुसार या दुर्मिळ कासवावर शास्त्रशुद्ध पद्धतीने उपचार केले जातील. त्यानंतरच समितीने घेतलेल्या निर्णयानुसार या कासवाची त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात येईल. कासवाच्या पाठीवरील शेवाळ आणि बारनॅकल्सच्या आधारे या कासवाचा भ्रमणमार्ग ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जाईल. अजून तरी या मादी कासवाचे 'सॅटलाईट टॅगिंग' करण्याचा आमचा विचार नाही.                                                 -विरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष.


गेल्या सहा वर्षात फक्त ८ नोंदी.
गेल्या सहा वर्षात भारतीय किनारपट्टीवर विशेषतः महाराष्ट्रात या कासवाच्या आता पर्यंत ८ नोंदी समोर आल्या आहेत. जून २०१६मध्ये पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे मादी लॉगरहेड कासवाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर, ऑगस्ट २०१७ मध्ये डहाणू आणि केळवा येथे मादी लॉगरहेड कासवाची नोंद करण्यात आली. सन २०२१मध्ये मालवण बंदर जेट्टी आणि वायरी किनाऱ्यावर दोन लॉगरहेड कासवाची पिल्ले सापडली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात दि. १२ आणि १३ ऑगस्टला दिवेआगर किनाऱ्यावर २ कासवे आढळून आली. त्यातील एका कासवाचे तीनच 'फ्लिपर' शाबूत होते. उरण तालुक्यातील कारंजा खाडीत दि. १६ ऑगस्ट रोजी एक 'लॉगरहेड' समुद्री कासव मच्छीमारांना आढळून आले. आणि दि. १७ ऑगस्ट रोजी मादी 'लॉगरहेड' समुद्री कासव मढ किनाऱ्यावर वाहून आले होते.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव.
रामनारायण रुईया स्वायत महाविद्यालयातून बी. एम. एम. पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.