स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी खऱ्या अर्थाने दहीहंडी उत्सवाला मोठ केलं आणि म्हणूनच दिघेंच्या ठाण्यात जगातील सर्वात उंच मानवी मनोरे रचण्याचा रेकॉर्ड नोंदवला गेला. या दहीहंडी उत्सवाने अनेक नेत्यांची राजकीय करियर घडवली. त्यातल्या काहींना मंत्रीपद मिळाल्यावर त्यांनी या उत्सवाकडे पाठ फिरवली तर या उत्सवावर प्रेम असणारे अनेक नेते आजही या उत्सवाचे आयोजन करतात. सध्या मुंबई-ठाण्यात ज्याची हंडी त्याचा मतदारसंघ असे समीकरण बनलंय. नुकताच आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या मतदार संघातील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाची परवानगी मिळवलीये. वर्षांपूर्वी तिथे सचिन अहिर किंवा शिवसेना दहीहंडी उत्सवाचे आयोजन करायची पण असं काय घडलं ज्या मुळे शिवसेनेच्या हातून जांबोरी मैदान गेले. अमोठी जी परिस्थिती राहुल बाबांची झाली तशीच अवस्था आदित्यांची वरळीत होणार का?
जांबोरी मैदानावरुन नेमका काय वाद झाला?
कोणे एकेकाळी मुंबईतील पाच मोठ्या दहीहंडी उत्सवात वरळीच्या जांबोरी मैदान दहीहंडी उत्सवाचा समावेश होत असे त्यावेळी ही दहीहंडी फोडण्याचा मान आपल्याला मिळावा यासाठी मुंबई व मुंबई उपनगरातील गोविंदा पथकांमध्ये प्रचंड चढा ओढ सुरु असायची. आमदार झाल्यानंतर संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून सचिन अहिर यांनी जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करायला सुरुवात केली, त्यावेळी इथे दहीहंडीचा मोठा इव्हेंट होत असे डीजेच्या गाण्यांनी सबंध वरळी परिसर दुमदुमून जायचा, गोविद्यांना मोठ मोठ्या रकमेची बक्षीस दिली जात.
पुढे निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मात्र सचिन अहिर यांनी हा दहीहंडी उत्सव बंद केला. त्यानंतर सध्याचे शिवसेना विधानपरिषद आमदार सुनील शिंदे व आशिष चेंबूरकर अशा मंडळीनी जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सव आयोजित करायला सुरुवात केली आणि तिथे शिवसेनेचा भगवा फडकू लागला पण सचिन अहिर यांच्या उत्सवाप्रमाणे या हंडीचं स्वरूप भव्यदिव्या राहिले नाही. अशी माहिती दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना पत्रकार सुकेश बोराळे यांनी आम्हाला दिली.
पुढे कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या या महाविकास आघाडीची सुत्रानुसार ठाकरेंनी हिंदूंचे सण आणि उत्सवाच्या बाबतीत बोटचेपी भूमिका घ्यायला सुरुवात केली. आणि कोव्हीड व त्यानंतर शिवसेनेने या ठिकाणी हंडी लावणे बंद केले.
मुंबई भाजपचे अध्यक्ष व विधानसभा आमदार आशिष शेलार यांनी जांबोरी मैदानातील बंद पडलेल्या दहीहंडी उत्सव धूम-धडाक्यात साजराकरण्याचे ठरवले आणि वादाची ठिणगी पडली. वरळीतून शिवसेनेचे तीन आमदार आणि एक खासदार असून देखील या ठिकाणी भाजप दहीहंडी लावणार असल्याने शिवसेनेची लाहीलाही झाली. माजी मुंबई महापौर स्नेहल आंबेकर सुद्धा याच भागातल्या आहेत, त्यामुळे भाजपने शिवसेनेच्या प्रतिष्ठेवरच घाव घातला असे बोलले जाते.
आता वरळी हा शिवसेनेच्या युवराजांचा मतदार संघ. युवराजांच्या निवडीचा मार्ग सुकर व्हावा म्हणून फारसा उपयोग नसून देखील सचिन अहिरांना सेनेत इम्पोर्ट केले गेले त्यांची नाराजी ओढवू नये म्हणून त्यांना विधानपरिषदेवर पाठवून खुश केलं. निवडून येण्याची पूर्ण क्षमता असून सुनील शिंदेंना युवराजांसाठी आमदारकीवर पाणी सोडावे लागले अर्थात त्यांना देखील विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. त्यामुळे हंडीच्या निमित्ताने शेलारमामांनी वरळीत एन्ट्री केल्याने युवराजांना घाम फुटला असावा, असे बोलले जाते.
आता शिवसेनेच्या युवराजांसाठी वरळी मदतदार संघ का महत्वाचे आहे, हे थोडक्यात जाणून घेऊ -
वरळीत बीडीडी चालींच्या पुनरबांधणीचा मोठा प्रकल्प होऊ घातलाय शिवाय कोस्टल रोड, मुंबई-न्हावा-शेवा ट्रान्स हार्बर लिंक,मेट्रो ३ असे मोठ मोठे प्रकल्प वरळीशी निगडीत आहेत. त्यामुळे अशा मोठ्या प्रकल्पांच्या दृष्टीने वरळी हा वर्तमान आणि भविष्यातील अत्यंत महत्वाचा मतदार संघ आहे. ज्याच्या हातात वरळी त्याच्या हातात बीडीडीचाळ पुनरबांधणी प्रकल्प या सगळ्या गोष्टी डोळ्यांपुढे ठेवून आदित्य ठाकरेंना वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.
शिवाय वरळी हा तसा शिवसेनेसाठी सेफ मतदारसंघ आहे. पण ढिसाळ कारभाराने आदित्यंवर वरळीकर नाराज आहेत. आदित्य ठाकरे वरळीकरांच्यासमस्या सोडवण्यात कसे अपयशी ठरलेत याचे अनेक व्हिडीओ महाएमटीबीच्या युट्युब चॅनेलवर ग्राउंड झीरो या सदरात तुम्ही जरूर पाहू शकता. वरळी कोळीवाद्याचा प्रश्न ,रस्त्यावरील खड्डे, वरळीत बेस्टची फ्रिकव्हेंन्सी जास्त नाही, वरळी पोलीस वसाहतीच्या अनेक समस्या असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरेंना सोडवता आले नाहीत. त्यामुळे या मतदार संघातून पुन्हा निवडून येणे आदित्य ठाकरेंसाठी कठीण होणार आहे.
जांबोरी मैदान तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है; या आशिष शेलारांच्या या वक्तव्याचा अर्थ काय? -
वरळी हा शिवसेना किंवा आदित्य ठाकरेंचा गड नाही. आदित्य भाजपच्या मतांवर या मतदारसंघातून निवडून आलेत. आम्ही मुंबईत २२७ ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करणार आहोत. जांबोरी मैदान तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है असे वक्तव्य करून आशिष शेलारांनी शिवसेनेची डोकेदुखी वाढवली. आशिष शेलार यांच्या नेतृतावाखाली मागच्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने डोळे दिपावेत असे यश संपादन केले होते.
फक्त आणि फक्त युती असल्याने भाजपला मुंबई महापौरपद सोडावे लागले. पण येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला गारद करण्याची चांगलीच मोहीम हाती घेतलीये. त्याचा पहिला अंक जांबोरी मैदानात भाजपने दहीहंडी उत्सव सुरु करून केलाय. खर तर दहीहंडी उत्सव हा शिवसेनेचा प्राण पण यंदाच्या दहीहंडी उत्सवात ठाकरेगटात उदासीचे वातावरण पाहायला मिळतय. पूर्वी शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे,प्रताप सरनाईक,रवींद्र फाटक,नरेश म्हस्के असे अनेक नेते दहीहंडीचा नजर लागावी असा सोहळा साजरा करायचे आता त्यांनीच उठाव केल्याने ठाकरे गट पुरता बेजार झालाय.
निष्ठा ही शंभर रुपयांच्या स्टँपपेपरवर लिहून घेण्यासारखी गोष्ट आहे का?
यात्रा असो वा हंडी सगळीकडे आदित्य किंवा उद्धव ठाकरेंंकडून निष्ठेेचे पालुपद आळवलं जातंय. सध्या ठाकरे गटाकडून शिवसैनिकांना आपण निष्ठावान आहात, हे दाखवून देण्यासाठी १०० रुपायांची नोटरी करून स्टँप पेपर वर लिहून द्यावं लागतंंय. त्याला सुद्धा वरळीच्या शिवसैनिकांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे जसे निवडणुकीच्या आखाड्यात राहुल गांधींना भाजपने पराजयाची माती चारली तशीच वरळीत आदित्य ठाकरेंची अवस्था होणार का हे येत्या काळात समोर येईलचं पण जांबोरी मैदान तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है म्हणजे भाजपचे मिशन मुंबई महापालिका आहे हे ज्याला फारस राजकारणातलं समजत नाही तो सुद्धा सांगेल.