चिनी चौक्यांची चाल...

    18-Aug-2022   
Total Views |
 
china
 
 
चिनच्या वाकड्या चाली आता जगासाठी काही नवीन नाहीत. आपल्या विस्तारवादी भूमिकेशी एकनिष्ठ राहून चिनी ड्रॅगन शेजारील देशांसह अन्य राष्ट्रांवरही विषारी फुत्कार सोडत असतो. आधी मदतीच्याआड जवळ करायचं आणि नंतर डंख मारायचा, हा चीनचा जुना धंदा! मग त्यात श्रीलंका, पाकिस्तान, तैवान आणि बांगलादेशसारखे देश भरडले जातात. चीनने आता नवी चाल खेळली असून, श्रीलंकेनंतर त्याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
 
 
चीन आता पाकिस्तानमध्ये आपली सैन्य ठिकाणे विकसित करण्याचा विचार करत असून, पाकिस्तानात करण्यात आलेली गुंतवणूक सुरक्षित राहावी, यासाठी हा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. चीनने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड’ मोहिमेअंतर्गत पाक आणि अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. या दोन्ही देशांतील सततची अस्थिर राजकीय आणि आर्थिक परिस्थिती पाहता, चीनने तिथे सैन्य चौक्या उभारून सैन्य तैनात करण्याची योजना बनवलेली आहे. जेणेकरून गुंतवणुकीला कोणताही धोका उत्पन्न होणार नाही.
 
 
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, चीन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या माध्यमातून मध्य आशियात आपला प्रभाव वाढवून विस्ताराचे मनसुबे आखत आहे. पाकिस्तानमध्ये चीनने जवळपास ६० अरब डॉलरहून अधिकची गुंतवणूक केली आहे, त्यामुळे पाकला चीनसमोर गुडघे टेकणे भाग आहे. अफगाणिस्तानात सध्या तालिबानी शासन असल्याने त्यांच्यावर चीनचा भरोसा नाही. पाकिस्तानच्या वरिष्ठ राजनितीक सूत्रांनीही चीनच्या या चालीचा भांडाफोड केला आहे. तसेच, चिनी राजदूत नोंग रोंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो आणि लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती आहे.
 
 
तालिबानची सत्ता आल्यानंतर चीनला पाकसह तालिबानकडून मोठ्या सहकार्याची अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात तसे झालेच नाही. जसा चीन कावेबाज आहे, तसा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान काही धुतल्या तांदळाचा नाही. त्यामुळे तिन्ही देश एकमेकांपासून सुरक्षित कसे राहता येईल, याचे आडाखे बांधत आहेत. तिघांनाही ‘एकमेका साहाय्य करू’चा मार्ग पत्करायचा आहे. मात्र, शंकेची चुकचुकणारी पाल काही स्वस्थ बसू देत नाही आणि मग त्यातूनच चीनने आता थेट आपल्या सैन्य चौक्या निर्माण करून तिथे चिनी सैनिक तैनात करण्याचा खटाटोप चालवला आहे. मात्र, चिनी कावा वेळीच ओळखत तालिबानने हक्कानी उघूर बंडखोरांना चिनी अधिकार्‍यांकडे सोपविण्यास नकार दिला आहे. तसेच, ‘बीआरआय’ नेटवर्कच्या विकासासाठीही तालिबान अनुकूल नाही.
 
 
सैन्य तैनात करण्याचा घातक विचार करत असताना चीनचे उफराटे धंदे सुरूच आहे. नुकतेच चीनचे ‘युआन वांग ५’ हे हेरगिरी करणारे जहाज श्रीलंकेत आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे चीनचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर उघडा पडला आहे. चीनने या गोष्टीला भले दुजोरा दिला नसेल. परंतु, चीनची ही कृती भारतासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. याचे भविष्यात विपरित परिणाम पाहायला मिळू शकतात. भारताने वेळोवेळी श्रीलंकेला विरोधही केलेला आहे. परंतु, अख्ख्या देशाचे वाटोळे झाल्यानंतर श्रीलंकेला चिनी ड्रॅगनचा घातक चेहरा समजू लागला आहे. पण, आता बराच उशीर झाला आहे.
 
 
चीनचे हेरगिरी करणारे जहाज हंबनटोटा बंदरावर पोहोचले असून त्याठकाणी त्याचे जोरदार स्वागत झाले. भारताविरूद्ध कुरापती करण्यासाठी चीन आधी भूतान आणि आता श्रीलंकेला ढाल म्हणून वापरत आहेत. हे जहाज दक्षिण भारतातील घडामोडींवर नजर ठेवू शकते. त्यामुळे भारतदेखील आता ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आला असून, प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली जात आहे. चीनला हातपाय पसरायला जागा दिली. पण,आता चीन तिथेच आपलं बस्तान बांधण्याचा प्रयत्न करू लागला आहे.
 
 
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सैन्य चौक्या उभारून तिथे चिनी सैनिकांना तैनात करणे हा त्याच रणनितीचा एक भाग म्हणता येईल. त्यामुळे क्षणिक आमिषापायी चीनला जवळ करणं पाकसहीत अफगाणिस्तानच्या अंगाशी येत आहे. डोळ्यांवरील झापडे काढून लवकर सावरलं, तर ठीक अन्यथा विनाश अटळ आहे. तेव्हा, मग भारताकडे विनवण्या करण्याशिवाय दुसरं काहीही हातात उरणार नाही.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.