आपला छंद जोपासायचा असेल, तर ’डर के आगे जीत हैं!’ या वाक्याची शब्दशः अंमलबजावणी करणारे वन्यजीव छायाचित्रकार युवराज गुर्जर यांच्याविषयी छायाचित्रण दिनानिमित्ताने...
देव पाठीशी असल्यावर आपण निश्चिंत राहू शकतो. पण, आपल्या हत्तीच्यामागे वाघ आहे, असे कळल्यावर काय अवस्था होऊ शकते, याचा विचार फक्त कल्पनेतच केलेला बरा. परंतु, आपला छंद जोपासायचा असेल, तर ’डर के आगे जीत हैं!’ या वाक्याची शब्दशः अंमलबजावणी करणारे वन्यजीव छायाचित्रकार युवराज गुजर यांचे वन्यजीव प्राण्यांशी असलेले नाते एकदम भन्नाट आहे.
आपला छंद आपल्याला कुठे आणि कधी सापडेल हे सांगणे कठीण. खरेतर युवराज गुर्जर हे पेशाने ‘रेमंड’ कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. परंतु, १९८७ दरम्यान जडलेली वन्यजीव प्राण्यांविषयीची उत्सुकता आणि त्यांच्या फोटोग्राफीचा छंद हा वर्षानुवर्ष वृद्धिंगत होत गेला. साधारण १९८७-८८दरम्यानची एक घटना कारणीभूत ठरली ती अशी की, कावळ्यांनी जखमी केलेले गरुडाचे पिल्लू युवराज यांच्या अंगणात पडले; सोसायटीमध्ये राहणार्या एका पक्षीतज्ज्ञांनी त्यांना या पक्ष्याची माहिती दिली आणि तरुण वयात या वन्यजीवानी युवराज यांच्या मनावर राज केले आणि प्रत्यक्ष जंगलात जाऊन अनुभव घेण्याचे त्यांनी ठरवले.
९०च्या दशकात फोटोग्राफी हा फारसा प्रचलित व्यवसाय नव्हता, त्यामुळे अनुभव आणि निरीक्षण यांमधून शिकत ते पुढे जात राहिले. एवढेच नाही, तर यादरम्यान युवराज यांनी भीमाशंकर येथे होणार्या वन्यजीवगणनेमध्ये योगदान दिले. याचवेळी मेळघाटानंतर ताडोबाचेदेखील नाव व्याघ्रप्रकल्पामध्ये समविष्ट होणार होते, त्यामुळे युवराज आपल्या साथीदारांसह ताडोबाच्या जंगलामध्ये गेले होते.
त्यावेळी एका विहीरसदृश खड्ड्यात वाघाचे दोन बछडे पडल्याचे समजताच या दोन बछड्यांना सुखरूप बाहेर काढून आपल्या आईकडे युवराज आणि त्यांच्या साथीदारांनी सोडले, ही त्यांची आणि वाघाची पहिली भेट. पिल्लं असली तरी ती वाघाचीच! त्यामुळे नक्कीच पहिला अनुभव हा थरारक असणार.
आपली नोकरी सांभाळत युवराज गुर्जर गेली तीन-चार दशके दर शनिवार-रविवार आजही सातत्याने जंगलवारी करत असतात. ताडोबाच्या जंगलातील व्याघ्रभेटीचा अनुभव घेतल्यानंतर गुर्जर यांच्या वाघांबरोबरीने अन्य श्वापदांशीही भेटीगाठी वाढत गेल्या. देवाने निर्माण केलेली सृष्टी ही किती अफाट आहे, याचा प्रत्येकवेळी वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्यय येत असतो.
या प्राण्यांना बोलता येत नसले तरी त्यांच्या प्रत्येक संकेताचा अर्थ असतो याचा अनुभव युवराज यांना श्रवणतालकडे येतानाचा ’अलार्म कॉल’ म्हणजेच धोक्याची सूचना ऐकून आला. या आवाजाच्या दिशेने गाडी वळवताच युवराज यांना जे चित्तथरारक दृश्य दिसले; काही जंगली कुत्र्यांनी एका चितळाच्या पिल्लाचा वेध घेतला होता. त्याचा फडशा पाडून होतोय न होतोय तोच गिधाडांना त्याची चाहूल लागली आणि ते देखील या पिल्लाचे लचके तोडण्यासाठी येऊन बसले. तोवर कोल्हेदेखील आयतं सावज खाण्यासाठी येऊन पोहोचले होते. हिरव्यागार, नयनरम्य जगातील लालभडक दृश्य हा येथील नियम आहे. याचा अनुभव युवराज यांना आला.
एवढ्या वर्षांच्या कालावधीत युवराज गुर्जर फक्त वन्यजीवांचीच नाही, तर अन्य छोट्या कीटकांची, फुलपाखरांचीदेखील मानसिकता ओळखायला शिकले आणि अचंबित करणारी दृश्य फक्त मोठ्याच जंगलात असे नाही तर ती सभोवतालच्या अंगणात, बागेतदेखील दिसू शकतात, हे त्यांनी आपल्या छायाचित्रांमधून दाखवून दिले. येऊर, फणसाडसारख्या परिसरात फुलपाखरांची वाट बघताना ती फुलपाखरं चक्क त्यांच्या कॅमेर्यावर, हातावर येऊन बसू लागली, जणू ते स्वतःहून आपले फोटोशूट करून घेण्यासाठी या निष्णात छायाचित्रकाराकडे आली आहेत.
या ३५-४० वर्षांच्या मुशाफिरीत त्यांना वन्यजीवांच्या जोडीने साप, विंचू, कीटक, फुलपाखरू अशा कितीतरी जीवांचे त्यांनी संशोधन केले आणि हे संशोधन फक्त स्वतःपुरताच मर्यादित न ठेवता निसर्गाची ही किमया छायाचित्रांसारख्या माध्यमातून, व्हिडिओजमधून, कधी लेख लिहित, कधी विविध वृत्तपत्रांमधून सदर लिहीत सर्वांना अनुभवण्यास दिली आणि आनंदाची बाब म्हणजे त्यांनी टिपलेली अनेक दृश्य, रंजकज्ञानाच्या कक्षा फक्त भारतापुरता सीमित राहिल्या नाहीत, तर परदेशातदेखील आज त्यांचा अभ्यास केला जातोय.
ही छायाचित्र, त्यांचे संशोधन हा फक्त त्यांच्यासाठी आज छंद राहिला नसून त्यांनी, भविष्यात तयार होणार्या वन्यजीव अभ्यासकांसाठी अभ्यासाचे आणि जागरूकतेचे महत्त्वाचे साधन ठरले आहे आणि याच संकल्पनेतून त्यांनी ठाणे, मुंबई जिल्ह्यात आढळून आलेल्या फुलपाखरांच्या जवळपास १६८ प्रजातींची माहिती देणारा एक अॅप तयार केला आहे. त्यांच्या छायाचित्रांसाठी त्यांना आजपर्यंत देश-विदेशातून गौरविण्यात आले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या छायाचित्रण प्रदर्शनात त्यांच्या छायाचित्रांचा प्रामुख्याने समावेश असतो. आपल्या छंदातून वन्यजीवांप्रती महत्त्वाचे पाऊल उचलत युवराज गुर्जर हे भविष्यात घडणार्या छायाचित्रकारांसाठी आदर्श उदाहरण ठरले आहेत, हे नक्की.