मुंबई: भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या खळबळजनक ट्वीटमुळे अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याकडे मोहित कंबोज यांनी इशारा केला आहे, असा प्रश्न या ट्वीटनंतर उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, असं मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा तीन ट्वीट केले आहेत. त्यापैकी दुसऱ्या ट्वीटमध्ये "२०१९ साली परमबीर सिंह यांच्या काळात बंद करण्यात आलेल्या सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे," असा उल्लेख आहे. खरंतर सिंचन घोटाळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं नाव आलं होतं. २०१९ साली प्रतिबंध विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट दिली होती. ACB ने १९ डिसेंबर २०१९ रोजी हायकोर्टात सादर केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांना क्लीन चिट दिल्याचं स्पष्ट केलं होता. तत्कालीन ACB चे महासंचालक परमबीर सिंह यांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, "या चौकशीत/तपासात प्रतिवादी क्रमांक ७ (अजित पवार) विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचं उत्तरदायित्व आढळलं नाही."
तर मोहित कंबोज यांनी केलेल्या आणखी एका ट्वीटमध्ये आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचं म्हटलं आहे. "भारत आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, गर्ल फ्रेंड्सच्या नावावरील संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी," या गोष्टींचा पर्दाफाश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
मोहित कंबोज यांच्या ट्वीटच्या मालिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता नेमका कोण? सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी होणार का? तसंच कोणत्या नेत्याचा ते पर्दाफाश करणार आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मोहित कंबोज यांच्या पत्रकार परिषदेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.