आपली राष्ट्रमाता ही खूपच प्राचीन आहे. जेव्हा ही भूमी छोट्या-छोट्या भूखंडात विभागली गेली नव्हती, अर्थातच सर्वत्र एकच अखंड भूमी माता होती. म्हणूनच ती फार पुरातन आहे. खंड किंवा देश कोणताही असो. त्याने आपले मूळ पाहिले, तर सगळ्यांची एकच भूमिमाता आहे, असे दृष्टिपथात येते. जेव्हा या एकाच भूमिमातेवर सर्व राष्ट्रांचे व राष्ट्रनेत्यांची दृष्टी पडेल, तेव्हा आम्ही सर्वजण एक आहोत, असा भाव जागृत होतो. अशा पुरातन मातृभूमीची नेहमी प्रशंसा व स्तुती झालीच पाहिजे.
पदे पदे मे जरिमा नि धायि
वरूत्री वा शक्रा या पायुभिश्च।
सिषक्तु माता यही रसा न: स्मत्
सूरिभिर्ऋजुहस्त ऋजुवनि:॥
(ऋग्वेद-५.४१.१५)
अन्वयार्थ
(या) जी (जरिमा) पुरातन, प्राचीन व स्तुतियोग्य अशी (वरूत्री) वरणीय, (शक्रा) शक्तिशालिनी (रसा) रसमयी, (ऋजुहस्ता) सरळ, सढळ हाताने तथा (ऋजुवनि:) अगदी सरळ भावनेने सेवा करण्यायोग्य (महीमाता) महान अशी मातृभूमी आई आहे, ती (मे) माझ्याकरिता (पदे पदे) पावलोपावली (निधा यि) उपस्थित, स्थापन झालेली आहे. (सा) ती (महीमाता) महान अशी राष्ट्रमाता, भूमिमाता (स्मत्) खरोखरच (नः) आम्हा सर्वांना (पायोभि:) रक्षक, शूर सैनिकांद्वारे व (सुरिभिश्च विद्वान्, ज्ञानिजनांद्वारे (सिषक्तु) चांगल्या प्रकारे बांधून ठेवो!
विवेचन
या जगात विविध माता आहेत. त्यात जन्म देणारी जननी म्हणजेच आई. ज्ञान-विज्ञान प्रदान करणारी वेदमाता (श्रुती माऊली), अमृत प्रदान करणारी गोमाता आणि आम्हा सर्वांचे पालनपोषण करणारी भूमिमाता किंवा राष्ट्रमाता. या सर्वांमध्ये राष्ट्रमातेला सर्वात वरचे स्थान आहे. कारण, याच एका राष्ट्रमातेवर इतर सर्व माता अवलंबून आहेत. वेदमंत्रात या मातेकरिता ‘महीमाता’ असा उल्लेख आलेला आहे. ‘मही’ म्हणजेच विशाल, महान व श्रेष्ठ, ही माता नेहमी सर्वदृष्ट्या सुखरूप, सुव्यवस्थित, सुरक्षित व ‘सुजलाम् सुफलाम्’ असेल, तर तिच्यावर वसणारे सर्व प्राणी किंवा प्रजा आनंदात राहू शकतात.
म्हणूनच तिच्या सुरक्षेची काळजी घेणे, हे आमचे आद्य कर्तव्य! याच भूमिमातेसाठी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लक्ष्मणाला उत्तर दिले होते-
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी।
म्हणजेच जननी आणि जन्मभूमी या आम्हांस स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत.
अशा या दोन्ही मातांच्या रक्षणासाठी प्रत्येक पुत्राने सदैव तत्पर असावे. कारण, आईच्या रक्षणाची काळजी वाहणे, हे मुलांचे आद्यकर्तव्य. जननी किंवा जन्मभूमी आम्हा सर्वांसाठी सर्वकाही अर्पण करतात. त्या सर्व प्रकारच्या सुखसुविधा आणि सुखैश्वर्य देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या रक्षणकार्यात आम्ही नेहमीच दक्ष असावे
वेदांचे राष्ट्र हे एका विशिष्ट सीमामर्यादेत बंदिस्त नसून ते विस्तृत स्वरूपाचे आहे. म्हणूनच तिला ‘महीमाता’ असे म्हटले जाते.
समग्र पृथ्वी हेच एक राष्ट्र होय. जेव्हा या पृथ्वीतलावरील मानव संकुचित हृदयाचा बनला, तेव्हा त्याने या मातेची शकले केली आणि लहान - मोठ्या भूप्रदेशाच्या रूपात आपले राष्ट्र म्हणून घोषित केले. आज आम्ही अशाच लहान-लहान भूखंडात, देशांत राहून त्या-त्या देशाची स्वतंत्र अशी एक संस्कृती निर्माण करत आहोत. पण खर्या अर्थाने वेदांचे राष्ट्र हे समग्र भूमिराष्ट्र होय. वेदातील राष्ट्रीय भावना उदात्त व व्यापक स्वरूपाची आहे.
जरी आज आम्ही वेगवेगळ्या भूखंडात विभागलो गेलो, तरी या पृथ्वीवरुपा विशाल राष्ट्रालाच आपला देश म्हणून संबोधले पाहिजे. यजुर्वेदातील दहाव्या अध्यायाचे पहिले चार मंत्र अशाच व्यापक भूमी राष्ट्राविषयी उदात्त भावना व्यक्त करतात, तर याच वेदातील २२व्या अध्यायातील २२व्या मंत्रात अशा राष्ट्रात आपण काय काय असावे, याचे वर्णन आढळते. अथर्ववेदाच्या बाराव्या कांडातील पहिले सूक्त हे ‘मातृभूमी सूक्त’ म्हणून ओळखले जाते. यातील जवळपास ६३ मंत्र भूमिमातेस अर्पण केले आहेत.
यास ’वसुंधरासूक्त’ असेदेखील म्हटले जाते. ऋग्वेदातील पहिल्याच मंडळातील ८० वे सूक्त हे स्वराज्याचे प्रतिपादन करणारे आहे. वेदांची ही व्यापक राष्ट्रभावना असली, तरी प्राप्त परिस्थितीत आपला भूभाग किंवा देश हीच आपली खरी भूमी व राष्ट्रमाता होय. असा विचार करून प्रत्येकाने आपापल्या देशाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावा आणि पुढे चालू आपल्या देशासोबतच सार्या भूमीवरील देशांकडेदेखील आपुलकीच्या भावनेने पाहावे. तेथे वसणार्या विदेशी प्रजाजनांना आत्मिक भावनेने व प्रेमदृष्टीने पाहत त्यांचे हित चिंतावे. अथर्ववेदातील भूमिसूक्तात अनेक मंत्रात ‘सा नो भूमि:।’ असा उल्लेख अनेकदा आढळतो.
म्हणजेच ती भूमिमाता आम्हा सर्वांना सर्व प्रकारचे बळ व तेज प्रदान करो. एके ठिकाणी ‘माता भूमि: पुत्रोऽहं पृथिव्या:।’ असे म्हणत भूमी किंवा देश हीच माझी आई असून त्या भूमातेचा मी अमृतपुत्र आहे, असे वर्णन दृष्टीस पडते. मग अशा या महन्मयी भूमिमातेच्या रक्षणासाठी आम्ही पुत्रांनी बलिदान देण्यास तयार राहावे . याचकरिता वेदमंत्रात म्हटले आहे - ‘वयं तुभ्य: बलिहृत: स्याम।’
सदर मंत्रात मातृभूमीसाठी अनेक विशेषणे आली आहेत. आपली राष्ट्रमाता ही खूपच प्राचीन आहे. जेव्हा ही भूमी छोट्या-छोट्या भूखंडात विभागली गेली नव्हती, अर्थातच सर्वत्र एकच अखंड भूमी माता होती. म्हणूनच ती फार पुरातन आहे. खंड किंवा देश कोणताही असो. त्याने आपले मूळ पाहिले, तर सगळ्यांची एकच भूमिमाता आहे, असे दृष्टिपथात येते.
जेव्हा या एकाच भूमिमातेवर सर्व राष्ट्रांचे व राष्ट्रनेत्यांची दृष्टी पडेल, तेव्हा आम्ही सर्वजण एक आहोत, असा भाव जागृत होतो. अशा पुरातन मातृभूमीची नेहमी प्रशंसा व स्तुती झालीच पाहिजे. स्तुती व प्रशंसा म्हणजेच या भूमिमातेची काळजी वाहणे. या भूमीवर कोणत्याही प्रकारचे अरिष्ट कोसळणार नाही, याची दक्षता घेणे. आपल्या मातृभूमीबरोबरच आपल्या देशाचीदेखील सर्व प्रकारे काळजी घेतली पाहिजे. आपल्या देशात सर्वजण नागरिक सुखा-समाधानाने व आनंदाने कसे राहतील आणि आपला देश सर्वदृष्टीने कसा विकसित होईल, याबाबतीत सतर्क राहणे म्हणजेच आईचे स्तवन करणे होय.
तसेच आपली मातृभूमी ही ‘वरणीय’ आणि वर प्रदान करणारी असावी. आम्ही जी कोणती इच्छा करू, ते ती प्रदान करणारी ठरावी. याकरिता आम्ही त्या भूमिमातेलादेखील सर्व धनसंपदांची निर्मात्री बनवले पाहिजे. असे झाले तर आपला देश किंवा ती भूमी निश्चितच ‘शक्रा’ म्हणजे ‘शक्तिशालिनी’ होईल. यासाठीच तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की आपल्या या देशाला बाह्य व अंतर्गत संकटांपासून वाचवणे.
सीमेवर लढणार्या वीर सैनिकांना पाठबळ देणे, तर स्वतःच एक सैनिक बनून देशाला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत बनविणे. जे लोक दीन-दु:खी, गरीब व असंख्य वेदनांनी पीडित झाले आहेत, अशांना आधार देत त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेणे हे आपले कर्तव्य नाही का? त्यामुळेच आपला देश बलशाली होईल.
पुढे या मंत्रात राष्ट्रभूमीला ‘रसमयी’ म्हटले आहे. रस म्हणजेच धनधान्य फळे व इतर खनिज संपत्ती यांची भरभराट. नीरस देश हा देश कधीच पुढे येऊ शकत नाही. आपल्या देशाच्या प्रत्येक भूभागावर विविध प्रकारचे धान्य, औषधी वनस्पती आणि नानाविध अन्न धान्यांची उत्पादने होत राहावे. त्यामुळे हा देश कृषी क्षेत्रात प्रगत होईल, यासाठी आपला देश कृषी, व्यापार उद्योगधंदे इत्यादी क्षेत्रात पुढे यावा. त्याचबरोबर मातृभूमीवर सर्वत्र ज्ञानरस विकसित होत राहावे. या दृष्टीने या मातेला रसमयी बनवण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे.
ज्या देशात किंवा ज्या भूमीत चांगल्या विचारांचे, सद्बुद्धीचे व चारित्र्यसंपन्न विचारवंत महापुरुष असतील, तो देश कधीही विपरित दिशेने वाटचाल करणार नाही. सर्वांच्या अंगी ऋजुता म्हणजेच सरलता येईल, कोणीही वाईट मार्गाने किंवा विकृत मनोवृत्तीने वागणार नाही. यासाठीच आपला देश हा ‘ऋजु+वनि:’ म्हणजेच सरलता व सुसेवावृत्तीने परिपूर्ण व्हावा. याच तत्त्वांनी मार्गक्रमण करीत हा देश पुढे जाऊ लागला, तर निश्चितच इतर राष्ट्रांसाठी तो आदर्श ठरतो. त्याचा कोणी शत्रू होऊ शकत नाही. इतर सर्व राष्ट्रे त्या देशांशी बंधुत्वाच्या भावनेनेच वागतील. सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी तो देश पात्र ठरेल.
शेवटच्या टप्प्यातील मंत्रात फार उत्कृष्ट गोष्ट प्रतिपादित केली आहे. मातृभूमी नेमकी कुठे आहे अथवा आमचा देश म्हणजे त्याचे नेमके स्थान आहे तरी कुठे? वेदमंत्रात म्हटले आहे-
मे पदे पदे मही माता!
जिथे जाऊ, तिथे आमच्या समवेत आमची भूमी आहे. देशातील अथवा जगातील कोणताही भूभागावर आम्ही उभे ठाकतो किंवा आसनस्थ होतो, ती भूमी आमच्यासाठी माता होय. पण याकरिता नागरिकांच्या अथवा भूमिपुत्रांच्या मनातदेखील तितकाच व्यापक भाव व्हावा. ’वसुधैव कुटुम्बकम्!’ किंवा ’हे विश्वचि माझे घर!’ इतका उच्च भाव ज्याच्या अंत:करणात असेल, त्यासाठी मातृभूमी किंवा भूप्रदेश हा अगदी पावलोपावलावर आहे.
आम्ही अगोदर देशोदेशी विभागलो गेलो, नंतर त्या त्या देशातील प्रांता-प्रांतात विभागलो गेलो, तर पुन्हा आम्ही विभाग आणि जिल्ह्यात विभागलो गेलो आणि आता तर इतके संकुचित झालो की, गावातील किंवा शहरातील गल्लीबोळापर्यंत आम्ही स्वतःला संकुचित करून ठेवले आहे. असे न करता ‘सब हैं भूमि गोपाल की!’ असे म्हणत जिथे जिथे पाय ठेवू तिथे भूमी माझ्यासाठी मातृभूमी आहे. हा उच्च दृष्टिकोन जो आपल्या अंतःकरणी बाळगेल, तो खर्या अर्थाने जगमित्र किंवा विश्वमित्र झाला, असे समजावे. पण याकरिता माणसाने आपल्यातील भेदाभेदांचा क्षुद्र संकुचितपणा अथवा स्वार्थभाव सोडावयास हवा.