नवी दिल्ली : द काश्मीर फाईल्ससारख्या चित्रपटामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा समावेश आता देशातील सर्वात प्रभावी दिग्दर्शकांमध्ये होत आहे . फक्त काश्मीर फाईल्सच नाही तर त्याही पूर्वी त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट प्रेक्षकांना तेवढेच भावले होते. त्या चित्रपटांवरुन देखील त्यांना वादाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र सर्वाधिक वाद झाला तो काश्मीर फाईल्समुळे. देशातील सर्व स्तरातील अनेक दिग्गजांनी द काश्मीर फाईल्सवर आपली प्रतिक्रिया दिली होती. देशाचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील त्या चित्रपटावर प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरला नव्हता.
विवेक अग्निहोत्री अनेकदा त्यांच्या कठोर प्रतिक्रिया आणि विधानांमुळे चर्चेत असतात; आता पुन्हा एकदा अग्निहोत्री चर्चेत आले आहेत. सध्या ते बॉलीवूड, त्यातील राजकारण, त्यामधील घराणेशाही आणि अशा अनेक गोष्टींवर सडकून टीका करत आहेत . त्यांनी गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा जो वाद रंगला होता त्यावरुन प्रतिक्रिया दिली होती. यावेळी विशेषतः खान कलाकार मंडळींवर त्यांनी निशाणा साधला होता. या अभिनेत्यांनी कधीच आपल्या चित्रपटांविषयी भूमिका मांडली नाही, त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, असे अग्निहोत्री यांचे म्हणणे आहे.
अग्निहोत्री यांनी सोशल मीडीयावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी मोदीजींच्या भाषणाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यावेळी नरेंद्र मोदीजींनी देशातील राजकारण, त्या राजकारणातील घराणेशाही, भ्रष्टाचारावर कडाडून टीका केली आहे. त्याचा आधार घेत अग्निहोत्रींनी बाजु मांडली आहे. नैतिक भ्रष्टाचार, मामा-भाच्यांमधील वाद आणि हिंदू फोबिया या तीन गोष्टी बॉलीवूडसाठी मारक असल्याचे अग्निहोत्री यांनी म्हटले आहे. भाई-पुतण्या, भाचा वाद हा तर गेले अनेक दिवस सुरु आहे. त्यामुळे बॉलीवूडने वेगळेच वळण घेतले आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी अग्निहोत्रींना मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्स त्यांना ट्रोल करत आहेत तर काही पाठिंबादेखील देत आहेत.