वॉशिंग्टन डीसी : संपूर्ण जगाला ग्रासत चाललेल्या आर्थिक मंदीचे संकट अजून गहिरे होण्यास सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेलाही या संकटाने ग्रासले आहे. जगातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या गुगल मध्ये कर्मचारी कपातीची वेळ आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून गुगल मधील अनेक कर्मचाऱ्यांना त्यांची कामगिरी सातत्याने खराब होत असेल तर नोकरी गमावण्याची वेळ येईल अशा नोटीस पाठवण्यात येत आहेत.
कंपनीच्या या धोरणाबद्दल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुंदर पिचाई यांनीही कर्मचाऱ्यांचे या येणाऱ्या तिमाहीत जर चांगले प्रदर्शन झाले नाही तर त्यांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल असा इशाराच दिला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कामाची गुणवत्ता वाढवण्यासाठी २०२३ पासून वेगवेगळ्या योजना राबवण्यात येणार आहेत. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी नोकरभरती थांबवून तो पैसे गुंतवणुकीसाठी वापण्याचे ठरवले आहे असेही पिचाई यांनी सांगितले आहे.
एकुणच जागतिक अर्थव्यवस्थेला ग्रासत जाणारे आर्थिक मंदीचे संकट हळू हळू गहिरे होत चालले आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या ब्लूमबर्ग रिपोर्ट मध्ये अमेरिकेत आर्थिक मंदीची शक्यता ४० टक्के इतकी वर्तवण्यात आली आहे. जगातील विविध देशांवरचे मंदीचे सावट गहिरे होत चाललेले असताना भारताला मात्र या मंदीपासून कुठलाही धोका नसून भारतात मंदीची शून्य शक्यता आहे असे त्या ब्लूमबर्ग रिपोर्ट मध्ये म्हटले आहे.