
मुंबई : हॉलीवूडचा ऑस्कर विजेता चित्रपट फॉरेस्ट गम्पचा रिमेक असलेला 'लाल सिंह चढ्ढा' आमीर खानच्या पचनी पडलेला दिसत नाही. मिस्टर परफेक्शनिस्टचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. खूप प्रमोशन करून देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. खरेतर आमीर खान चित्रपट बनवताना त्याच्या संहितेपासून प्रत्येक पैलूवर अतिशय मनापासून काम करतो; परंतु सध्या त्याला त्याच्या कामात यश येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याचा ड्रीम प्रोजेक्ट 'लाल सिंह चड्ढा' अपयशी झाल्यानंतर त्याला चांगलाच धक्का बसला आहे. यामुळे आता आमीर एका निर्णयापर्यंत येऊन पोहचला आहे.
आमिर खान 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' फ्लॉप झाल्यानंतर 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट घेऊन आला. या चित्रपटावर तो बराच वेळ काम करत होता. परंतु, हा चित्रपट प्रेक्षकांच्या कसोटीवर खरा उतरू शकला नाही. हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचे हक्क विकत घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यानंतर हा चित्रपट बनवताना खूप घाम गाळला. परंतु, या चित्रपटाने पाच दिवसांत फक्त ४८ कोटीच कमवू शकला आहे.
आमिर खान आणि किरण राव यांच्या एका मित्राने सांगितले आहे की, आमिर खानला 'लाल सिंह चड्ढा' फ्लॉप झाल्याने मोठा धक्का बसला आहे. प्रेक्षकांनी त्याचा हा प्रोजेक् नाकारल्याने आमिरवर वाईट परिणाम झाला आहे. त्याने मोठ्या जोमाने आणि अपेक्षेने हा चित्रपट बनवला होता. इतकेच नाही तर चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी आमिरने घेतली आहे. यामुळे वितरकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमिर खानच्या अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंह चड्ढाने गुरुवारी ११.७ कोटी, शुक्रवारी ७.२६ कोटी, शनिवारी ९ कोटी, रविवारी १० कोटी आणि सोमवारी ८ ते ९ कोटींचा व्यवसाय केला. अशाप्रकारे या चित्रपटाने जवळपास ४७-४८ कोटींचा व्यवसाय केला आहे. आमिर खानशिवाय या चित्रपटात करीना कपूर, मोना सिंग आणि नागा चैतन्य मुख्य भूमिकेत आहेत.