मुंबई : आमीर खानचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘लाल सिंह चड्ढा’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. रिलीजपूर्वी 'बॉयकोट'केल्यामुळे त्याचा परिणाम आता बॉक्स ऑफिसवर चांगलाच दिसून येत आहे. सोशल मिडीयावर ज्या गतीने हा चित्रपट बॉयकोट केला जात आहे, त्यावरून बॉलीवूडचे अनेक कलाकार आमीर खानचे समर्थन करत चित्रपट बघण्याची विनंती लोकांना करत आहेत आणि यामुळे तेदेखील लोकांच्या निशाण्यावर येत आहेत.
यामध्ये आता हृतिक रोशन हा देखील लोकांच्या निशाण्यावर आहे. हृतिक रोशनने १३ ऑगस्ट रोजी, आमीर खानला पाठिंबा देत हा चित्रपट जरूर पाहावा असे ट्वीट करत लोकांना सांगितले. परंतु, 'लाल सिंह चड्ढा'ला पाठिंबा देणे हृतिक रोशनच्या अंगाशी आले आहे कारण, आता सोशल मिडीयावर #boycottVikramVedha ट्रेंड होऊ लागले आहे.
हृतिक रोशनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ' मी नुकताच हा चित्रपट बघितला आहे. आणि कित्येक दिवसांनी मला चित्रपट भावला आहे. चांगले किंवा वाईट बाजूला बाजूला सारून हा चित्रपट पाहण्याची संधी गमवू नका. हा अप्रतिम चित्रपट आहे आणि याचा अनुभव तुम्हीदेखील अवश्य घ्या.'
हृतिक रोशनचे हे ट्वीट आता सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे. आणि आता हा देखील ट्रोलर्सचे निशाण बनला आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांनी भडकून हृतिक रोशनचा 'विक्रमवेधा' देखील बॉयकोट करण्याच्या तयारीत आहेत. हृतिकचे ट्वीट वाचून भडकलेला एक युजर त्याला विचारतोय, 'बॉलीवूडमधून संन्यास घेण्याचा निर्धार केलायस का तू!'
दुसरा युजर म्हणतोय, 'ज्याचा चित्रपट आहे त्याचं कोणी ऐकत नाहीये, तू कोण आहेस मग! तुझ्या येणाऱ्या चित्रपटाचा विचार कर तू, नाहीतर तुझीसुद्धा परिस्थिती आमीरसारखीच होईल.' एक नेटकरी म्हणतोय, 'तुमचं जर ठरलंच असेल तर ठीक आहे; आता आम्हाला हळूहळू संपूर्ण बोलीवूडवर बहिष्कार टाकायला वेळ नाही लागणार. आता लाल सिंह चढ्ढा झालाय, यानंतर 'पठाण' होईल, तुझा नंबर यायला वेळ लागणार नाही.' तर एक नेटकरी म्हणत आहेत की,' आम्ही तुझा सन्मान करतो, पण विसरू नकोस तू हिंदू आहेस. हिंदू धर्माचा अपमान आता हिंदुस्थानात सहन केला जाणार नाही.'
त्यामुळे आता आमीर खानच्या चित्रपटाला जे कलाकार पाठिंबा देत आहेत ते एकएक करून या नेटकऱ्यांचे शिकार बनत आहेत.