भारताची सर्वोच्च उपलब्धी म्हणजे अविरत ७५ वर्षांचे घटनाधिष्ठित लोकशाही राज्य. गेल्या ७५ वर्षांत जगातल्या अनेक देशात अनेक स्थित्यंतरे झाली, त्यापैकी अनेक देशांत हुकूमशाही आली, जनतेत यादवी माजली, अराजक निर्माण झाले. पण, भारतात आणीबाणीचा अपवाद वगळता इतर देशांप्रमाणे अस्थिर परिस्थिती तयार झाली नाही.
आज आपण भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. गेल्या आठ दशकांत भारताने विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी करत जगाच्या पटलावर आपला ठसा उमटवला. त्यासंबंधीची माहिती आजच्या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या विशेषांकात दिलेली आहेच. मात्र, त्या सर्वांपेक्षाही भारताची सर्वोच्च उपलब्धी म्हणजे अविरत ७५वर्षांचे घटनाधिष्ठित लोकशाही राज्य. स्वातंत्र्यापासूनच भारतात आर्थिक मागासलेपणा, सामाजिक भेदभावाबरोबरच वेगवेगळ्या चालीरिती, परंपरा, भाषा अस्तित्वात आहेत. त्यातच भारताची लोकसंख्या आज १४० कोटींपेक्षाही अधिक आहे. गेल्या ७५वर्षांत जगातल्या अनेक देशात अनेक स्थित्यंतरे झाली, त्यापैकी अनेक देशांत हुकूमशाही आली, जनतेत यादवी माजली, अराजक निर्माण झाले. पण, भारतात आणीबाणीचा अपवाद वगळता इतर देशांप्रमाणे अस्थिर परिस्थिती तयार झाली नाही. विशेष म्हणजे, आणीबाणीकर्त्यांनाही भारतीयांनी निवडणुकीच्याच लोकशाही मार्गाने धडा शिकवत, देशात हुकूमशाही चालणार नाहीचा संदेश दिला. त्यातूनच आज भारत लोकशाही देश म्हणून उभा आहे आणि यापुढेही उभा राहिलच, त्यात देशाच्या राज्यघटनेचे योगदान सर्वाधिक असेल.
त्यानंतर भारताने स्वातंत्र्योत्तर काळात शक्य करुन दाखवलेल्या गोष्टींत हरितक्रांतीचा उल्लेख करावा लागेल. कृषिप्रधान देश असूनही भारताने अनेक वर्षे अन्नधान्याच्या टंचाईचा सामना केला. देशवासीयांची अन्नाची गरज भागवण्यासाठी भारताला सतत धान्याच्या आयातीचाही आधार घ्यावा लागला. पण, 1967 साली देशात ‘हरितक्रांती’ झाली आणि भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आजच्या घडीला तर भारत जगाच्या पाठीवर कडधान्याचा सर्वात मोठा उत्पादक देश असून तांदूळ, गहू आणि ऊसाच्या उत्पादनात क्रमांक दोनवर आहे. त्यानंतर भारताने १९७० साली ‘धवलक्रांती’चा पाया घातला. त्याला जगातला सर्वात मोठा ‘डेअरी उद्योग विकास कार्यक्रम’ म्हणून ओळखले जाते. त्यातूनच ‘राष्ट्रीय डेअरी विकास संस्थे’ची स्थापना झाली व भारत दुग्धोत्पादनात स्वावलंबी झाला. इतकेच नव्हे, तर ग्रामीण भारताच्या विकासात ‘धवलक्रांती’ने सर्वाधिक योगदान दिले.
पुढची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे भारतीय अणू कार्यक्रम. दि. १८ मे, १९७४ रोजी भारताने राजस्थानच्या पोखरणमध्ये पहिली अणू चाचणी करत जगाला आपली दखल घ्यायला लावली. या चाचणीने भारत संयुक्त राष्ट्रांच्या अमेरिका, सोव्हिएत संघ, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन या स्थायी सदस्यांव्यतिरिक्तचा केवळ सहावा अण्वस्त्रसंपन्न देश ठरला. त्यानंतर पुन्हा ११ आणि १३ मे १९९८ रोजी भारताने अणूचाचणी केली आणि आपल्या शक्तीचा परिचय करून दिला. शक्ती असेल, तर शांतता नांदेल, ही उक्ती भारताच्या अणू चाचणीतूनच प्रत्यक्षात आली. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे, शक्तिशाली संरक्षण सज्जता. स्वातंत्र्यानंतर पुन्हा पारतंत्र्य येऊ नये, म्हणून सुरुवातीच्या काळापेक्षा युद्धाचे अनुभव आल्यानंतर भारताने संरक्षणाकडे विशेष लक्ष दिले. आज भारताकडे जगातले दुसर्या क्रमांकाचे सैन्यबळ असून, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे भंडार आहे. उल्लेखनीय म्हणजे, एकेकाळी शस्त्रास्त्रांच्या आयातीसाठी ओळखला जाणार भारत आज शस्त्रास्त्रांची निर्यातदेखील करत आहे.
त्यानंतरचा विषय म्हणजे ‘भारतीय अवकाश संशोधन’ संस्था अर्थात ‘इस्रो’ची दि. १५ ऑगस्ट, १९६९ रोजी झालेली स्थापना.१९७५ साली ‘इस्रो’ने ‘आर्यभट्ट’ नावाने आपला पहिला उपग्रह प्रक्षेपित केला आणि पुन्हा मागे वळून पाहिले नाही. पुढे १९८६ साली राकेश शर्मा अवकाशात जाणारे पहिले भारतीय ठरले, तर आज ‘मेक इन इंडिया’ अभियानांतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताने सर्वोत्कृष्ट उपग्रह प्रक्षेपकांची निर्मिती केलेली आहे. २००८ साली भारताने ‘पीएसएलव्ही-सी९’द्वारे एकाचवेळी दहा उपग्रह प्रक्षेपणाची कामगिरी करून दाखवली, तर ‘चांद्रयाना’च्या माध्यमातून भारताने चंद्रावर आणि ‘मंगळयाना’च्या माध्यमातून भारताने मंगळावरही आपला झेंडा फडकावला. आज ‘भारतीय अवकाश संशोधन’ संस्था म्हणजेच ‘इस्रो’चे नाव जगातील अग्रगण्य अवकाश संस्था म्हणून घेतले जाते, तसेच अनेक देशांचे उपग्रहदेखील भारत प्रक्षेपित करतो.
वरील उपलब्धींबरोबरच भारतीयांच्या सरासरी आयुर्मर्यादेत झालेली वाढदेखील महत्त्वाचा मुद्दा म्हटला पाहिजे. कारण, १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशातली सरासरी आयुर्मर्यादा ३२ इतकी कमी होती. म्हणजे, त्या वयात सर्वाधिक भारतीयांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू होत असे. पण, २०२२ साली भारताने मोठी कामगिरी केली व सरासरी आयुर्मर्यादा ७० वर्षांपर्यंत पोहोचली. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने भारताच्या या उपलब्धीची प्रशंसा केली आहे. पोलिओमुक्त भारताचा मुद्दाही महत्त्वाचा म्हटला पाहिजे. कारण, १९९४ पर्यंत जगातली ६० टक्के पोलिओची प्रकरणे भारतात आढळत होती. त्यानंतरच्या दोन दशकात म्हणजे २०१४ साली भारताला ‘जागतिक आरोग्य संघटने’कडून पोलिओमुक्तीचे प्रमाणपत्र मिळाले. भारतीयांच्या सरासरी आयुर्मर्यादेत झालेल्या वाढीत त्याचे मोठे योगदान आहे.
शिक्षणाचा अधिकार हा मुद्दादेखील महत्त्वाचा. आपल्या विकासयात्रेत शिक्षणाला प्राधान्यक्रम देण्यातून भारताने खूप मोठा पल्ला गाठला आहे. २०१०साली शिक्षणाचा अधिकार देणारा कायदा करण्यात आला आणि प्रत्येक भारतीय बालकाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जाऊ लागले. यासोबतच लैंगिक समानतादेखील भारताची उपलब्धी मानावी लागेल. लैंगिक समानता प्रत्यक्षात आणण्यासाठी भारताने अनेक पावले उचलली. ‘१९६१ चा हुंडा प्रतिबंधक कायदा’, त्यानंतर ‘२००५ सालचा घरगुती हिंसाचारविरोधी कायदा’ आणि ‘२०१९ सालचा तिहेरी तलाकविरोधी कायदा’, यातून महिलाहिताची काळजी घेतली गेली. याव्यतिरिक्त २०१६ साली भारताने आणलेली ‘युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस’ (युपीआय) प्रणालीदेखील देशाची सर्वोच्च उपलब्धी आहे. रोखविरहीत अर्थव्यवस्थेसाठी ‘युपीआय’ प्रणालीचे विशेष महत्त्व आहे. आज जगातील अनेक देशांचे नेतृत्व भारताच्या ‘युपीआय’ प्रणालीचे कौतुक करताना दिसते. या माध्यमातून भारत जगातील अनेक देशांपेक्षा कित्येक पावले पुढे गेला. आज भारताचा जगातील सर्वाधिक ‘डिजिटल’ व्यवहार होणार्या देशांत समावेश होतो. त्यातून प्रत्येक व्यवहाराची नोंदही होते आणि अर्थव्यवस्थेलाही फायदा होतो.
आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समयी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील निर्णय घेणारे, कणखर सरकार अस्तित्वात आहे. भारताने गेल्या आठ दशकांत जी आर्थिक, वैज्ञानिक, संरक्षण, सामाजिक क्षेत्रात प्रगती केली, ती निरंतर पुढे घेऊन जाण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. सोबतच भारतीयांच्या मनात सदैव राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम जागृत राहण्यासाठी यंदा त्यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहीमही सुरू केली. त्यात या तीन दिवसांत कोट्यवधी जनतेने सहभाग घेतला व तिरंग्याविषयीची आपली निष्ठा व्यक्त केली. यापुढील काळात देशाचा विकास असो वा राष्ट्र प्रथमची भावना त्यात इथला प्रत्येक नागरिक आपले अनन्यसाधारण योगदान देण्यासाठी सज्ज राहील, याचा विश्वास वाटतो. या विश्वासासह सर्वांना देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा!