मुंबई : हिंदी असो वा मराठी कोणत्याही सिनेइंडस्ट्रीतील गोसिप्समध्ये चाहत्यांना खूप रस असतो. त्यातही एखादे कपल एकत्र येत असेल वा विभक्त होत असेल तर ते जाणून घ्यायला लोक अधिक उत्सुक असतात. सिनेइंडस्ट्रीतील सिद्धार्थ जाधव हासुद्धा आजकाल खूप चर्चेत असतो. सध्या ह्या अभिनेत्याच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांचा घटस्फोट होणार का हा चर्चेचा विषय ठरल्यामुळे सिद्धार्थ जाधवला अतिशय मनस्ताप झाला आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थने याबाबत खुलासा केला आहे.
सिद्धार्थ जाधवने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, 'माझ्या करिअरच्या आणि आयुष्याच्या चढउतारामध्ये तृप्तीने म्हणजे माझ्या पत्नीने मला भक्कम साथ दिली आहे. जेव्हा कोणी नव्हते तेव्हा तृप्ती माझ्याबरोबर होती. तिचे माझ्या जीवनातील स्थान हे असाधारण आहे.' असे सांगून सिद्धार्थने स्वतःहून या बातमीवर पडदा टाकला आहे.
मध्यंतरी सिद्धार्थ आपल्या पत्नी आणि मुलींबरोबर दुबईत फिरायला गेला होता परंतु, त्याने पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये फक्त तो आणि त्याच्या मुलीच होत्या, त्यामुळे या चर्चेला अधिक उधाण आले होते. तृप्ती आणि सिद्धार्थ यांचा २००७साली प्रेमविवाह झाला आहे. तसेच त्यांना स्वरा आणि इरा, अशा दोन मुलीही आहेत. नुकताच सिद्धार्थचा 'दे धक्का २' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून पहिल्या भागाएव्हढाच प्रतिसाद याही भागास मिळत आहे.