राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबाने केली चाहत्यांना विनंती

    13-Aug-2022
Total Views |
 
 
rajusrivastav
 
 
 
नवी दिल्ली : प्रसिद्ध विनोदी अभिनेता आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. तब्बल तीन दिवसानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाहीय. व्यायाम करत असताना राजू अचानक बेशुद्ध झाले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 
 
 
 
हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याच दिवशी राजू यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मिडीयाला मिळालेल्या माहितीमध्ये असे सांगण्यात आले की त्यांची प्रकृती ४८ तास उलटून गेले तरीही चिंताजनकच आहे. ते अजूनही व्हेंटीलेटरवर आहेत कारण, त्यांच्या प्रकृतीत कोणताच सुधार झालेला नाही आहे.
 
 
 
 
एम्समधील कार्डिओलॉजी विभागाचे तज्ञ डॉ. नितीश नाईक हे राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करत आहेत. शुक्रवारी रात्री श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक निवेदन केलं होतं. यामध्ये त्यांनी लिहलं आहे की, 'राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. ते यातून लवकरात लवकर ठीक व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत आणि सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सर्व शुभचिंतकांचे त्यांच्या निरंतर प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.' त्यांच्या कुटुंबाने लोकांना विनंती केली आहे की, 'कोणत्याही अफवा किंवा खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका.'
 
 
 
 
बुधवारी सकाळी वर्कआउटदरम्यान ही घटना घडली. राजू श्रीवास्तव वर्कआउट करत होते. परंतु अचानक ते ट्रेडमिलवरुन खाली कोसळले. त्यांनतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या राजू श्रीवास्तव यांची प्रकृती नाजूक आहे. जगभरातील त्यांचे चाहते आणि सह कलाकार मित्र त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.