देशाबद्दल वादग्रस्त विधान करणारा आमीर 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी

    13-Aug-2022
Total Views |

amirkhan
 
 
 
मुंबई : यंदाचे वर्ष हे भारत देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. सध्या भारतभरात 'हर घर तिरंगा' मोहिमेत सर्व नागरिक लक्षणीय सहभाग घेताना दिसत आहेत. अनेक कलाकारही यात सहभागी झाले आहेत, त्यात आमीर खान हे देखील एक नाव आहे. एकेकाळी भारत देशाबद्दल त्याने केलेलं वादग्रस्त वक्तव्य बरेच गाजले होते.
 
 
 
आता लाल सिंग चड्ढा सिनेमामुळे आमिर खान पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आला आहे. आमिरच्या या सिनेमाला सुद्धा अनेक ठिकाणाहून कडाडून विरोध होताना दिसत आहे. आमिरने काही काळापूर्वी देशाबद्दल जे वक्तव्य केले होते त्यामुळे त्याच्या सिनेमावर बहिष्कार टाकावा अशी मागणी होत आहे.
 
 
 
 
हा सर्व गोंधळ सुरु असताना मात्र सध्या मिस्टर परफेक्शनिस्टचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये आमिरने त्याच्या घरात भारत देशाचा ध्वज फडकावल्याचं दिसत आहे. यावर्षी भारताच्या स्वातंत्र्यदिनाची अमृत महोत्सवी वर्ष साजरी करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला आवाहन केलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होत आमिरने सुद्धा घराच्याबाहेर देशाचा तिरंगा फडकावल्याचे दिसून येत आहे.
 
 
 
 
देशाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आणि टीकांचा भडिमार आमीर खानवर आजही होत आहे. परंतु, आपली चूक सारवताना, आमिरने लाल सिंग चड्ढा सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अनेक मुलाखतींतून याबद्दल आपलं मत मांडत, आपल्या मनात देशाबद्दल नितांत प्रेम आहे असे त्याला सांगावे लागत आहे. त्यामुळे त्याने ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांची माफीसुद्धा मागितली आहे.
 
 
 
 
आमिरच्या घराबाहेर दिसणारा हा देशाचा तिरंगा पाहून त्याच अनेक ठिकाणहून कौतुक होत आहे तर काही ठिकाणी टीकेचा सूर कायम आहे. या फोटोंमध्ये आमिर आपल्या लेकीसह वेळ घालवताना दिसत आहे.
 
 
 
 
 
लाल सिंग चड्ढा सिनेमाशी निगडित अनेक बातम्या सध्या समोर येत आहेत. लोकांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे अनेक भागांमध्ये प्रेक्षकांचा रिस्पॉन्स बघून या सिनेमाचे शो रद्द आणि कमी केले जात आहेत तर अनेक ठिकाणी सिनेमाला चांगला प्रतिसादही मिळत आहे.