मुंबई : "बहीण संकटात असताना भाऊ मदतीला येतो, असे म्हटले जाते. पण भाऊ संकटात असताना बहिणीने मदतीला तत्परतेने यायला नको का ?" असे म्हणत नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून एक भावनिक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी अत्यंत दणक्यात झालेल्या समारंभात शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुषमा अंधारेंना आताच उद्धव ठाकरेंचा पुळका यावा यात काहीच नवल नाही. याच माजी मुख्यमंत्र्यांचा बाप काढणारी जाहीर कोरडे ओढणारी राष्ट्रवादी काँग्रेसची धडाडती तोफ म्हणून याच सुषमा अंधारेंची ओळख होती.
हिंदू देवी - देवता, परंपरा या सर्वांना येथेच्छ नावे ठेवण्यात धन्यता मानणाऱ्या सुषमा अंधारेंनी आपल्या याच शिवसेनेतील पक्षप्रवेशाचे स्पष्टीकरण हिंदू धर्मातीलच अत्यंत महत्वाच्या रक्षाबंधन सणाचाच आधार घेऊन केले आहे. या पत्रातून आपण शिवसेनेत का ? आणि कुठल्या परिस्थितीत प्रवेश केला याची कहाणी सांगितली आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर कोसळलेल्या महाविकास आघाडी सरकार नंतरही उद्धव ठाकरे कसे विचलित न होता शांतपणे परिस्थितीला तोंड देत होते याचे वर्णन केले आहे. आपल्याला सचिन अहिरांनी कशा पद्धतीने पक्षप्रवेशाबद्दल विचारले होते आणि आपण कसा क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या मेसेजला रिप्लाय दिला तो स्क्रीनशॉट देखील सुषमा अंधारेंनी शेअर केला आहे.
आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने आपण हा शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला असे सांगत, आपल्या शिवसेना पक्ष प्रवेशाचे भावनिक स्पष्टीकरण दिले आहे. भावाच्या मदतीला धावून आले आहे अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे. याच सुषमा अंधारेंना शिवसेनेच्याच उमेदवाराविरोधात प्रचारासाठी राष्ट्रवादीकडून प्रमुख प्रचारक म्हणून वापरले जात असताना, आता हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा शिवसेना धर्म सोडलेली शिवसेना जवळची वाटावी हा निश्चितच योगायोग नाही. निव्वळ राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या तत्वांना तिलांजली द्यायला मागेपुढे न पाहणाऱ्या शिवसेनेला त्यांची वाट मतदार नक्कीच दाखवतील.