
तृतीयपंथियासोबत साजरे केले रक्षाबंधन, हाती दिला तिरंगा
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : भारताला ‘विश्वगुरू’ बनवायचे असेल तर त्यासाठी सामाजिक समरसता अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे तृतीयपंथियांसह सर्व समाजघटकांना सामाजिक न्यायाची वागणूक देणे तर्कसंगत आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेशचे सहप्रभारी सुनील देवधर यांनी गुरुवारी केले.
भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी तृतीयपंथियांसोबत रक्षाबंधन साजरे केले. यावेळी पटना येथे तृतीयपंथियांच्या सर्वांगिण विकासासाठी एनजीओ चालविणाऱ्या रेश्मा प्रसाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुनील देवधर यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. त्यानंतर देवधर यांनी त्यांच्यासोबत भोजनही केले. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेंतर्गत रेश्मा प्रसाद यांना तिरंगा देखील दिला.
यावेळी बोलताना देवधर म्हणाले, काही दिवसांपूर्वी पटना येथे रेश्मा प्रसाद यांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांच्या तृतीयपंथियांसाठी काम करणाऱ्या एनजीओचे काम जाणून घेतले होते. त्यावेळी रेश्मा प्रसाद यांनी त्यांना येणाऱ्या अडचणीदेखील सांगितल्या होत्या. समाजामध्ये चांगल्या दृष्टीने न बघितले जाणे, उपेक्षित वागणूक देणे आणि सामाजिक सन्मान नाकारला जात असल्याचे रेश्मा प्रसाद यांनी बोलून दाखविले होते.
त्यावेळी त्यांच्या समस्या भावाच्या नात्याने सोडविण्याचे आश्वासन त्यांना दिल्याचे देवधर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक न्याय विभागांतर्गत तृतीयपंथियांसाठी ३६५ कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही देवधर यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे देशाला ‘विश्वगुरू’ बनविण्यासाठी सामाजिक समरसता ही त्याची पहिली अट असल्याचेही सुनील देवधर यांनी यावेळी सांगितले.