संशयित नक्षलवादी वरवरा रावला वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजुर : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

    10-Aug-2022
Total Views |
 
rao 
 
 
 
नवी दिल्ली : संशयित नक्षलवादी वरवरा राव यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजुर केला आहे. राव हा २०१८ सालच्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी असून त्याच्यावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राव याच्या जामीनास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएतर्फे विरोध करण्यात आला होता.
 
 
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती उदय उमेश लळित आणि न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने संशयित नक्षलवादी वरवरा राव यास वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजुर केला आहे. न्या. लळित यावेळी म्हणाले, हा जामीन केवळ वैद्यकीय कारणास्तव आहे आणि या आदेशाचा इतर आरोपी किंवा अपीलकर्त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही. राव कोणत्याही प्रकारे आपल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करणार नाहीत आणि त्यांनी कोणत्याही साक्षीदाराच्या संपर्कात राहू नये, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
 
 
संशयित नक्षलवादी वरवरा राव यास जामीन देण्यात येऊ नये, यासाठी एनआयएने युक्तीवाद केला. एनआयएने म्हटले, राव हे केवळ सीपीआय (माओवादी) निगडित किंवा समर्थक नव्हते तर ते सतत बंदी घातलेल्या संघटनेचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी कार्यरत होते. त्यासाठी सीपीआयएमच्या सदस्यांकडून त्यांचे सातत्याने कौतुकही करण्यात येत होते. यावेळी एनआयएने न्यायालयात बंदी घातलेल्या संघटनेच्य़ा "भारतीय क्रांतीची रणनीती आणि डावपेच" या दस्तऐवजाचाही संदर्भ देऊन जामीनास विरोध केला.