सुरेंद्र गडलिंगची होणार ईडी चौकशी; विशेष एनआयए न्यायालयाकडून परवानगी
10-Aug-2022
Total Views |
मुंबई: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या सुरेंद्र गडलिंगची आता ईडी चौकशी होणार आहे. विशेष एनआयए न्यायालयाने बुधवारी दि. १० ऑगस्ट रोजी 'ईडी'ला नागपूर येथील वकील सुरेंद्र गडलिंग याची मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी करण्याची परवानगी दिली. ईडीचे प्रकरण हे एल्गार परिषद-भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणावर आधारित आहे. ज्यात एनअएने गडलिंगसह १६ लोकांना अटक केली आहे.
विशेष न्यायाधीश राजेश कटारिया यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना गडलिंगची दि. १७, १८ आणि १९ ऑगस्ट रोजी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत 'एनआयए'ने एल्गार परिषद-भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी हे प्रतिबंधित कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (माओवादी) सदस्य असल्याचे म्हंटले आहे. आणि गडलिंग इतर दहशतवाद्यांच्या संगनमताने भारताविषयी असंतोष निर्माण करण्यासाठी निधी उभारण्यात गुंतले होते. असे नमूद केले आहे. त्यांची नियमित कामे करण्यासाठी, आरोपींनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे उघडलेल्या विविध बँक खात्यांमध्ये निधी प्राप्त केला होता आणि गडलिंग हा मुख्य संशयित होता, असे त्यात म्हटले आहे.