सिद्धरामय्यांच्या विषवल्लीचे प्रयोग

    10-Aug-2022   
Total Views |

karnatak
 
कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे शाब्दिक विषवल्लीचे प्रयोग काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. द्वेषपूर्ण वक्तव्याने वातावरण गढूळ करण्यात पटाईत असल्याने त्यांना विषवल्लीला खतपाणी घालणे अगदी सहज जमते. नुकतीच त्यांनी रा. स्व. संघविरोधात गरळ ओकली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही उच्च जातींची संघटना असून, भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत भाजप आणि संघाच्या योगदानावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सिद्धरामय्या एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ‘संघाचा मी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. कारण, ही केवळ उच्च जातींची संघटना आहे,’ अशी बाष्कळ बडबडही सिद्धरामय्यांनी केली. रा. स्व. संघ, भाजप, हिंदू महासभा, हिंदू जनजागरण वेदिका, बजरंग दल या संघटना जातीव्यवस्था आणि त्यासंबंधी विचारसरणीला मानत असल्याने त्यांना विरोध केला पाहिजे, असे ज्ञानही त्यांनी पाजळले. संघावर टीका केली, मग सोन्याच्या दरबारात आपल्याला किमान फुटक्या कवडीचा तरी भाव येतो, असा समज काँग्रेसजनांमध्ये अगदी खोलवर रूजला आहे. त्यामुळे ‘काम करो ना करो’ पण संघावर बडबडायचं आणि हायकमांडची वाहवा मिळवायची, असा हा प्रकार. इकडे उद्धव ठाकरेंनीही नंतर नंतर संघावर टीका करायला सुरूवात केली होती.
सिद्धराम्मयांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचीही खिल्ली उडवत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘महान नाटककार’ असल्याचे सांगितले. दरम्यान, सिद्धरामय्यांचे दुःख जरा वेगळे आहे. मुख्यमंत्री आणि सत्ता गेल्यानंतरचा त्यांचा थयथयाट अद्याप सुरूच आहे. काँग्रेस हायकमांड सध्या सतत फाट्यावर मारत असल्याने सिद्धरामय्या नाराज होणेही स्वाभाविकच म्हणा. त्यातच लोकसभा निवडणुकीत तोंडावर आपटूनदेखील दिल्लीदरबारी वजनदार पद आणि मान मिळविण्यात मल्लिकार्जुन खरगे यशस्वी ठरले. सध्या खरगे जोमात आणि सिद्धरामय्या कोमात असे चित्र. विशेष म्हणजे दोघेही काँग्रेसचेच आहे. संघाला उच्चजातीचं लेबल लावण्यापूर्वी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असतील अथवा सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उदाहरणं जरी सिद्धरामय्या यांनी डोळ्यांसमोर ठेवली आणि सोबतच एखाद्या संघ शाखेला यदाकदाचित प्रत्यक्ष भेटी दिली, तर त्यांचा हा विषवल्ली प्रयोग सपशेल फसेल, हे वेगळे सांगायला नकोच!
 
मुफ्तींचं दुखणं कायम...
  
‘कलम ३७०’ रद्दबातल केल्यानंतर तीन वर्षांनी जम्मू-काश्मीर उभारी घेत आहे. हे चित्र नक्कीच समाधानकारक. मात्र, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि ‘पीडीपी’च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती काश्मीरच्या विकासावर खुश नाहीत. सत्तेची खुर्ची, पाकिस्तानकडून आणि काँग्रेसकडून मिळणारे छुपे समर्थन यामुळे मेहबूबा मुफ्ती आधी हवे तसे करू शकत होत्या. मात्र, भाजपच्या ‘कलम ३७०’ रद्द करण्याच्या ‘मास्टरस्ट्रोक’ने सर्व काही धुळीस मिळाले. आता मुफ्तींनी केंद्र सरकारवर विरोधकांना संपविण्याचा पुन्हा नव्याने आरोप केला आहे. काश्मीरची पुन्हा नंदनवन होण्याकडे वाटचाल सुरू असताना मुफ्ती यांचा काश्मीरच्या नावाखाली देशविरोध कायम आहे. काश्मीरमध्ये आपण म्हणू ती पूर्व दिशा, अशा आविर्भावात राहणार्‍या मुफ्तींना 5 ऑगस्ट ही तारीख त्रासदायक ठरते, यात काही दुमत नाही.
विशेष म्हणजे मुफ्तींनी भडकाऊ भाषण करत भविष्यात तिरंग्याचा रंग संपूर्ण भगवा होणार असल्याचेही भाकीत वर्तविले. दोन धर्मात तेढ निर्माण करून आधी काश्मीरमध्ये दुफळी माजवणे सोपे होते. पण, मोदी सरकारच्या काळात हे सगळे शक्य नाही. मुफ्ती आणि कट्टरपंथीयांच्या दबावाला बळी न पडता काश्मीरने मोकळ श्वास घेतला. आधी काश्मीरच्या लाल चौकात न फडकावला जाणारा तिरंगा आज डौलाने फडकत आहे. सैन्यावर होणारी दगडफेकही थांबली आहे. मुफ्तींच्या वक्तव्याचा आधार घेऊन पाकिस्तान जागतिक स्तरावर काश्मीरचा प्रश्न उचलत होता. त्यामुळे भारताची अडचण होत होती. मात्र, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि देशाला अडचण ठरणार्‍यांविरोधातच मोर्चा वळवला आणि त्याला यशही आले.
‘ऑपरेशन ऑलआऊट’ हे त्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे. मुफ्ती यांची ताकद रसातळाला गेलेली असताना त्यांचा काश्मीरराग सुरूच आहे. मुफ्तींच्या आवाहनानंतर साधे ५० लोकंही आता जमत नाही. लडाख, कारगिल याठिकाणी जाण्याची त्यांची हिंमत नाही. त्यामुळे उरलेल्या काही पिलावळींना हाताशी धरून त्यांचे काश्मीर आणि देशविरोधाची मशाल तेवत ठेवण्याचे उद्योग सुरू आहे. परंतु, त्याला कधीही यश येणार नाही, हेच शाश्वत सत्य आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.