पंढरपूर : आषाढी एकादशी निमित्त अनेक वारकरी पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांनंतर यंदा पायी दिंडीला परवानगी मिळाली. अनेक पालख्या शनिवारी पंढरपुरात दाखल झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्त यंदा पंढरपूरनगरी दुमदुमली असून या सोहळयाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्फत लिखित स्वरूपात मोदींनी लाखो वारकरी आणि भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.
'देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा. लाखो वारकरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पायी चालत संत नगरी पंढरपूरमध्ये आले. आजही देशात सर्वात मोठे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलाच्या पंढरपूरमध्ये आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा प्राचीन काळापासून चालत आलेल्या या सोहळ्यात लाखो भाविक आले आहेत.' या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
'स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी वर्षात दिंडी यात्रा आपल्याला अनेकांचे मार्ग, पद्धती आणि विचार वेगवेगळे असले तरी लक्ष मात्र एक आहे. हि शिकवण देते. एकता आणि बंधुता या भावनेसोबतचा आत्मनिर्भर आणि भव्य भारतच्या संकल्पनानी देश अग्रेसर होउदे. आषाढी एकादशी निमित्त च्या विशेष महापूजेला आलेल्या भक्तांना व आयोजकांना शुभेच्छा.' असा संदेश मोदींनी पत्रात दिला आहे.