कॅलिफोर्निया : सिनेसृष्टीमध्ये जगभरात हॉलीवूडचे नाव खूप मोठे आहे. याच हॉलीवूडच्या 'गॉडफादर' सिनेमाने जागतिक चित्रपटसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवला आहे. या चित्रपटाचे चाहते नेहमीच गॉडफादरचा उल्लेख करत असतात. एवढेच नाही तर चित्रपटाचे रीतसर शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना 'गॉडफादर' चे उदाहरण दिले जाते. या जागतिक कीर्तीच्या सिनेमातील अभिनेता जेम्स कान यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ८२व्या वर्षी कान यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाच्या आठवणींना लोक उजाळा देत आहेत. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी व्टिट करुन कान यांना आदरांजली वाहिली आहे.
जेम्स कान यांनी गॉडफादरपासून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. फ्रान्सिस डी कोपोला यांनी दिग्दर्शित केलेल्या गॉडफादरविषयी आजही प्रेक्षकांना तेवढेच प्रेम आहे. ऑस्कर पुरस्कारांची बरसात झालेल्या गॉडफादरचा समावेश जगातील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये होतो. त्यामध्ये भूमिका केलेल्या कलाकारांची नावे चित्रपटाच्या इतिहासात नोंदवली आहेत. जेम्स कान यांनी हॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी ऐकून हॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटीजनी दुःख व्यक्त केले आहे.
जेम्स यांच्या कुटूंबियांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. काउंटडाऊन, द रेन पीपल, फनी लेडी, गॉडफादर याशिवाय मिसरी, एल्फ, चोर, गॉडफादर पार्ट २ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. जेम्स हे त्यांच्या केवळ त्यांच्या अभिनयासाठी नव्हे तर राजकीय, सामाजिक भूमिकेसाठीही ओळखले जाणारे अभिनेते होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने हॉलीवूडमध्ये पोकळी निर्माण झाली आहे, असे त्यांचे चाहते म्हणत आहेत.