डाव्यांमुळेच ‘संविधान खतरे में’

    08-Jul-2022   
Total Views |
 
saji
 
 
 
'आम्हीच कसे सर्वांपेक्षा पुरोगामी, समृद्ध, सगळं ज्ञान आमच्याकडेच’ अशा टिमक्यांनी हिंसक वाटचाल करणारी डावी विचारसरणी देशातून हळूहळू भुईसपाट होताना दिसते.
 
 
 
मात्र, केरळमध्ये तग धरलेल्या डाव्यांचा देशविरोध यापूर्वीही तसा सर्वश्रुत होताच, पण आता त्यांचा राज्यघटनेच्या विरोधातील रोषही समोर आला आहे. त्याला कारण असे की, केरळच्या मत्स्यपालन मंत्र्यांचे सध्या मत्स्य पालनाऐवजी वेगळेच उद्योग सुरू आहेत. मंत्री साजी चेरियन यांनी राज्यघटनेविरोधात मुक्ताफळे उधळताना कोणतीही काटकसर सोडली नाही. “भारताची राज्यघटना एक उत्तम राज्यघटना असल्याचे बोलले जाते, मात्र राज्यघटना अशा पद्धतीने लिहिली गेली आहे की, ज्यातून सर्वसामान्य जनतेची लूट केली जात आहे,” अशा शब्दांत त्यांनी राज्यघटनेवर टीका केली. मल्लापल्लीनजीक एका राजकीय कार्यक्रमात त्यांनी आपले राज्यघटनेविरोधातील अज्ञान पाजळले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ ‘व्हायरल’ झाल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली. काँग्रेसप्रणित युडीएफनेही विधानसभेत चेरियन यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
 
 
अखेर सगळ्या बाजूंनी कोंडी झाल्याने साजी चेरियन यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याकडे सोपवला. मात्र, प्रकरण इथपर्यंत थांबले नाही. चेरियन यांच्या समर्थनासाठी चक्क भाकप आणि माकपने पुढाकार घेतला. चेरियन यांनी हेतुपुरस्सर ही विधाने केली नसून ती चुकून केल्याची सारवासारव या दोन्ही पक्षांनी केली. त्यावर कळस म्हणजे, चेरियन यांच्याकडून त्यांनी केलेल्या विधानासंदर्भात खुलासा मागवला असल्याचेही सांगण्यात आले. चेरियन यांनीही आपला लंगडा बचाव करताना खोटी कहाणी रचल्याचा आव आणला. चेरियन यांनी भले राजीनामा दिला असेल. पण, यानिमित्ताने डाव्या पक्षांचे खरे चरित्र पुन्हा या प्रकरणाने समोर आले. तसेच पावलोपावली डावी मंडळी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात. पण, आज त्याच संविधानाला या मंत्र्याने अशी दूषणे देणे हा संविधानाबरोबरच आंबेडकरांचाही अपमानच. एवढेच नाही तर ‘संविधान खतरे मे हैं’ म्हणत भाजप सरकारवर तुटून पडणारे हेच लोक आज त्यांच्याच मंत्र्यांची पाठराखण करताना दिसतात. तेव्हा, डाव्यांचाच संविधानविरोधी चेहरा यानिमित्ताने देशासमोर आला आहे.
गोवा सरकारचे १०० दिवस
 
 
 
बघता बघता गोव्यातील भाजप सरकारने प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपले १०० दिवस यशस्वीरित्या पूर्ण केले. खरेतर आगामी पाच वर्षांतील कामकाजाची झलक सुरुवातीच्या १०० दिवसांमध्येच गोवेकरांना पाहायला मिळाली. मुख्यमंत्री सावंत यांनी नुकतेच पणजी येथील ’१०० डेज ऑफ अ‍ॅक्शन’ या कार्यक्रमादरम्यान भाजपच्या ’डबल इंजिन’ सरकारने केलेल्या कामांच्या पुस्तिकेचे प्रकाशन केले. त्यावेळी सावंतांनी अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांना स्पर्श केला. मात्र, सावंत यांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या एका घोषणेवर सर्वाधिक भर दिला. ती घोषणा म्हणजे सत्ता मिळाल्यानंतर हिंदूंच्या धर्मांतरणाला पूर्णविराम आणि हिंदू मंदिरांचे पुनर्निर्माण आणि खरोखर गोव्यात हिंदू धर्मांतरणाला आळा बसण्याबरोबरच हिंदू मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि पुनर्निर्माणावरही सावंत सरकारने विशेष भर दिला आहे. सावंत सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या धर्मांतरावर अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. पोर्तुगीजांनी आपल्या सत्ताकाळात गोव्याची जवळपास ४५० वर्षे जुनी मूळ हिंदू संस्कृती नष्ट करण्याचा यथेच्छा प्रयत्न केला. त्यानंतर गोव्यातील काँग्रेस सरकारच्या सर्व धर्मांना एकमेकांमध्ये भिडवण्याच्या आणि चुचकारण्याच्या वाईट सवयीमुळे हिंदू संस्कृतीला वाचविणार कोण, असा प्रश्न कायम होता.
 
 
मात्र, गोव्यात भाजपचे कमळ फुलल्यानंतर आशेचा किरण निर्माण झाला अन् अंधारात लोटली गेलेली हिंदू संस्कृती आणि अमूल्य ठेवा पुन्हा एकदा उजेडात आला. त्याला मुख्यमंत्री सावंतांनी आणखी वेग दिला. गोव्यात हिंदू संस्कृती पुन्हा रूजवण्यासाठी सावंत सरकार प्रयत्नशील आहे. जी हिंदू मंदिरे तोडण्यात आली, ती पुन्हा त्याच ठिकाणी नव्याने बांधत आहे. त्यासाठी सावंत सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात २० कोटींचा निधीही मंजूर केला आहे. हिंदू धर्मसंस्कृती जतनाबरोबरच अनेक लोकोपयोगी योजनांवर सावंत सरकार काम करत आहे. अनेक सरकारी योजनांसाठी सार्वजनिक तक्रार पोर्टल आणि एसएमएस माहिती सेवा सुरू करण्यासह ‘वन हक्क’ कायद्यांतर्गत लाभार्थ्यांना भूमी अधिकार सनद वितरित करण्यात आले. गोव्यात भाजपचे सरकार आले आणि जे मागील ६० वर्षांत होऊ शकले नाही, ते भाजपने दहा वर्षांत करून दाखवले. त्यामुळे पुढील काळात सावंत सरकार गोव्यातील हिंदू संस्कृतीला पुनवैभव प्राप्त करून देईल, यात काही शंका नाही.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.