अमरावती हत्याकांड म्हणजे देशात धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठीचा कट – एनआयए

आरोपी सध्या एनआयए कोठडीत

    08-Jul-2022
Total Views |
kolhe


प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे असण्याचीही शक्यता
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रातील अमरावतीस्थित उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी झालेली निर्घृण हत्या ही भारतातील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा आणि धर्माच्या आधारावर शत्रुत्व वाढवण्याचा नियोजनबद्ध कट होता. हे प्रकरण म्हणजे ‘अनेक व्यक्तींच्या गटाने केलेले कट’ होता, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयने) आपल्या एफआयआरमध्ये नमूद केले आहे.
 
 
 
अमरावती येथील उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची त्यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे फेसबुक या समाजमाध्यमावर समर्थन केल्याने मुस्लिमांच्या टोळक्याने हत्या केली. प्रकरणाचा तपास एनआयएकडे आल्यानंतर त्यांनी २ जुलै रोजी बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा, १९६७ (युएपीए) अंतर्गत भादवि कलम १६, १८ आणि २० अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
 
 
 
एनआयएने आपल्या एफआयआरमध्ये म्हटले की,महाराष्ट्राच्या अमरावतीमधील सिटी कोतवाली पोलिस स्थानकास कोल्हे यांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या झाल्याची माहिती मिळाली आणि २२ जून रोजी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मृताचा मुलगा संकेत उमेश कोल्हे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावती येथील घनश्याम नगर परिसरात राहणाऱ्या कोल्हे यांची ते आपल्या घरी परतत असताना रात्री दहाच्या सुमारास हत्या झाली.
 
 
प्रकरणाच्या तपासादरम्यान आढळून आल्यानुसार, भादवि कलम १५३ (अ), १५३ (ब) आणि १२० (बी) आणि युएपीए कायद्याचे कलम १६, १८ आणि २० नुसार आरोपींविरोधात एनआयएने गुन्हा दाखल केला आहे. कोल्हे यांची हत्या हा ‘अनेक व्यक्तींच्या गटाने केलेला नियोजनबद्ध कट’ होता. त्याच्याद्वारे भारतातील एका वर्गातील लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. याप्रकरणाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धागेदोरेदेखील असण्याची शक्यता एनआयएने एफआयआरमध्ये नमूद केली आहे.
 
 
 
दरम्यान, अमरावती हत्याकांडाचा तपास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनआयएला दिले होते. एनआयए कायदा, २००८ अंतर्गत हा गुन्हा घडला असून त्याची गंभीरचता आणि राष्ट्रीय सुरक्षेवर होणारे परिणाम लक्षात घेऊन त्याचा तपास एनआयएने करणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले होते. तपास हाती घेतल्यानंतर एनआयएने महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेले आरोपी मुदस्सीर अहमद, शाहरुख पठाण, अब्दुल तौफिक, शोएब खान, अतीब रशीद, युसूफ खान बहादूर खान आणि शाहीम अहमद फिरोज अहमद यांचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांना गुरुवारी मुंबई येथील विशेष एनआयए न्यायालयात हजर केले, सध्या आरोपी आठ दिवसांच्या एनआयए कोठडीत आहेत.