मुंबई: शिवसेना माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सोपवलेला आहे. अडचणींच्या काळात पक्ष नेतृत्व आपल्या पाठीशी उभे राहिले नाही वा आपली विचारपूस देखील केली गेली नाही अशी खंत अडसुळांनी पत्रातून उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली.
आजारपणाच्या काळात पक्षाकडून साधी चौकशी देखील करण्यात आली नाही त्यामुळे अडी-अडचणीत पक्षाने आपल्याला वाऱ्यावर सोडले, या भावनेतून आपण राजीनामा दिल्याचे अडसुळांनी स्पष्ट केले. आनंदराव अडसूळ हे अमरावतीचे माजी खासदार आहेत. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांनी अडसुळांना पराभूत केले.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना बसणारे हादरे थांबताना दिसत नाहीत. अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणे पसंत केले. येत्या काळात अजून काही नेते ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात अडसुळांच्या राजीनाम्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आता अडसूळ शिंदे गटात सामील होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.