बंडखोर नव्हे कार्यकर्त्यांचेही शल्य

    07-Jul-2022   
Total Views |

mla
 
 
एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर काही बंडखोर आमदारांच्या घरावर हल्ले करण्यापासून त्यांचे बॅनर, फोटोला काळे फासण्याचे प्रकार राज्यात काही ठिकाणी निदर्शनास आले. संजय राऊतांसारख्या नेत्यांनी तर तोंडाचे गटार उघडून शिवसेनेची होती नव्हती अब्रूही धुळीस मिळवली. पण, विधानसभा अध्यक्ष निवड आणि बहुमत चाचणीनंतर बहुतांश आमदार हे आता आपापल्या मतदारसंघात परतले आहेत.
 
 
आता या बंडखोर आमदारांपैकी एकाही आमदाराच्या घरावर कोणी शिवसैनिक चाल करून गेला नाही की त्यांना जाब विचारायला गेला नाही. कारण, महाराष्ट्राच्या या कानाकोपर्‍यातील शिवसैनिकांची निष्ठा ठाकरे आणि ‘मातोश्री’वर असली तरी तिथपर्यंतचा रस्ता हा शेवटी आमदार, खासदार मार्गेच जातो. त्यामुळे ज्या आमदारांनी आपल्या भागात शिवसेना खर्‍या अर्थाने रुजवली, वाढवली, त्याच आमदारांवर बहुतांश शिवसैनिक फार काळ नाराजही राहू शकत नाही. दुसरी बाब म्हणजे, महाविकास आघाडी स्थापित झाल्यानंतर केवळ शिवसेनेचे आमदारच अस्वस्थ होते असे नाही, तर अगदी तळागाळातील शिवसैनिकांमध्येही खदखद होती. त्यातच ग्रामपंचायतीपासूनमहापालिकेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली पदाधिकार्‍यांची, नगरसेवकांची उचलाउचली ही शिवसेनेच्या वेळोवेळी जिव्हारी लागली होतीच. पण, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय शिवसेनेकडे पर्याय नव्हता. वरून आमदारांना निधी नाही, मतदारसंघात कामे नाहीत, कार्यकर्त्यांची नाराजी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या पारंपरिक विरोधकांबरोबर जुळवून घेण्याची जबरदस्ती यामुळे शिवसैनिकही द्विधा मनस्थितीत होतेच. या सगळ्या रोषाला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडाने वाट मोकळी करून दिली. त्यामुळे काही मूठभर शिवसैनिक सोडले, तर इतरांनी मात्र ‘मातोश्री’पेक्षा आपल्या स्थानिक आमदारावर विश्वास दाखवलेला दिसतो, असेच म्हणता येईल. कारण, वरकरणी जरी हा लढा या आमदारांचा वाटत असला तरी कार्यकर्त्यांची एक मोठी फौज या प्रत्येकाच्या पाठीशी आज तितक्याच ताकदीने उभी असल्याचे दिसते. त्यामुळे आपला राजा प्रजा तर सोडाच, सेनापती आणि शिलेदारांचेही न ऐकता दोन-चार जणांच्या डोक्याने कारभार हाकत असेल, तर त्याचा उद्धव ठाकरे होतो, हे निश्चित!
 
 
टाळ्या आणि गटांगळ्या...
 
 
"रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. ब्रेकच लागत नव्हता,” असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बहुमत चाचणी जिंकल्यानंतरच्या भाषणावरून नुकताच लगावला. त्यावर एकनाथ शिंदे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून एका ओळीत ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. शिंदेेंनी ट्विट केले की, “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडिसचा स्पीड फिका पडला. कारण, हे सर्वसामान्यांचं सरकार!!” खरंतर पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी आपले शब्द जपून वापरणे अपेक्षित. पण, मुख्यमंत्रिपदी असतानाही त्यांचा मर्सिडिसच्या वेगाने सुसाट धावणार्‍या बेलगाम अशा वाणीवर संयम नव्हताच आणि आताही त्याची शक्यता शून्यच! बंडखोर गुवाहाटीला गेल्यानंतरही संजय राऊत सोडा, ठाकरेंनीही वापरलेली तथाकथित शिवराळ भाषा, ठाकरी शैलीनेच त्यांचा घात केला. पण, ठाकरेंची स्थिती म्हणजे धड कळतंही नाही आणि म्हणून वळण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. शिवसेना सोडून गेले ते सगळे गद्दार. कोणी कोंबडीचोर तर कोणी रिक्षावाला! त्यांची पार्श्वभूमी शिवसेनेत येण्यापूर्वी काहीही असो, त्या प्रत्येकाचा शिवसेनेच्या संघटनात्मक वाटणीत मोलाचा वाटा होता, हे ठाकरेंनी कितीही अमान्य केले तरी सत्यच. त्यामुळे खरंतर अशा तळागाळातल्या लोकांना शिवसेनेने मोठं केलं, ते मुख्यमंत्री झाले, याचा अभिमान बाळगून, त्यादृष्टीने सकारात्मक शाब्दिक मांडणी करण्यापेक्षा, शिवसेनेकडून मात्र उलट त्यांच्या गरिबीवरून, भूतकाळावरून त्यांना नाहक डिवचण्याचेच उद्योग झाले.
 
 
शिंदेच नाही, तर इतर बंडखोर आमदारांबद्दल भाजीवाला, टपरीवाला अशीच हीन लेखणारी भाषा! हीच विषवाणी आजच्या शिवसेनेसमोरची मोठा समस्या आहे. कारण, या सगळ्या बंडखोरांचा रोषही होता तो वाचाळवीर विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच. तेव्हा, ठाकरी शैली, शिवराळ भाषा कुठे, किती वापरायची, तोंडाला कुठे लगाम घालायचा याचा या घटनेनंतरही शिवसेनेने बोध घेतला नाही, तर भविष्यात हीच सभेला टाळ्या खेचून आणणारी ठाकरी शैली, गटांगळ्या खायला भाग पडेल, हे ध्यानी असावे. राजकारणात डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावी असे म्हणतात, ते याचसाठी. पण, ठाकरेंच्या डोक्यावरील कपटाचा तप्त ज्वालामुखी आणि जिभेवर टोमण्यांच्या कडू मिरच्यांमुळेच शिवसेेनेची ही अशी शकले उडाली, हेच वास्तव!
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची