मुंबई गोवा महामार्ग ठप्प : परशुराम घाटात दरड कोसळली

    05-Jul-2022
Total Views |
 
parshuram
 
 
 

मुंबई : मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली असली तरी अजूनही वाहनांच्या मोठया रांगा लागल्या आहेत. फक्त परशुराम घाटच नव्हे तर खेड जवळील कशेडी घाटातही दरड कोसळण्याचा धोका तयार झाल्याने मोठ्या दुर्घटनेची स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन एनडीआरएफच्या जवानांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
 
गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. जगबुडी, काजळी या नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मागच्या वर्षीसारखी पूरस्थिती होण्याचा धोका आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अजून पुढचे चार दिवस मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.